Diwali 2022: दिवाळीच्या दिवशी का खरेदी करतात झाडू, गरीबी होते दूर

Diwali 2022 Significance Of Broom: धनदौलत, वैभव आणि ऐश्वर्य देणारा असा हिंदू धर्मातील दिवाळी सण आता अगदी आठवड्यावर येऊन ठेपला आहे. 22 ऑक्टोबर, 2022 रोजी धनत्रयोदशीच्या दिवशीपासून या सणाला सुरूवात होत आहे. तसं तर दिवाळी एकच दिवस असते पण पाच दिवस याचे महापर्व आपल्याकडे साजरे करण्यात येते. धनत्रयोदयीपासून सुरू झालेली दिवाळी भाऊबीजेच्या दिवशी संपते. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीदेवता प्रसन्न होते आणि घरात भरभरून धनप्राप्ती मिळते असा समज आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीदेवीशी संबंधित प्रत्येक वस्तूचा आदर करावा आणि त्या प्रत्येक वस्तूची पूजा करावी असंही म्हटलं जातं आणि म्हणूनच दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूचीही पूजा केली जाते. दिवाळीच्या दिवशी नेमकी झाडू खरेदी का करतात याचे हेच कारण आहे. जाणून घ्या अधिक माहिती. 

झाडूला लक्ष्मीचे रूप मानतात

सौजन्य – Freepik.com

घरातील झाडूला लक्ष्मीचे (Significance Of Broom During Diwali) स्वरूप मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवाची जशी पूजा केली जाते. तशीच झाडूची खरेदी करून पूजा केल्यास, माता लक्ष्मी प्रसन्न होते असं मानण्यात येते. केवळ धनत्रयोदशीच्या दिवशीच नाही तर दिवाळीच्या कोणत्याही दिवशी तुम्ही झाडू खरेदी केल्यास, आपल्याकडे हे शुभ मानले जाते. 

धार्मिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी केल्यानंतर त्याचा उपयोग दिवाळीच्या दिवशी केल्यास अर्थात दिवाळीच्या दिवशी या झाडूनेच घरातील साफसफाई आणि स्वच्छता केल्यास, घरात सुखसमृद्धी, धनधान्य कायम राहते आणि घरातील आर्थिक संकटेही नाहीशी होतात. इतकंच नाही तर दिवाळीच्या दिवशी झाडूने साफसफाई करून झाल्यावर ती झाडू लपवून ठेवल्यास, अशा व्यक्तीच्या घरातील धन वाईट नजरेपासून वाचते आणि गुप्त राहते असाही समज आहे. तर काही ज्योतिषांच्या मते झाडूचा सकारात्मक प्रभावामुळे वास्तुदोषापासूनही सुटका मिळते. 

काय सांगते वास्तुशास्त्र (What Vastu Shastra Say About Broom)

सौजन्य – Freepik.com

वास्तुशास्त्रानुसार, घरात झाडूवर सतत कोणाची नजर पडत राहील अशा ठिकाणी ठेवली अथवा झाडूला सतत एखाद्याचा पाय लागत राहिला तर लक्ष्मीदेवी नाराज होते आणि घरात गरीबी येते अशा पद्धतीचे संकेत मिळतात असे म्हटले जाते. पण झाडू जर कोणाच्या नजरेत भरणार नाही अशी ठेवली अथवा जमिनीवर आडवी ठेवली तर घरात कधीही दारिद्र्य येत नाही असा समज आहे. अशा व्यक्तींची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत राहाते आणि धनप्राप्तीचे अनेक मार्ग अशा व्यक्तींसाठी खुले होतात. 

याशिवाय दिवाळीच्या दिवशी मंदिरामध्ये झाडूचे दान केल्यास, केवळ धनवृद्धीच होत नाही तर त्यामुळे आरोग्यही चांगले राहाते असाही समज आहे. झाडू घरातील कचरा बाहेर काढून नकारात्मक ऊर्जा घराबाहेर काढते आणि त्यामुळेच लक्ष्मीचा वास घरात राहातो असा समज आहे आणि म्हणूनच दिवाळीच्या दिवशी झाडू खरेदी केली जाते. केवळ खरेदीच नाही तर त्याची पूजाही करण्यात येते. 

आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. पूर्वपरंपरागत असलेल्या समजांबाबत या लेखातून माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. दिवाळीच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा! (Happy Diwali)

Leave a Comment