शेवटपर्यंत उत्कंठा टिकवून ठेवणारा ‘दृश्यम 2’, नक्कीच बघावा असा

गेल्या काही महिन्यांपासून थिएटरमध्ये दमदार असा कोणताही चित्रपट पाहिला मिळत नव्हता. आतापर्यंत जे काही चित्रपट आले ते तसे थोडे सो-सो असेच होते. पण ‘दृश्यम 2’ आला आणि थिएटर्स हाऊसफुल्ल झाली. अजय देवगण, श्रिया सरन स्टारर या चित्रपटाचा पहिला भाग ही चांगलाच चालला होता. आता पुढे काय? हे सांगणारी पुढची कथा ही शुक्रवारी रिलीज झाली. उत्कंठा काय असते? सर्वसामान्य असून प्लॅनिंग काय असतं? कुटुंबाची जबाबदारी ही सगळ्यात महत्वाची कशी असते? हे सांगणारा ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे सध्या तरी या चित्रपटाची तिकिट सध्या इतक्या सहज उपलब्ध होताना दिसत नाही. Thank God चित्रपट पाहिल्यानंतर अजय देवगणला झालं तरी काय? म्हणणाऱ्यांसाठी ‘दृश्यम 2’ ही एक उत्तम अशी कलाकृती आहे. जाणून घेऊया अधिक 

विजय साळगावकर अडकला आणि जिंकलासुद्धा

हे कथानक गोव्यात घडताना दाखवले आहे. गोव्याच्या पोंडोलिअम भागात घडली आहे. विजय साळगावकर (अजय देवगण) हा आपल्या कुटुंबासोबत गोव्यात राहतोय. तो एक केबल ऑपरेटर आणि थिएटरचा मालक आहे. पण तो एक खूनीसुदधा आहे. याचा उलगडा पहिल्या दृश्यममध्ये आपल्या सगळ्यांना झाला. पण तो खून केल्यानंतर त्या मृतदेहाची विल्हेवाट त्याने कुठे लावली हे देखील प्रेक्षकांना माहीत आहे. पण खूनाच्या 7 वर्षानंतर पुन्हा एकदा त्या केसची फाईल ओपन होते. नवीन पोलीस अधिकारी तरुण अलाहवत (अक्षय खन्ना) पुन्हा एकदा चौकशीचा धडाका लावतो. गोव्यातील प्रत्येकाला हा खून कोणी केला याची माहिती असते. पण पुराव्या अभावी विजय साळगावकर दोषी आहे हे कोणालाही सिद्ध करता येत नाही. शिवाय ज्या आरोपाखाली त्याला धरायचे तो मृतदेहही हातात नसल्यामुळे पोलिसांची नाचक्की होते. 

पण दुसऱ्या भागात ज्या गोष्टी विजय साळगावकरकडून सुटल्या अशा वाटतात. तेच धागे- कंगोरे पकडत पोलीस पुन्हा एकदा विजय साळगावकरकडून गुन्हा केला असे वदवून घेण्यासाठी ट्रॅप रचतात. त्या ट्रॅपमध्ये तो अजिबात फसत नाही. पण त्याची पत्नी नंदिनी साळगावकर (श्रिया सरण) ही फसते. चुकून ती मृतदेहाचा उल्लेख करते. त्यातच 2014 साली तो मृतदेह लपवताना विजय साळगावकरला जी व्यक्ती पाहते. ती मृतदेह कुठे आहे याचीही माहिती देते. त्यामुळे विजय साळगावकर पोलिसांच्या हाती लागतो. पण ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ खून करुनही तो त्यातून निर्दोष सुटतो. कसा? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहणेच गरजेचे आहे. त्याशिवाय ती मजा तुम्हाला अजिबात येणार नाही. चित्रपटातील प्रत्येक पात्राचे काम हे जबरदस्त आहे. त्यामुळे चित्रपट संपू नये असे वाटते.

अभिनय, कथानक जबरदस्त

एखादा थ्रिलर असा चित्रपट बनवताना तो अजिबात सैल सोडून चालत नाही. त्याचे प्लॅनिंग, प्लॉटिंग अगदी व्यवस्थित असावे लागते. ‘दृश्यम 2’च्या बाबतीतही अगदी तसेच म्हणायला हवे. 2015 नंतर 2022 मध्ये हा चित्रपट येतोय. पण तरीही त्यामध्ये एक सुसुत्रता दिसून येते. पात्रांच्या दिसण्यात फरक पडला असला तरी देखील ती घटना आजही त्यांना कशी घाबरवते हे अभिनयातून त्यांनी उत्तम दाखवले आहे. कुठेही कथानक रटाळ, कंटाळवाणे होत नाही. खरंतरं मध्यांतर कधी होते हे देखील कळत नाही. खूप दिवसांनी असा चित्रपट आला आहे जो संपावा असे मुळीच वाटत नाही. 

हे सगळं अनुभवायचे असेल तर तुम्हाला ‘दृश्यम 2’ पाहणे गरजेचे आहे. अजय देवगणच्या फॅन्ससाठी हा एक कमालीचा अनुभव असणार आहे.

Leave a Comment