महागड्या पैठणी साड्यांची अशी घ्यावी काळजी

 साड्यांची राणी अशी ज्या साडीची ओळख आहे ती पैठणी साडी (Paithani Saree)  महिलांकडे नसेल असे अजिबात होणार नाही. प्रत्येकीकडे एकतरी पैठणी असतेच.आता ती साड्यांची महाराणी आहे म्हटल्यावर तिची तेवढी किंमत आलीच. हल्ली पैठणी काठ असलेल्या कितीही साड्या आल्या तरी देखील खरी पैठणी ती खरी पैठणीच असते. आजच्या घडीला खरी पैठणी घ्यायची झाली तर ती अगदी 7 हजार रुपयांपासून ते अगदी लाखांच्या घरात मिळते. अशी काहीसे हजार रुपये खर्चून घेतलेली साडी नीट ठेवणे आलेच. खरी पैठणी ही हँडमेड असते. त्यामुळे तिची काळजी घेणे गरजेचे असते. तुमच्या कपाटात असलेली पैठणी तुम्ही कशी ठेवली आहे? आताच काढा आणि अशाप्रकारे पैठणीची काळजी घ्या. 

घडी मोडत राहा 

पैठणी साड्या या हँडमेड असतात. त्यासाठी वापरले जाणारे सिल्क हे चांगले असले तरी देखील जर साडी घडीतच राहिले तर ती साडी फाटण्याची शक्यता अधिक असते. जर तुम्ही एखादी पैठणी ड्रायक्लीन करुन आणली असेल आणि ती सुस्थितीत राहावी म्हणून जर तुम्ही ती तशीच ठेवून दिली असेल तर ती काढा आणा त्याची घडी मोडून विरुद्ध दिशेने घडी घालून ठेवा त्यामुळे तुमची साडी घडीत फाटणार नाही. तिचे आयुष्यही वाढेल. 

सतत ड्राय क्लीन नको

सतत मोडत राहा साडीची घडी

कोणतीही महागडी साडी घेतली तर ती साधारण 7 ते 8 वापरानंतरच ड्रायक्लीन करणे गरजेचे असते. कारण सतत ड्रायक्लीन केल्यामुळे साडीचा पोत खराब होण्याची भीती असते. त्यामुळे साडी बरेचदा वापरुन झाली मी मगच तुम्ही ड्रायक्लीनला द्या. जर साडी एकदा नेसून चुरघळली असेल तर साडीची इस्त्री करुन घेण्यास काहीच हरकत नाही. पण इस्त्री करताना ती हलक्या हाताने करा. घरीच केली तरी देखील उत्तम 

फडताळात ठेवा साडी 

जर एखादी पैठणी तुम्ही लवकर नेसण्याचा योग नसेल आणि ती तुम्हाला ठेवून द्यायची असेल तर अशावेळी तिला पॅक करताना ती नीट कोरडी आहे का? तिची घडी योग्य आहे का ते पाहून घ्या. त्यानंतर साडीची नीट घडी करुन बाजारात मिळणाऱ्या कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवा. फडताळात साडी बांधून ठेवली तर ती चांगली राहते. पण वर सांगितल्याप्रमाणे महिन्यातून एकदा तरी ती साडी काढून बघा. 

हँगरला साडी लावताना

खूप जणांकडे मोठं कपाट असेल तर सगळ्या साड्या हँगरला नीट लावून ठेवल्या जातात. हँगरला अशा महागड्या साड्या लावताना त्या हँगरच्या दिशेने सतत ठेवल्यामुळे फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे साडी नेसण्यात येत नसेल तर अशावेळी साडी घडी करुन फडताळात बांधलेली बरी. 

कापूर किंवा चंदनाचा तुकडा

अनेकदा ठेवणीतल्या साड्या काढल्या नाही की, त्यांना एक वेगळाच कुबट वास येऊ लागतो. अशा साड्या कितीही स्वच्छ असल्या तरी देखील त्या तशाच नेसायची इच्छा होत नाही अशावेळी साडी घडी केल्यानंतर त्या सोबत चंदनाचा तुकडा किंवा कापडात बांधून कापराचा तुकडा ठेवला तर त्याचा वास अधिक काळासाठी टिकून राहतो. साड्यांना कुबट वास देखील येत नाही. 

आता तुमच्याकडेही महागडी पैठणी (Paithani Saree) असेल तर तुम्ही अशी काळजी घ्यायला काहीच हरकत नाही. 

Leave a Comment