महाराष्ट्रातच नाही तर अनेक ठिकाणी कुलदैवत म्हणून महालक्ष्मीची पूजा करण्यात येते. महालक्ष्मीला सर्वात पूजनीय देवी मानले जाते. महालक्ष्मीच्या पूजनाने घरात धनाची कमतरता भासत नाही आणि नेहमी देवीचा आशिर्वाद राहतो असा समज आहे. धनत्रयोदशी असो वा लक्ष्मीपूजन भारतात अनेक ठिकाणी महालक्ष्मीची (Mahalaxmi) पूजाअर्चा करण्यात येते. तर काही जण या दिवशी मुंबईतील महालक्ष्मी मंदिरातही (Mahalaxmi Mandir) देवीचे दर्शन घेण्यासाठी खास जातात. हे मुंबईतीलच नाही तर भारतातील एकमेव महालक्ष्मीचे असे मंदिर आहे जिथे भक्त मनापासून इच्छा घेऊन पोहचतात आणि त्यांची इच्छा पूर्ण होत नाही असं अजिबात होत नाही. जाणून घेऊया या महालक्ष्मी मंदिराचे वैशिष्ट्य
कुठे आहे महालक्ष्मी मंदिर?

मुंबईतील महालक्ष्मी आणि हाजीअली या परिसरात स्थित महालक्ष्मी मंदिर हे सर्वच पर्यटकांचे खास आकर्षण आहे. समुद्रकिनाऱ्यावर वसलेले हे मंदिर मुंबईतील अन्य मंदिराप्रमाणेच अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. भुलाभाई देसाई रोड येथे स्थित असणारे हे मंदिर दिवाळी आणि नवरात्रीच्या वेळी भक्तांच्या येण्याने फुलून जाते. इतकंच नाही तर इतर वेळीदेखील इथे भक्तांची रांग लागलेली दिसून येते. महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती असे तिन्ही देवींचे मिलन असणारे हे मंदिर अत्यंत खास असून येथे आल्यानंतर मनाला एक शांतता प्राप्त होते. तसंच कितीही गर्दी असली तरीही इथे कधीच आरडाओरड आणि गोंधळ दिसून येत नाही.
काय आहेत महालक्ष्मीशी संबंधित मिथ्य?
महालक्ष्मी मंदिराचा इतिहास अत्यंत रोमांचकारी आहे असं सांगितलं जातं. असं म्हटलं जातं की, खूप वर्षांआधी मुंबई शहरातील वरळी आणि मलबार हिल जोडण्याचे काम पुलाच्या माध्यमातून सुरू होते. हजारो कारागीर येथे काम करत होते. पण त्यावेळी भिंत बनविण्यात खूपच त्रास होत होता. अनेक दिवसांंच्या अथक प्रयत्नांनंतरही ही भिंत तयार होत नव्हती. त्यामुळे हे काम थांबविण्यात आले. तर त्यादरम्यान एका व्यक्तीला स्वप्नात महालक्ष्मीने दर्शन दिले आणि ‘वरळीच्या समुद्रकिनारी माझी एक मूर्ती आणि ती मूर्ती आणून समुद्रकिनारी स्थापित करा. यामुळे तुमची समस्या दूर होईल’ असे सांगितले. स्वप्नानंतर त्या व्यक्तीने असेच केले आणि त्यानंतरच ही भिंत पूर्ण बांधण्यात आली. त्यामुळे त्या दिवसानंतर या महालक्ष्मीला अनेक नवस करण्यात येतात आणि ते नवस पूर्णही होतात असा समज आहे.
महालक्ष्मीसह अन्य देवींची मूर्ती

असे म्हटले जाते की, 1813 च्या आसपास या लहानशा मंदिराला मोठे स्वरूप देण्यात आले. या मंदिरात महालक्ष्मीसह महाकालीची मूर्तीही स्थापित करण्यात आली. या देवींची यथासांग पूजाअर्चा इथे करण्यात येते. तर मंदिरातील महालक्ष्मी ही सिंहावर स्वार असून राक्षसाचा वध करत आहे अशी प्रतिमा दर्शविण्यात आली. नवरात्री आणि धनत्रयोदशी, दिवाळीच्या वेळी याठिकाणी महालक्ष्मीची ओटी भरण्यासाठी खूपच गर्दी असते. केवळ मुंबईतूनच नाही तर देशभरातून अनेक जण दिवाळीच्या वेळी महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी येतात. या मंदिराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या भिंतीवर तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करून पैशाचे सिक्के चिकटविण्यात येतात. जर कॉईन भिंतीला चिकटले तर तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होते असा समज आहे.
आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. याठिकाणी अनेकांना आलेल्या अनुभवांवरून याबाबत लिहिण्यात आले आहे. याबाबत केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने हा लेख लिहिण्यात आला आहे.