‘वेड’ लावणारा उत्कंठावर्धक टिझर

आपल्या अभिनयाची 20 वर्ष कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे . 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘वेड’ (Ved) या त्यांच्या आगामी चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर शेअर  झाला आहे. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुख यांनी केले आहे तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे. या पूर्वी जेनेलियाने हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल 5 भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf), विद्याधर जोशी (Vidyadhar Joshi) तसेच अभिनेता शुभंकर तावडे (Shubhankar Tawade) व अभिनेत्री जिया शंकर (Jia Shankar) इत्यादी कलाकार  या चित्रपटात भूमिका साकारत आहेत . 

अजय – अतुलचे संगीत 

आघाडीचे संगीतकार अजय अतुल (Ajay – Atul) यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत . तर गीते अजय – अतुल , गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत . वेड चित्रपटाची पटकथा रुषिकेश तुराई, संदीप पाटील, रितेश देशमुख यांनी लिहिली आहे तसेच संवाद प्राजक्त देशमुख यांनी लिहिले आहेत . सिनेमॅटोग्राफी भूषणकुमार जैन यांनी केली आहे संकलनाची जबाबदारी चंदन अरोरा यांनी पार पाडली आहे . संदीप पाटील हे कार्यकारी निर्माते आहेत , जिनिलिया देशमुख यांनी वेड चित्रपटाची निर्मिती केली आहे . आज या चित्रपटाचा टिझर मुंबई फिल्म कंपनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे . रसिक प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता या टिझरमुळे निर्माण झाली आहे. रितेश आणि जेनेलियाच्या अभिनयाची एक वेगळीच बाजू दिसून येत आहे. 

अक्षयकुमारनेही टिझर केला शेअर 

टिझरने  बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता अक्षय कुमारलादेखील ‘वेड’  लावले.  रितेश देशमुखने अक्षय कुमारला (Akshay Kumar) वेडचा टिझर पाहण्यासाठी पाठवला आणि त्याला तो इतका आवडला की, त्याने त्वरीत आपल्या सोशल मीडियावर तो शेअर केला. तसंच रितेशची जवळची मैत्रीण फराहखानने (Farah Khan Kunder) देखील टीझर शेअर केला आहे. गेल्या अनेक महिन्यापासून या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. पहिल्यांदाच रितेश दिग्दर्शन करत असून प्रेम हा विषय आणि त्यातही रितेश आणि जेनेलिया पुन्हा एकत्र पाहायला मिळणार आहेत. इतकंच नाही तर जेनेलिया पहिल्यांदाच मराठी चित्रपटात पूर्ण वेळ दिसून येणार आहे. याआधी केवळ गाण्यात गेस्ट अपिरिअन्स जेनेलियाने दिला होता. तर जेनेलियाने टीझर शेअर करताना म्हटले, ‘आवड होती म्हणून हिंदीत अभिनय सुरु केला. प्रेम होतं म्हणून तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये चित्रपट केले. आणि आता वेड आहे म्हणून मराठीत आलेय.’

त्यामुळे आता या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात ते पाहावं लागेल. कारण काही दिवसांपूर्वीच मराठी चित्रपटांचे शो कमी झाल्यामुळे सनी चित्रपटाला याचा फटका बसला असून दिग्दर्शक हेमंत ढोमे संतापला होता. 

Leave a Comment