लहानसहान गोष्टीतही सासूशी होत आहेत वाद, वापरा ही युक्ती

लग्नाआधी आणि लग्नानंतरही मुलींच्या मनात अनेक शंका असतात. एखाद्या दुसऱ्या घरात जाणे आणि त्या घरातील गोष्टींना आपलेसे करून त्यात ढळणे हा एक वेगळाच अनुभव असतो. पण लग्न झाल्यानंतर जर तुम्हाला आपलेपणाच वाटत नसेल तर मात्र नक्कीच समस्या होऊ लागते. यासाठी सर्वात महत्त्वाचे नाते असते ते सासूचे. नवनवीन दिवस संपले की सर्वात जास्त त्रास होतो तो म्हणजे सासूचा. सासू सुनेच्या नात्यावर अनेक जोक्स आतापर्यंत आले आहेत. तर टीव्ही मालिका असो अथवा कहाणी असो सासू – सून (Mother-in-law and Daughter-in-law) हा विषय कधीच जुना होत नाही. पण ही गोष्ट खरं तर गंभीर आहे. आजही अनेक घरांमध्ये घटस्फोटाचं कारण हे सासू असते आणि ही नक्कीच गंभीर बाब आहे. घरात सतत सासू-सुनेची भांडणं होत असतील तर त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. खरंच तर सासूसह वावरणं आणि तिच्यासह समतोल साधणं हे कठीण काम आहे. पण हे सायकोलॉजिकलही आहे. त्यामुळे सासूशी वाद होत असेल तर तुम्ही हा लेख नक्की वाचा. 

मानसशास्त्रानुसार सासू का वाईट वागते?

MIL and DIL – Freepik.com

लग्नानंतर सासू नक्की सुनेशी वाईट का वागते यामागे मानसशास्त्रीय कारण आहे. त्याबाबत तुम्ही जाणून घ्या. 

असुरक्षिततेची भावना – सर्वात पहिले कारण म्हणजे असुरक्षिततेची भावना. मुलाच्या आयुष्यात आईची जागा ही बायको घेते. याच गोष्टीत प्रत्येक आईला नकोसे वाटते. आपले महत्त्व मुलाच्या आयुष्यात कमी होऊ नये असेच प्रत्येक आईला वाटत असते. याच कारणामुळे बऱ्याचदा सासू ही नियंत्रणात राहात नाही. 

स्वामित्व गाजवणारा स्वभाव – अनेकदा मुलाच्या आईला वाटू लागते की लग्नापूर्वी मुलाच्या आयुष्यात आपणच सर्वात जास्त महत्त्वाचे होते मात्र आता लग्नानंतर झालेल्या बायकोसह त्याला विभागून घ्यावे लागेल. आता तो बायकोचेच ऐकणार. या कारणामुळे चिडचिड वाढते आणि मुलाच्या बाबतीत अधिक स्वामित्व गाजवू लागते. 

आपल्या आवडीची सून नसणे – हे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. तसंच त्रासाचे सर्वात मोठे आणि मूळ कारण आहे. आपल्या आवडीची मुलगी मुलाने आणली नाही तर तिच्याशी योग्य वागणे सासूला अनेकदा जमत नाही. 

बदल होण्याची भीती – लग्नानंतर आपला मुलगा बदलेल या भितीनेही सासू सुनेशी नीट वागत नाही. तसंच अनेक गैरसमज मनात ठेऊन सासू आणि सुनेचे सुरूवातीपासूनच खटके उडू लागतात 

ही सर्व कारणे नक्कीच योग्य नाहीत. पण अनेकदा तुम्ही निरीक्षण केल्यास, सासू सुनेच्या वादाची हीच कारणे तुम्हाला दिसून येतील. याच कारणामुळे अनेक कुटुंबामध्ये कलह वाढतो आणि कधी कधी वाद हा विकोपाला जाऊन सासूमुळे घटस्फोट झाल्याचेही दिसून येते. 

हे सर्व टाळण्यासाठी नक्की काय करावे 

आपल्या सासूशी याबाबतीत चर्चा करा 

अनेकदा चर्चा केल्याने समस्या सुटतात. तुम्हाला तुमच्या सासूच्या काही गोष्टी आवडत नसतील. पण सासू त्या गोष्टी जाणूनबुजून करत असेल असेही नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना तुम्हाला या गोष्टी आवडत नाहीत हे सांगण्याचा प्रयत्न करा. तसंच हे सांगताना सासूचे मन दुखावणार नाही याची काळजी घ्या. सासूला उदाहरण देऊन त्यांना समजवा आणि तुमचे नाते अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करू शकता. 

नवरा आणि सासूसह काही अॅक्टिव्हिटी करा

सासू – सून वाद – Freepik.com

अनेकदा नवरा आणि सासूला समजून घेण्यासाठी त्यांच्यासह वेळ घालवणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचे जर अरेंज मॅरेज (Arrange Marriage) असेल तर नक्कीच या गोष्टीसाठी वेळ लागतो. तुमच्या नवऱ्याला आणि सासूला समजून घेण्यासाठी तुम्ही काही अॅक्टिव्हिटीज करा. एकत्र जेवायला जाणे, ट्रिपला जाणे अथवा सासूच्या आवडीच्या दुकानात तिला घेऊन जाणे, शॉपिंगचा प्लॅन बनवणे अशा गोष्टी तुम्हाला एकत्र आणू शकतात आणि तुमच्यात वाद होणार नाहीत यासाठी तुम्हाला उपयोगी ठरू शकतात.  

नवऱ्याशी बोला आणि मर्यादा ठरवा 

काही महिलांना आपली सासू आपल्याला नवऱ्यासह एकटं सोडत नाही अथवा प्रायव्हसी (Privacy with husband) देत नाही ही तक्रार असते.  त्यामुळे तुम्ही या संदर्भात आधी नवऱ्याशी बोला. लक्षात ठेवा की, तुम्ही त्यांच्या आईबाबत तक्रार करत आहात असा सूर कुठेही लागू देऊ नका. समजावून सांगण्याचा प्रयत्न करा आणि त्यातून मार्ग काढून वाद होणार नाहीत याकडे लक्ष द्या. तसंच प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो हे लक्षात घेऊन त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा. तसंच सासू काय बोलत आहे हे सतत डोक्यात विचार करत बसू नका. या गोष्टींची मर्यादा तुम्ही स्वतःच ठरवून घ्या. 

प्रत्येक गोष्टीत उलट उत्तर देऊ नका 

आपले पटत नसेल तरीही सतत उलट उत्तरे देऊ नका. आपल्या वागण्याचा कायम वाईट अर्थच निघणार असेल तर शांत राहूनच गोष्टी हाताळा. तुमची सासू तुम्हाला एखादा सल्ला देत असेल तर तो नक्की काय आहे तो समजून घ्या. ऐकून घ्या. करायचे की नाही करायचे हे तुमच्या हातात असते. त्यामुळे उगीच उलट उत्तर देऊन तुम्ही स्वतःला वाईट सिद्ध करून घेऊ नका. 

लहानसहान गोष्टीतही सासूशी वाद होत असतील तर तुम्ही या गोष्टी नक्की करून पाहा. तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमचा अनुभवही आमच्यासह शेअर करा. 

Leave a Comment