गिरगावातील अजून एक ईराणी लज्जत हरविली, ‘सनशाईन बेकरी’ होणार बंद

जुन्या सागाच्या खुर्च्या, गोल अथवा चौकोनी आकाराचे टेबल, भिंतीवर नक्षीकामांनी सजलेले आरसे. कायम उकळी घेत असलेला चहा आणि सकाळी-दुपारी बेकरीत बेक होत असलेला पाव याच्या वासाने इराणी हॉटेलांकडे आपोआपच पावले वळतात. काही मोजक्याच ईराणी चहाच्या बेकरी शिल्लक होत्या आणि त्यापैकी एक होती ती म्हणजे गिरगावातील ठाकुरद्वारच्या नाक्यावरील ‘सनशाईन बेकरी’. (Sunshine Bakery Girgaum). याच ईराणी बेकरीतून अनेक नामवंतांनी आपली कारकीर्द सुरू केली. ज्यामध्ये सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna), शिवसेना नेते प्रमोद नवलकर (Pramod Navalkar), शिवसेनेचे नेते विलास अवचट (Vilas Avachat), अभिनेता प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan), सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचाही समावेश आहे. सण, उत्सव, खेळ, राजकारण, साहित्य आदी विषयांवर चर्चा, रूपरेषा, आयोजन याच ठिकाणी करण्यात येत असे. तर राजेश खन्ना यांचे हे अत्यंत आवडते हॉटेल होते. ‘आराधना’ चित्रपट हिट होण्याआधी राजेश खन्ना तासनतास या ईराणी हॉटेलमध्ये बसून चहाचे घोट आणि सिगारेटचे झुरके मारत बसायचे असे सांगितले जाते. 

गिरगावातील नावाजलेले सनशाईन 

Sunshine Bakery

वाढत्या स्पर्धेत आणि बदललेल्या जीवनशैलीत अनेक ईराणी हॉटेल्स बंद झाली. मात्र ठाकुरद्वारच्या कोपऱ्यावरील हे ईराणी हॉटेल मोठ्या मानाने आणि डौलाने उभे होते. अचानक एक आठवड्यात हे बंद होणार म्हटल्यानंतर सर्वच आठवणी एकदम दाटून आल्यासारख्या झाल्या. आपले अस्तित्व टिकवून धरत या ईराणी हॉटेल्सने आपली चव आणि परंपरागत पदार्थही सांभाळून ठेवले. मावा केक, ब्रून बन मस्का पाव, खारी, मावा समोसा आणि पानी कम चाय ही या हॉटेलांची खरी स्पेशालिटी. गिरगाव आता या सगळ्याच पदार्थांना मुकणार हे नक्की. चाळीच्या जागी उंच इमारती आणि मेट्रोच्या वाढत्या कामामुळे गिरगावचा आधीच कायापालट झाला आहे. प्रसिद्ध इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत आणि आता सनशाईनसारखी बेकरी बंद होणे म्हणजे सर्वच गिरगावकरांसाठी हा एक भावनिक धक्का म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. 

सनशाईन बंद होण्याचे काय आहे कारण 

ठाकूरद्वारच्या नाक्यावर गेल्या 100 वर्षांपेक्षा अधिक काळ सनशाईन चालू होते. पारसी समाजातील एका ट्रस्टची ही इमारत होती. पण आता ही इमारत अधिक काळ टिकू शकेल असं वाटत नाही. तर अनेक पारसी कुटुंबीय इथून निघून गेली आहेत. मात्र सनशाईनने आतापर्यंत तग धरली होती. या हॉटेलचे मालक अशोक शेट्टी यांना तर सध्या दुःख अनावर झाले आहे, ‘गेल्या काही महिन्यांपासून मालकाकडून इमारत पाडली जाण्याचे संकेत मिळाले होते. त्यामुळे हे बंद करावे लागणारच हे माहीत होते. मात्र दोन दिवसांपूर्वी जेव्हा आता ती वेळ आलीच हे कळले तेव्हा पायाखालची जमीन सरकली. गेले 34 वर्षे हे ईराणी हॉटेल चालवत असून साधारण 30 कामगारांच्या घरावर आता अन्नपाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. समोर सगळाच अंधार पसरला आहे. पुनर्विकासानंतर पुन्हा हॉटेल सुरू करता येईल का याचेही उत्तर आम्हाला मिळालेले नाही. इथे खूपच चांगला व्यवसाय चालू होता. आता नक्की काय करायचं हेच कळत नाही’ अशोक शेट्टी यांनी आपले दुःख व्यक्त केले. 

आता ही संपूर्ण इमारतच जमीनदोस्त होणार असून गिरगावातील अजून एक ईराणी हॉटेल आठवणीत निघून जाणार याचं दुःख प्रत्येक गिरगावकराला असणारच याच शंका नाही!

Leave a Comment