BB Marathi S4: तडका – अंड्याची बुर्जी आणि राखी सावंतची मर्जी…

गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात (Bigg Boss Marathi Season 4) वाईल्ड कार्डमध्ये कोण येणार याची चर्चा होती आणि आता यावरून पडदा बाजूला सरला आहे. बिग बॉसची पहिली बायको अर्थात राखी सावंत (Rakhi Sawant) ची एंट्री मराठी बिग बॉसमध्ये झाली आहे. तर तिच्याबरोबर तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकम (Vishal Nikam), मीरा जगन्नाथ (Meera Jagannath) आणि आरोह वेलणकर (Aroha Velankar) यांनी एंट्री केली आहे. मात्र पुन्हा एकदा बिग बॉसचं घर गाजवायला राखी तयार आहे हे प्रोमोतून दिसून आलं आहे. आल्या आल्या अपूर्वाच्या नावाने गर्जना करत राखीने आपलं टारगेट नक्की कोण आहे हेच जणू काही घोषित केल्यासारखं दाखवून दिलं आहे. तर राखीच्या येण्याने आता या पर्वात चांगलाच तडका लागणार आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. 

राखी द एंटरटेनर (Rakhi The Entertainer)

राखी सावंत हे नाव कोणाला माहीत नाही असं नाही. आतापर्यंत राखीने बिग बॉसचे अनेक सीझन गाजवले आहेत मात्र ते हिंदीमध्ये. पण आता पहिल्यांदाच राखी आपल्या मातृभाषेतील अर्थात मराठी बिग बॉसमध्ये धमाल करायला आणि मनोरंजन करायला येत आहे. मागच्या तीन पर्वांपेक्षा या पर्वाचे टीआरपी चांगले नाही अशीच चर्चा सुरू होती. मात्र आता या चॅलेंजर्समुळे या खेळाला एक वेगळीच दिशा मिळेल हेदेखील नक्की. त्यातही राखी या खेळातील तरबेज खेळाडू आहे. त्यामुळे जिथे जिथे खेळ गुळमुळीत वाटत आहे, तिथे योग्य तडका राखी लावेलच आणि त्यासह मीरा जगन्नाथनेही आपला खेळ मागच्या वर्षी अप्रतिम खेळला होता. या दोघींच्या येण्याने सगळ्याच प्रेक्षकांना उत्साह आला आहे. तर आल्या आल्या राखीने आपण कोण आहोत हे दाखवून दिलेच आहे. अपूर्वा नेमळेकरचा माज योग्यरित्या उतरविण्यासाठीच आपण आलो आहोत अशा आविर्भावात राखीने घरात पाऊल ठेवले आहे. तर, ‘तुमच्या सर्वांची आई आहे मी, बिग बॉसची पहिली बायको… अंड्याची बुर्जी आणि राखीची मर्जी इथं चालणार’ असं म्हणत सगळ्यांनाच तिने आपल्या मराठीनेही अवाक केले आहे. राखीने आतापर्यंत मराठीमध्ये काम केलेले नाही. मात्र संपूर्ण जगात आपल्या वागणुकीने आणि एंटरटेनमुळे तिने नाव कमावले आहे. राखी अत्यंत फटकळ, मात्र तितकीच प्रेमळही आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे. मात्र ती कोणत्या वेळी काय करेल याचा अंदाज कोणालाच बांधता येणार नाही. त्यामुळे आता घरातील सदस्यांच्या समोर नक्की काय वाढून ठेवलं आहे हे लवकरच कळेल. 

विशालचे स्वागत 

सोशल मीडियावर विशालच्या प्रोमोमुळे सगळ्यांनाच उत्साह आला आहे. खेळ नक्की कशाला म्हणतात आणि टास्क कसा खेळतात हे आता घरातील सदस्यांना नक्की कळेल अशा आशयाचे अनेक मेसेज आता सोशल मीडियावर फिरू लागले आहेत. विशालने उत्तम टास्क खेळत मागच्या वर्षी अर्थात तिसऱ्या पर्वाची ट्रॉफी आपल्या खिशात घातली होती. त्यामुळे आता यावर्षी या चॅलेंजर्सना आणून मेकर्सने एक नवी खेळी खेळली आहे. चौथ्या पर्वाचा टीआरपी वाढविण्यासाठी ही नक्कीच उत्तम खेळी आहे असं अनेकांना वाटत आहे. 

दरम्यान या चौघांच्या घरात येण्याने आता घरातील सदस्यांची डोकेदुखी वाढणार हे मात्र नक्कीच. कारण हे चौघेही सदस्यांना नक्कीच शांत राहू देणार नाहीत आणि त्यातही राखी घरात नक्की काय करणार याचीही सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Leave a Comment