घरच्या घरी बनवा गरमागरम ‘ईराणी चाय’, सोपी रेसिपी

अनेकांच्या तोंडून आपण ‘ईराणी चहा’ ऐकतो. तुम्ही कधी ईराणी चहा (Irani Chai) प्यायलात का? गोड आणि एका वेगळ्याच चवीचा हा चहा असतो. उस्मानिया बिस्किट, लुखमी, फाईन बिस्किट आणि स्वीट क्रिमसह हा चहा बनविण्यात येतो आणि याच्या क्रिमी टेक्स्चर (Creamy Texture) साठीच हा चहा अतिशय प्रसिद्ध आहे. मुंबईतील अनेक बेकऱ्यांमध्ये हा चहा मिळतो. हैदराबादी दम चाय (Hyderabadi Dum Chai) असेही या चहाला नाव आहे. ईराणी चहाच्या हैदराबादी व्युत्पत्तीच्या मागे एक मनोरंजक कहाणी आहे. असं म्हटलं जातं की, 19 व्या शतकात फारसी प्रवासी व्यापाराच्या शोधात मुंबईत आले. मुंबई, पुणे आणि मग तिथून ते हैदराबादला गेले आणि त्यानंतर तिथेच ईराणी चहाचा उगम झाला. भारतीय चहा आणि ईराणी चहा या दोन्हीच्या बनविण्याच्या स्टाईलमध्ये आणि चवीमध्ये खूपच फरक आहे. ईराणी चहा हा पाण्यात चहापत्तीसह वेगळ्या कंटनेरमध्ये उकळविण्यात येतो आणि दूध वेगळे उकळविण्यात येते. तुम्ही जर कधी ईराणी चहाचा स्वाद घेतला नसलात तर, तुम्ही घरच्या घरीही याचा स्वाद नक्कीच घेऊ शकता. बाजारामध्ये ज्याप्रमाणे ईराणी चहा मिळतो, त्याप्रमाणे तुम्ही घरीच तयार करा. 

ईराणी चहासाठी लागणारे साहित्य 

  • 2 कप पाणी 
  • 2 लहान चमचे चहापत्ती 
  • दम लावण्यासाठी कणीक 
  • 2 चमचे साखर 
  • अर्धा लीटर दूध 
  • 2 वेलची (पावडर असली तरीही चालेल)
  • 2 चमचे कन्डेन्स्ड मिल्क 

ईराणी चहा बनविण्याची पद्धत (Irani Chai Recipe)

Irani Tea – Instagram
  • ईराणी चहा बनविण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही पाणी घ्या आणि ते उकळवा. एका पॅनमध्ये पाणी घालून उकळायला लागल्यावर त्यात चहापत्ती घाला
  • या चहाला दम द्यावा लागतो. त्यामुळे पॅन एका बाजूने बंद करा आणि त्याला कणीक लावा. त्यानंतर मंद आचेवर ठेऊन दम लावा आणि साधारण 30 मिनिट्स शिजू द्या
  • आता एका दुसऱ्या पॅनमध्ये अर्धा लीटर दूध उकळून घ्या. यामध्ये 2-3 वेलची घालून दूध ढवळत राहा. दूध अर्धे झाल्यावर त्यात 2 चमचे कन्डेन्स्ड मिल्क घाला आणि ढवळा. यानंतर तुम्हाला दूध दाणेदार झालेले दिसेल. त्यानंतर गॅस बंद करा आणि दूध एका ग्लासात काढून घ्या 
  • चहाला दम लावल्यानंतर तुम्ही कणीक काढून घ्या आणि उकळलेल्या चहात साखर घालून पुन्हा उकळवा. साखर विरघळल्यावर गाळून घ्या आणि वरून दूध घाला. ईराणी चहा तयार आहे. बिस्किट्ससह हा चहा सर्व्ह करा

ईराणी चहा बनविणे सोपे आहे. मात्र याला अधिक वेळ लागतो. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याबाबत तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तसंच अधिकाधिक वेगळ्या माहितीसाठी तुम्ही dazzlemarathi.com फॉलो करा. 

Leave a Comment