प्रत्येक माणसाचे दुसऱ्या माणसाशी काही ना काही नाते असते. घरातले नाते वगळता ही आपल्या आयुष्यात काही नवी नाती तयार होत असतात. कोणी मानलेला भाऊ असतो कोणी आपला खूप खास मित्र असतो. तर कोणी त्यातील प्रियकर/ प्रेयसी असतो. आता नाती म्हटली की, त्यात कटुता आली. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे एकमेकांची मनं दुखण्याची वेळ कधीतरी येतेच. नाते कितीही घट्ट असले तरी देखील एखाद्या घटनेमुळे नात्यात दुरावा येण्यास सुरुवात होते. पण हा दुरावा कमी करुन नात्यातील विण घट्ट करायची असेल तर नाते खराब करण्यास कारणीभूत असलेल्या गोष्टीही माहीत असायला हव्यात.
खातरजमा न करता राग ठेवणे

कधीतरी असे होते की, एखादे नाते खूप छान असते. पण आपण एखादी गोष्ट बोलतो किंवा कृत्य करतो की, ज्यामुळे समोरच्याच्या मनात उगाच आपल्या विषयी काही भावना तयार होतात. जर त्या गोष्टीचे निराकारण वेळेवर झाले नाही तर उगाचच त्याबद्दल आपल्या मनात चुकीच्या गोष्टी येतात. त्यामुळे होते असे की, कोणतीही खातरजमा न करता आपण दुसऱ्यावर राग ठेवतो. त्याला कदाचित बोलूनही जातो. त्याचे परिणाम नाते खराब होते. म्हणूनच कोणत्या गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय दुसऱ्यावर राग ठेवू नका. कारण नात्यात दुरावा येण्यासाठी या गोष्टी कारणीभूत ठरतात.
गोष्टी न विसरणे
आपल्यासोबत एखादी वाईट घटना घडली की, आपण ती गोष्ट सहसा विसरु शकत नाही. पण गोष्टी न विसरणे नात्यातील कटुता अजून वाढवू लागते. तिने किंवा त्याने माझ्यासोबत असे केले आता बघ तिचे आयुष्य मी कसे करेन किंवा तिने माझ्यासोबत जे काही केले आहे. त्यामुळे तिलाही तोच त्रास व्हायला हवा. असे जर आपण मनात ठेवून चालत असू तर ते नाते पुन्हा चांगले होणार नाही. काही गोष्टी खरंच अशा असतात ज्या आपण विसरु शकत नाही. हे कितीही खरे असले तरी देखील काही गोष्टी विसरुन पुढे जाणे गरजेचे असते. त्या व्यक्तीसोबत तुम्हाला नाते चांगले करायचे असेल तर तुम्ही त्या गोष्टी विसरा अन्यथा नात्यातील कटुता कधीच कमी होणार नाही.
मनात गोंधळ वाढवणे
एखादी व्यक्ती तुम्हाला मनापासून आवडत असेल आणि अचानक तुम्हाला त्या व्यक्तिचे खटकले असेल तर सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या त्या जवळच्या व्यक्तिशी बोलणे हे फार गरजेचे असते. अनेकदा त्या व्यक्तिने आपल्याला दुखावले म्हणून आपण ती गोष्ट दुसऱ्याला सांगतो त्याचा परिणाम असा होतो की, ती तिसरी व्यक्ती आपल्याला तुमच्या आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल काही मत देते. त्यामुळे तुमच्या मनात नाहक गोंधळ निर्माण होतो. मनातला हा गोंधळ भांडणात कधी बदलतो कधी कळत नाही. तुम्हाला जर नात्यात दुरावा नको असेल तर तुम्ही ही गोष्ट टाळायला हवी.
तुम्हालाही नात्यात दुरावा नको असेल तर तुम्ही या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.