भाऊबीजेच्या दिवशी बहिण भावाला देते शाप; कुठे व का पाळतात ही प्रथा..

भावा-बहिणाच्या नात्याची, प्रेमाची साक्ष देणारा सण म्हणजे भाऊबीज. दिवाळीतील एक अत्यंत महत्वाचा दिवस. या दिवशी बहिण आपल्या भावाला ओवाळते, त्याला आशीर्वाद देते, त्याच्या प्रगतीची, दिर्घायुष्याची प्रार्थना करते आणि भाऊसुद्धा आपल्या लाडक्या बहिणीच्या सुखी-समृद्धी आयुष्याची मनोकामना करतो. मात्र भारतात अशी काही ठिकाणं आहेत जिथे भाऊबीजेच्या दिवशी बहिण चक्क आपल्या भावाला शाप देते. त्याच्या मृत्यूची मनोकामना करते. हे वाचून तुम्हालाही धक्का बसला ना? पण पूर्वापार चालत आलेली ही प्रथा आजही भारतात काही ठिकाणी पाळली जात आहे. नक्की काय आहे ही अजब-गजब प्रथा, काय आहे या मागची पौराणिक कथा, हे आपण या लेखातून जाणून घेऊया.

कुठे साजरी होते ही अजब प्रथा?

रक्षाबंधनाप्रमाणेच ‘भाऊबीज’ हा सण भावा-बहिणाच्या पवित्र नात्याचं, प्रेमाचं प्रतिक मानला जातो. दिवळीच्या ४ दिवसांमधील भाऊबीज हा एक शुभ दिवस. या दिवशी बहिण भावाला ओवाळते, छान छान गिफ्ट्सची देवाण घेवाण होते, गोडा-धोडाचं जेवण केलं जातं. मिठाई, फराळाची रेलचेल असते. आजवर आपण सगळे अशाच पद्धतीने भाऊबीज साजरी करत आलो आहोत. मात्र आपल्या देशात अशी काही ठिकाणं आहेत जिथे या शुभ दिवशी बहिण चक्क आपल्या भावाला मरणाचा शाप देते. भारतातील छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि झारखंड या तीन राज्यांतील काही ठराविक भागांमध्ये ही प्रथा साजरी केली जाते. यादिवशी बहिण आपल्या भावाला शाप देते. त्याचं, त्याचा घरा-दाराचं वाईट व्हावं अशी इच्छा व्यक्त करते. ऐकायला विचीत्र वाटत असलं तरी आजच्या काळातही ही प्रथा अगदी सर्रास पाळली जाते. 

आता एखादी प्रथा म्हटलं की सहसा त्याचा संबंध कुठल्यातरी मान्यतेशी, धार्मिक कथेशी जोडलेला असतो. या अजब-गजब प्रथेमागे देखील एक आख्यायिका सांगितली जाते. 

हेही वाचा:

नक्की काय आहे यामागची कथा?

ही प्रथा पाळण्यामागे एक खास मान्यता आहे. यामगची अख्यायिका अशी आहे की, एकदा यमराज आपल्या रेड्यावर बसून एका खास कारणासाठी पृथ्वीवर आले होते.. ते एका अशा माणसाचे प्राण नेण्यासाठी आले होते, ज्याला त्याच्या बहिणीने कधीच कुठला शाप दिला नाहीये, त्याच्याविषयी कधीच वाईट इच्छा व्यक्त केली नाहीये. त्या बहिण-भावांमध्ये कुठलेच वाद-विवाद, मतभेद नाहीयेत. ज्यांच्यामध्ये एकमेकांप्रती घृणा, ईर्षा, कपट-कटकारस्थान अशा कुठल्याच भावना नाहीयेत आणि त्यांचं नातं अगदी आलबेल आहे. अशा माणसाला आपल्यासोबत घेऊन जाण्यासाठी यमराज धर्तीवर आले होते आणि त्यांनी असा एक माणून हेरला देखील होता. मात्र त्याच्या बहिणीला या गोष्टीविषयी समजले. आपल्या हसत्या खेळत्या कुटुंबाला आणि नात्यांना यमराजाची नजर लागली आहे हे तिला समजले आणि म्हणूनच यमराज तिथे पोहचण्याआधी तिने आपल्या भावाला शिव्या शाप द्यायला, वाई-साईट बोलायला सुरुवात केली. साहाजिकच यामुळे त्यांच्या घरात कलह निर्माण झाला. घराचे चांगले वातावरण बिघडले आणि यामुळे त्यांच्या हसत्या-खेळत्या कुटुंबाला नजर लावायला आलेले यमराज नराज होऊन, तिच्या भावाला सोबत न घेताच परत निघून गेले. अशाप्रकारे त्या बहिणीने आपल्या लाडक्या भावाचे प्राण वाचवल्याची अख्यायिका सांगितली जाते. 

नजर ना लगे…

या अख्यायिकेला आजही अनेक लोक मानतात आणि त्याच धर्तीवर ही प्रथा आजही पाळली जाते. आपल्या भावाला आणि त्याच्या सुखी संसाराला यमलोकीच्या यमराजाची नजर लागू नये म्हणून भाऊबीजेच्या दिवशी बहिण आपल्या भावाला-वहिनीला शिव्या शाप देते. काही ठिकाणी तर चक्क ‘आपला भाऊ मरावा आणि वहिनी विध्वा व्हावी..’ असा शापही बहिण देते. असं म्हणतात की यामुळे तिच्या भावाला न्यायला आलेला यमराज चिडतो किंवा नाराज होतो आणि आल्या पावली निघून जातो. 

आपल्या भावाला असा शाप दिल्याचं प्रायश्चित्त म्हणून नंतर बहिण आपल्या जीभेली सुया टोचून घेते. याशिवाय अनेक भागांत यमराजाची मातीची मूर्ती तयार करुन ती ठेचण्याची प्रथा देखील पाळली जाते. नदीच्या किनारी जाऊन यमराजाच्या मूर्तीचे ठेचून ठेचून तुकडे केले जातात. असं म्हणतात की या प्रथेद्वारे यमराजाला सांगितले जाते की, ’’हे यमा आम्हाला तुझे भय नाही’’.

मंडळी, आपल्या देशांत अशा अनेक अजब-गजब प्रथा पाळल्या जातात, ज्या आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊच. 

Leave a Comment