मुलांना लवकर उठवणं होतंय कठीण, तर वापरा सोप्या टिप्स

मुलांना सकाळी लवकर उठवून शाळेत पाठवणं तुमच्यासाठी सर्वात कठीण काम ठरतंय का? कितीही वेळा हाक मारून उठवलं तरीही तुमचं मूल हे झोपेतच राहतंय का? तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी त्याचं कारण जाणून घेण्याची गरज आहे. वास्तविक लहान मूल असो वा मोठा माणूस प्रत्येकाला काही विशिष्ट काळाच्या झोपेची गरज असते. मुलांच्या बाबतीत जर ही गोष्ट असेल तर मात्र त्यांच्यासाठी जितकं खाणं गरजेचे आहे तितकीच झोपही गरजेची आहे. कारण चांगल्या झोपेमुळेच मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास होणार असतो. तसंच झोपेमुळेच मुलांची प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि हंगामी आजारांचा मुलांना सामना करता येतो. पण सध्या टी. व्ही., मोबाईल या सगळ्या गॅझेट्समुळे मुलांच्या झोपेचं अक्षरशः खोबरं झालं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रात्री उशिरापर्यंत जागं राहिल्यामुळे मुलांची झोप पूर्ण होत नाही. किती वर्षाच्या मुलांसाठी किती तास झोप महत्त्वाची आहे हे या लेखातून आम्ही सांगत आहोत. तुम्ही जर या टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला मुलांना लवकर उठवणं नक्कीच त्रासदायक होणार नाही.  

वयानुसार किती तास हवी झोप 

सौजन्य – Freepik.com

मुलांची झोप ही त्यांच्या वयानुसारच असते. नवजात बाळाच्या बाबतीत असे तर 24 तासात किमान 18 तासांची झोप बाळाला गरजेची असते. तर बाळ साधारण 4 ते 12 महिन्याचे असेल तर अशा बाळाला दिवसभरात किमान 12 ते 16 तासांची झोप गरजेची असते. तर साधारण 1 आणि  2 वर्षाच्या मुलांना किमान 11 ते 14 तासांच्या झोपेची गरज भासते. ज्या मुलांचे वय हे 3 ते 5 वर्षादरम्यान आहे, अशा मुलांना किमान 13 तास झोप घेणे आवश्यक आहे. आणि वयाच्या 6 व्या वर्षापासून ते 12 व्या वर्षापर्यंत मुलांना 9 ते 12 तास इतक्या झोपेची गरज असते. या वयात मुलं शाळेत जात असतात. त्यामुळे त्यानुसार तुम्ही त्यांची झोप पूर्ण होईल याकडे लक्ष द्यायला हवे. तर साधारण 13 व्या वर्षापासून ते 18 व्या वर्षापर्यंतच्या मुलांना किमान 8 ते 10 तास झोपेची आवश्यकता असते. 

मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी टिप्स 

सौजन्य – Freepik.com

मुलं लहानपणापासून ज्या वातावरणात वाढतात, जे पाहतात तशीच ती वागतात. त्यामुळे केवळ मुलांसाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबाने झोपेचे महत्त्व समजून घ्यायला हवे. तसंच वेळेवर झोपायची सवयही लाऊन घ्यायला हवी. 

  • प्रत्येक गोष्टीचे शेड्युल बनवून घ्या. योग्य वेळी झोपणे, योग्य वेळी जेवण करणे, बाहेर खेळायला जाणे या सर्व गोष्टींची वेळ ठरवून घ्यावी 
  • मुलं कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये न अडकून राहाता, शारीरिक आणि मानसिक थकतील अशा खेळांची त्यांना सवय लावावी. तुमचं मूल व्यवस्थित खेळलं तर थकून त्याला रात्री व्यवस्थित वेळेवर झोप येते 
  • तुमचं बाळ झोपतं त्याजागी कोणताही डिव्हाईस ठेऊ नये. झोपण्याच्या आधी तुमचे मूल जर मोबाईल अथवा टी. व्ही. पाहण्याचा हट्ट करत असेल तर वेळीच तुम्ही त्यापासून त्यांना दूर करा
  • बेडरूममध्ये शांत जागी मूल अगदी सहज झोपते. त्यामुळे झोपताना अगदी मंद प्रकाश येईल असाच दिवा ठेवा. बेडरूमध्ये सतत आवाज करू नका. मुलांच्या झोपेत सतत अडचण येणार नाही याची काळजी घ्या  

Leave a Comment