साडीचा पदर हातावर कसा सोडायचा, सोप्या टिप्स होणार नाही त्रास

आपल्याकडे अनेक महिलांना असो वा अगदी मुलींनाही कोणत्याही कार्यक्रमाला साडी नेसायला (Saree Draping) नक्कीच आवडते. साधारण वर्षभरात सण असतात आणि सण नसले तरीही अनेकांकडे लग्नसराई तरी नक्कीच असते. त्यामुळे महिलांना नटण्याथटण्यासाठी खूपच संधी मिळत असतात. मग अशावेळी साडी नेसायला आणि ती सावरायला हे दोन्ही जमायला हवे. काही मुलींना पदर हातावर सोडायला आवडतो पण तो सावरणं झेपत नाही. साडीच्या निऱ्यांसह साडीचा पदरही तितकाच महत्त्वाचा आहे. साडीचा पदर हातावर सोडल्यावर काही जणांना नक्की तो कसा सावरायचा अथवा पदर गळ्याशीच येतोय अशा विविध तक्रारी असतात. मग साडीच्या पदरामुळे घातलेले दागिनेच नीट दिसत नाहीत असेही अनेकांना वाटते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे साडीचा पदर हातावर सोडल्यावर तुम्ही तुमच्या वयापेक्षा अधिक तरूण दिसता. पण तुमची उंची कमी असेल तर तुम्ही साडीचा पदर पिनअप करणे अधिक चांगले ठरते. पण तरीही तुम्हाला साडीचा पदर हातावर (Saree Pallu) सोडायचा असेल तर तुम्ही या लेखात दिलेल्या टिप्स नक्की वापरून पाहा. कारण हातावर पदर (How to drape perfect pallu on hand) सोडून मिरवायची स्टाईल काही वेगळीच असते म्हणा! जाणून घ्या अशा काही सोप्या टिप्स (Easy Tips)

साडीचा पदर असा सोडा हातावर 

How to drape saree pallu on hand
  • तुम्हाला जर साडीचा पदर संपूर्ण हातावर सोडणे शक्य नसेल पण तुम्हाला पूर्ण पिनअपही करायचा नसेल तर तुम्ही ब्लाऊजच्या खालच्या बाजूला अर्थात पोटाच्या वर दोन ते तीन पदराच्या बारीक घड्या करून पिन लावा आणि मग बाकीचा पदर तुम्ही मोकळा सोडा म्हणजे पदर काढला असंही दिसत नाही आणि तुमचा पदर अतिरिक्त बाहेर लोळत नाही
  • तुमच्या उंचीनुसारच तुम्ही पदर हातावर घ्या. पदर आपल्या पायात येणार नाही अथवा जमिनीवर लोळणार नाही हे पाहूनच तुम्ही पदर हातावर सोडा. साडी नेसतानाच याचा अंदाज घेता येतो. खांद्यावरून पदर सोडताना साधारण गुडघा अथवा गुडघ्याच्या किंचित खाली येईल असाच पदर तुम्ही काढा. अति लांब झाल्यास, तुमचा वा इतर कोणाचाही पाय अडकून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच पदर लोळून त्याला माती लागते आणि त्यामुळे साडीदेखील खराब होते त्यामुळे याची काळजी घ्या
  • पदर पिनअप करताना तुम्ही अगदी गळ्याशी पदर घेऊ नका. तसंच पिन तुम्ही ब्लाऊजच्या मागच्या बाजूला थोडी खालीच लावा जेणेकरून पदर गळ्याशी येणार नाही आणि तुमचे दागिनेदेखील व्यवस्थित दिसतील. तसंच पदर गळ्याशी घेतल्यास, तुमच्या ब्लाऊजचा आकार व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे सहसा पदर काढताना थोडा खालीच घ्या आणि मग पिनअप करा. त्यामुळे पदर हातावर व्यवस्थित सोडून तुम्ही वावरू शकता. हा पदर स्थिर राहतो आणि साडीची गुंडाळी झाली आहे असेही समोरून दिसत नाही
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे साडीच्या निऱ्या तुम्ही व्यवस्थित खोचाव्यात. पदर हातावर घेणार म्हणून कशाही निऱ्या खोचू नयेत. कारण तुमचा पदर हातावर व्यवस्थित राहण्यासाठी आणि पोट फुगीर दिसू नये म्हणून साडीच्या निऱ्या सरळ रेषेत काढणे अत्यंत गरजेचे आहे. निऱ्या खोचल्यावर तुम्ही खालून हात घालून निऱ्या ओढून घ्या. म्हणजे निऱ्यांचा पोंगा आलेला दिसणार नाही आणि पदरही नीट राहील
  • पदर हातावर घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे पिन. तुम्ही पदर काढल्यानंतर पिनअप करण्याची जागा व्यवस्थित ठरली की, पदर हातावर घेणे अत्यंत सोपे जाते. त्यामुळे अगदी खांद्यावर पिनअप न करता खांद्याच्या मागच्या बाजूला पिनअप करा. जेणेकरून पदर हातावर व्यवस्थित घेता येईल आणि दुसऱ्या बाजूने तो तुम्ही ओढून घेतलात की, तुमचा बांधाही व्यवस्थित उठावदार आणि आकर्षक दिसतो

या टिप्सचा वापर तुम्ही केल्यास, साडीत तुम्ही आकर्षक आणि उठावदार दिसाल यात अजिबात शंका नाही. पदर सोडून काम करता येत नाही अशी तक्रारही करायला तुम्हाला जागा उरणार नाही हे नक्की! 

Leave a Comment