शिळ्या पोळीला द्या इटालियन तडका, लहान मुलांनाही आवडेल चव

प्रत्येक घरात पोळी अर्थात चपाती (Chapati) ही तर बनवलीच जाते. अनेकांना तर भातापेक्षा चपाती जास्त खायला आवडते. पण बऱ्याचदा घरात अंदाज न आल्यामुळे पोळ्या उरतात आणि सकाळी या शिळ्या पोळ्या सगळ्यांना खायला आवडतातच असं नाही. काही घरात चहाबरोबर शिळी पोळी खाऊन ऑफिसला जाण्याची पद्धत आहे. पण काही जणांना अजिबात शिळी पोळी आवडत नाही. रात्रीच्या पोळ्या उरल्या आणि तुम्हाला फक्त फोडणीची पोळी करायची नसेल तर तुम्ही या पोळ्यांना इटालियन तडका देऊ शकता. लहान मुलांनाही मग ही पोळी आवडेल आणि हे बनवायलादेखील सोपे आहे. त्याशिवाय रोज नाश्ता काय करायचा असा प्रश्न असेल तर तो प्रश्नही मार्गी लागेल. नाश्त्यासाठीही यातील एखादी रेसिपी तुम्ही वापरू शकता.  

रोटी टॅकोज (Roti Tacos)

Roti Tacos – Freepik.com

उरलेल्या पोळ्यांचे काय करायचे असा प्रश्न असेल तर तुम्ही टॅकोज तयार करू शकता. मॅक्सिकन सॉस वापरून तुम्ही या पोळ्यांचे पटकन चटपटे टॅकोज बनवू शकता. 

  • पोळी बटरवर भाजून घ्या आणि त्याचा टॅकोजसारखा आकार बनवा 
  • राजमाची भाजी तयार करून घ्या
  • टॉमेटो आणि कांदा चिरून त्यात घाला 
  • वरून मेयो आणि तंदुरी सॉस घालावे. तुमचे रोटी टॅकोज तयार 

रोटी पिझ्झा (Roti Pizza)

Roti Pizza – Freepik.com

रात्री उरलेल्या पोळीचे एकदम चविष्ट स्नॅक्स (Tasty Snacks) बनवता येतात. याचा तुम्ही रोटी पिझ्झाही बनवू शकता. तुम्हाला केवळ पोळीचा वापर पिझ्झा बेस म्हणून करायचा आहे. 

  • बटरवर पोळी भाजून थोडी कुरकुरीत गरम करा 
  • त्यावर पिझ्जा सॉस, चिरलेला कांदा, टॉमेटो, शिमला मिरची आणि उकडलेले कॉर्न घाला
  • वरून चीज किसून घाला 
  • तव्यावर बटर सोडून पुन्हा हे भाजा आणि वरून झाकण ठेवा. जेणेकरून भाज्या शिजतील आणि चीज विरघळेल
  • त्यानंतर डिशमध्ये घालून वरून ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स घालून खा 

रोटी नाचोज (Roti Nachos)

Leftover Roti Nachos – Freepik.com

शिळ्या पोळीला एक नवा ट्विस्ट देण्यासाठी  तुम्ही नाचोज बनवू शकता. प्रत्येक पार्टीत सध्या नाचोज हा पदार्थ आवडता ठरत आहे. शिळ्या पोळीचे नाचोज बनवणे अत्यंत सोपे आहे.

  • शिळ्या पोळीचे त्रिकोणी तुकडे करून तळून घ्या अथवा तव्यावर कुरकुरीत भाजून घ्या
  • त्यावर राजमा भाजी, टॉमेटो, कांदा मिक्स करून वर घाला
  • वरून मेयो, तंदुरी सॉस, टॉमेटो केचअप घाला. तसंच क्रिम घालून नाचोज तयार करा 

गार्लिक रोटी (Garlic Roti)

Garlic Roti – Freepik.com

गार्लिक ब्रेड (Garlic Bread) हा पदार्थ लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. शिळ्या पोळीवरदेखील तुम्ही हा प्रयोग करू शकता. कमी वेळात तुम्ही हा चविष्ट नाश्ता तयार करू शकता. 

  • रात्रीची शिळी पोळी तुम्ही त्रिकोणी आकारात कापून घ्या 
  • बटरवर कुरकुरीत भाजा 
  • त्यात चाट मसाला, ठेचलेली लसूण, चिरलेली कोथिंबीर, मीठ आणि बटर हे एकत्र मिक्स करून वरून लावा. तुमची गार्लिक रोटी तयार आहे

शिळ्या पोळीला तुम्ही अशा पद्धतीने चविष्ट केल्यास, घरातील लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत आवडीने शिळी पोळी मागून खातील यात काहीही शंका नाही. 

Leave a Comment