लहान मुलांना सतत डायपर लावताय, एकदा वाचाच

लहान बाळांच्या सगळ्या गोष्टींची काळजी आपण अगदी नीट करत असतो. त्यांना कसलाही त्रास होऊ नये यासाठी उत्तम प्रॉडक्ट निवडणेच पालक पसंत करतात. पूर्वीपेक्षा हल्लीची मुलं खूपच लहान वयात प्रवास करायला सुरुवात करतात. त्यामुळे होतं असं की, आपण अनेकदा मुलांना डायपर लावतो. सू-शीची कोणतीही काळजी न करण्यासाठीच हे डायपर असतात. मुलांना एकदा डायपर घातले की, पालकांनाही हायसे वाटते. कारण त्यांच्या मागे लागून शी-सू साफ करण्यापेक्षा डायपर खराब झाल्यानंतर काढणे अधिक सोयीचे वाटते. पण याच डायपरमुळे मुलांना काही त्रास होऊ लागले आहेत. स्किन रॅश,शी-शूची संवेदना नसणं  अशाच बऱ्याच अडचणी पुढे येतात. तुम्हीही मुलांना सतत डायपर लावत असाल तर एकदा वाचा (side effects of diaper)

डायपर कधी लावावे ?

मुलांना डायपर लावताना

बऱ्याचदा पालकांना डायपर कधी लावावे हेच कळत नाही. कारण डायपर हे दिवसभर वापरण्यासाठी नसतेच मुळी. तुम्ही बाहेर जाणार असाल किंवा काही तास मुलांना घेऊन बाहेर जाणार असाला अशावेळीच डायपरचा प्रयोग करणे उचित असते. पण आपल्यातील कित्येक माता या मुलांना आंघोळीनंतर जे डायपर घालतात ते घालूनच ठेवतात. त्यामुळे बाळ  डायपरमध्ये किती काळ आहे ते कळत नाही. तान्ह बाळ असेल तर ते शी-सूच्या वेळी थोडंस रडून तरी दाखवतं. पण दोन-तीन वर्षांची मुलं ही हुशार असतात. त्यांना डायपर लावले हे माहीत झाल्यामुळे ते शी-सू होतेय याबद्दल काही सांगत नाहीत. याचा परिणाम असा की, मुलांना शी-सूची संवेदना आणि त्यानंतर पालकांना सांगायचे त्यांना कळत नाही. अनेकदा मुलंही डायपर काढल्यानंतर आहेत त्या जागी लघवी करतात याचे कारण त्यांना दिवसभर डायपरमध्ये राहायची सवय झालेली असते.  त्यामुळे त्यांना योग्य सवय लावणे कठीण जाते. त्यामुळे डायपर कधी लावायला हवे याचीही माहिती पालकांना हवी 

डायपर रॅश

बाळांना होणारा हा त्रास अगदी कॉमन आहे. खूप वेळा असे दिसून आले आहे की, मुलांना सतत डायपर घातल्यामुळे त्यांच्या गुप्तांगाच्या ठिकाणी त्यांना चांगलेच रॅशेश येतात. डायपरची एक क्षमता असते. त्यापलीकडे ते भरले तर त्याचा ओलावा हा बाळांच्या अंगाला सतत लागत राहतो. आपलाच एखादा भाग जर जास्त पाण्यात राहिला तर काय होते हे आपल्याला माहीत आहे. बाळांच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. त्यांची त्वचा ही फारच नाजूक असते. अशातच काही जणांना मुलांचे डायपर कधी घातले हे लक्षात राहात नाही. त्यामुळे होते असे की, मुलांना रॅशेश येतात. हे रॅशेश गंभीर असू शकतात जर त्याचे रुपांतर इन्फेक्शनमध्ये झाले तर त्याचा त्रास अधिक वाढतो. पर्यायी बाळं चिडचिडी होतात.

शी-सूची सवय लागणे होते कठीण

पूर्वीच्या काळी एखाद्या घरी लहानबाळ असेल तर ते पटकन कळून यायचे याचे कारण असे की, लंगोट सुकवलेले दिसायचे. तोच त्रास टाळण्यासाठी हल्लीचे पालक डायपर स्विकारतात. ती सवय मुलांना तशीच लावून ठेवली तर मुलांना शी- सू झालेले कळत नाही. डायपर घातले नसेल तर ते डायपर घातले असे समजून कुठेही शी-सू करतात. जे अधिक त्रासदायक आहे. कारण मुलं थोडी मोठं झाली की, त्यांना ही सवय लावणे कठीण  होऊन जाते. 

आता मुलांना डायपरची सवय लावताना या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा.

Leave a Comment