Bigg Boss 16: निमरित कौर अहलुवालिया या आजाराने आहे ग्रस्त, कन्फेशन रूममध्ये रडली

बिग बॉस हिंदीच्या 16 व्या (Bigg Boss 16) हंगामात अनेक जणांनी आपले असे व्यक्तीमत्व लोकांसमोर आणले आहे आणि यामध्ये अगदी पहिल्या आठवड्यापासून आपल्या व्यक्तिमत्वाने लक्ष वेधून घेतलेली अभिनेत्री म्हणजे निमरित कौर अहलुवालिया (Nimrit Kaur Ahluwalia). सध्या शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अर्चना गौतम (Archana Gautam) यांच्या भांडणानंतर पुन्हा एकदा अर्चनाचा घरात प्रवेश झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवची चांगली मैत्रीण असलेली निमरत मात्र सध्या मोठ्या समस्येशी झुंजत आहे. टीव्हीवरील छोटी सरदारनी (Choti Sardarni) निमरत सध्या चिंता (Anxiety) आणि नैराश्य (Depression) या आजाराशी लढा देत आहे. गेल्या तीन – चार दिवसांपासून तिची तब्बेत बिघडली आहे. तिच्यावर गेल्या वर्षभरापासून उपचार चालू असल्याचेही तिने बिग बॉसमध्ये सांगितले आहे. 

निमरत सध्या आहे आजारी 

बिग बॉसच्या घरात विजेतीपदासाठी दावेदार म्हणून निमरतचंही नाव घेतलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांपासून निमरित खूपच त्रासात दिसून येत आहे. त्यामुळे बिग बॉसने तिला कन्फेशन रूममध्ये बोलावल्याचे दिसून आले आहे. तर त्यानंतर बिग बॉसने निमरितला सविस्तर विचारल्यावर तिने याबाबत स्पष्ट केले आहे. चिंता आणि नैराश्याच्या या आजारामुळे गेले 3-4 रात्र तिला झोप न लागल्याने त्रास होत आहे. ही समस्या गेले वर्षभर तिला त्रास देत असून आपल्याला काहीच नीट वाटत नसल्याचे तिने सांगितले. त्यामुळे तिला थोडेसे घुसमटल्यासारखे वाटत असल्याचेही तिने सांगितले. तसंच आपला मेंदू थकल्यासारखा वाटत असल्याचेही तिने यावेळी सांगितले. तसंच गेले वर्षभर ती या आजारासाठी औषध घेत असल्याचे तिने या संभाषणादरम्यान सांगितले आहे. पण तिने स्वतःहून गोळ्या घेणं बंद केलं आणि आता पुन्हा आपली मानसिक स्थिती बिघडत असल्याचे वाटत असल्याचे तिने सांगितले आहे. या तिच्या कन्फेशनमुळे तिचे चाहतेही सध्या चिंतेत आहेत. 

शिवशी भांडत असतानादेखील निमतरला झाला होता त्रास 

याआधीदेखील दुसऱ्या आठवड्यात शिवसह निमरितला भांडताना त्रास झाला होता. त्यावेळीच आपण सध्या नैराश्यात असल्याचे तिने सांगितले होते. मात्र त्यानंतर शिव आणि निमरतमध्ये खूप चांगली मैत्री झाल्याचेही दिसून आले होते. पण आता निमरित यातून कशी बाहेर येणार आणि तिच्या तब्बेतीमुळे तिला अधिक त्रास तर होणार नाही ना? याबाबत अनेक उलटसुलट चर्चा चालू झाल्या आहेत. तसंच निमरित विजेतेपदाची दावेदार असल्याने तिने हिंमत न हारता खेळावे असंही तिच्या चाहत्यांना वाटत आहे. आता पुढे काय होते? याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Leave a Comment