1300 वर्षातून एकदा येणारे असे खंडग्रास ग्रहण आज आहे. ग्रहण काळ हा अनेक कारणांसाठी महत्वाचा असतो. यंदा येणारे खंडग्रास ग्रहण 25 ऑक्टोबर 2022 रोजी म्हणजे दिवाळीत आले आहे. ग्रहणाचा प्रभाव हा लहान मुलं, वृद्ध आणि गर्भवती मातांवर होत असतो. त्यामुळे या दिवसाची सुरुवात झाल्यानंतर काही वेध पाळले जातात. खंडग्रास सूर्यग्रहणात पृथ्वीचा काही भाग हा चंद्राच्या मागे जातो. त्यामुळे तो झाकोळला जातो. अशाप्रकारच्या ग्रहणाला ‘खंडग्रास ग्रहण’ असे म्हटले जाते. हा काळ काही अंशी वाईट मानला जात असला तरी देखील काही राशींसाठी हा काळ अत्यंत फायद्याचा आहे जाणून घेऊया या विषयी अधिक माहिती
खंडग्रास ग्रहणाचा काळ

खंडग्रास ग्रहण हे दिवाळीत आले आहे. दिवाळीत दोन अमावस्या आल्या असून एका अमावस्येला लक्ष्मीपूज आणि दुसऱ्या म्हणजेच 25 ऑक्टोबर 2022 रोजी खंडग्रास ग्रहण आले आहे. सूर्योदयानंतर याचे वेध पाळले जाणार आहेत. संपूर्ण भारतात हे ग्रहण ग्रस्तास्त दिसणार आहे. भारतात कोठेही ग्रहण मोक्ष दिसणार नाही. त्यामुळे स्पर्शकालापासून ते सूर्यास्तापर्यंत पुण्यकाल मानला जाणार आहे.
ग्रहणाचा स्पर्श: दुपारी 4 वाजून 49 मिनिटे
ग्रहणाचा मध्य : संध्याकाळी 5 वाजून 43 मिनिटे आहे.
ग्रहण मोक्ष अर्थात सूर्यास्त 6 वाजून 8 मिनिटांनी होणार आहे.
ग्रहणाचा पर्वकाल हा 1 तास 19 मिनिटे राहणार आहे.
पर्वकाळात काय काळजी घ्यावी ?
गर्भवती महिलांसाठी हा काळ अधिक महत्वाचा असणार आहे. कारण दुपारी 12.30 पासून ते संध्याकाळी 6.15 पर्यंत वेध काळ सुरु राहणार आहे.
गर्भवती महिलांनी या काळात कोणते नियम पाळावेत?
- वेध काळात भोजन करु नये
- वेध काळात पाणी पिणे,झोपणे, मल-मूत्रविसर्जन चालू शकते.
- काही झाले तरी ग्रहण काळात ग्रहण पाहू नये.
- ग्रहण काळ सुरु झाल्यानंतर कापणे, चिरणे, पिळणे व शिवणे पूर्ण बंद करावे.
- पायाची अढी मारुन किंवा मांडी खाऊन बसू नये. शक्यतो खूर्चीवर किंवा पाय सोडून बसावे.
- शक्य असल्यास देवाचे नाम:स्मरण करावे. त्यामुळे मन शांत राहते. ग्रहण काळात असणारी भीति देखील जाणवत नाही.
ग्रहणाचा कालावधी संपला म्हणजे सूर्यास्त झाला की, आंघोळ करुन तुम्ही खाऊ शकता.
कोणत्या राशीसाठी असणार ग्रहण काळ शुभ
ग्रहण काळात अनेक नियम आणि तर्कवितर्क असले तरी देखील काही राशींसाठी ग्रहणाचा हा काळ अत्यंत शुभ असणार आहे. सिंह, धनु, वृष,मकर या राशीच्या लोकांना या काळात लाभ होणार आहे. तर उर्वरित राशींना थोड्याशा अडथाळ्याला सामोरे जावे लागणार आहे.
असे असणार आहे यंदाचे खंडग्रास ग्रहण. भारताच्या काही भागातून या ग्रहणाचा आनंद लुटता येणार आहे.