नवजात बाळाला का घालतात हातमोजे, काय आहे फायदे

जेव्हा बाळाच्या काळजीबाबत (Baby Care) आपण बोलतो तेव्हा आपल्याला माहीत असतं की नवजात शिशुच्या पालकांना अनेक लहानसहान गोष्टींचीही काळजी घ्यावी लागते. मग बाळाचे कपडे असोत वा बाळाच्या त्वचेबाबत कोणतीही काळजी. बाहेरच्या वातावरणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी बाळांना व्यवस्थित कव्हर करणे आणि त्यांची व्यवस्थित काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्येच नवजात बाळाला काही महिने हातमोजे घालून ठेवणेही गरजेचे असते. पण काही लोकांना बाळांना हातमोजे घालून ठेवणं पटत नाही. काही जणांना हातमोजे घातलेच पाहिजेत असं वाटतं. त्यामुळे नवजात बाळाला हातमोजे घालावे की घालू नये आणि याचे नक्की काय फायदे आहेत, याबाबत अधिक माहिती या लेखातून आपण घेऊया. 

बाळांना हातमोज्यांची आवश्यकता का?

सौजन्य – Freepik.com

जेव्हा बाळ जन्माला येतं, तेव्हा त्यांचे हात हे थंड असतात. याशिवाय काही लहान बाळांची नखंही मोठी असतात, झोपेत अनेकदा बाळ हे स्वतःलाच ओरबाडून घेते. या दोन्ही समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी हातमोज्यांची मोठी मदत होते. तुमचे बाळ जागे असेल अथवा झोपलेले असेल, कायम हातपाय मारत असते आणि नखं मोठी असल्याने स्वतःलाच नुकसान पोहचवू शकते. हातमोज्यांमुळे नखं लागत नाहीत आणि त्यामुळे बाळ सुरक्षित राहते. तर नॅशनल स्लीप फाऊंडेशननुसार, झोपताना बाळाने अचानक नख मारू नये, यासाठी हातमोज्यांचा उत्तम वापर करून घेता येतो. 

हातमोज्यांची गरज केव्हा भासत नाही 

हातमोजे घालणे जिथे गरजेचे मानले जाते, तिथेच काही जणांच्या मतानुसार, सतत हातमोजे घालणंही योग्य नाही. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या बाळाला कपड्यात व्यवस्थित गुंडाळून ठेवत असाल तर तेव्हा हातमोजे घालण्याची गरज नाही. आपले बाळ स्वतःला इजा पोहचवू शकते अशी भीती तुम्हाला असेल तर तुम्ही वेळोवेळी बाळाच्या हाताची नखे व्यवस्थित आणि जपून कापावी. अति गरमी वा अति थंडी बाळांना दोन्ही सहन होत नाही. त्यामुळे यानुसार बाळांना हातमोजे घालावे वा घालू नयेत. 

काय आहे हातमोजे घालण्याचे फायदे 

सौजन्य – Freepik.com

हातमोजे घालायचे की नाही घालायचे हे प्रत्येक बाळानुसार ठरते. पण हातमोजे घातल्याचे फायदेही आहेत आणि याकडे दुर्लक्ष करून नक्कीच चालणार नाही. हातमोजे घालण्याचे काही फायदे खालीलप्रमाणे – 

  • बाळाची जसजशी हालचाल सुरू होते आणि विकसित होते, त्यानुसार बाळ हात जोरजोरात मारायला लागते आणि यामुळे स्वतःलाच इजा करून घेते. यामुळे अधिक घावदेखील होण्याची शक्यता असते. पण हातमोजे घातल्यास, मुलं सुरक्षित राहतात 
  • आई स्तनपान देत असेल तेव्हा बरीच मुलं आईचे स्तन घट्ट पकडतात आणि त्यावेळी आईसाठी हे त्रासदायक ठरू शकते. पण हातमोजे घातल्यास, आईला त्रास होणार नाही आणि स्तनपानही नीट होऊ शकते
  • बऱ्याच मुलांना सतत हात तोंडात घालायची सवय असते. हात स्वच्छ राखण्यासाठी हातमोज्यांचा उपयोग होतो. त्यामुळे मुलं सतत आजारी पडत नाहीत 
  • अंगठा अथवा एखादे बोट चोखत राहण्याची सवय अनेक मुलांना लागते. पण हातमोजे घातले असतील तर हे असं करणं शक्य होत नाही. त्यामुळे ही सवय लागत नाही 
  • हात चावायचीही अनेक लहान बाळांना सवय असते. पण हातमोजे घातल्यास, मुलांना तसं करणं शक्य होत नाही 
  • मुलांचे हात गरम राखण्यासाठीही याचा उपयोग होतो. विशेषतः थंडीच्या दिवसात याचा अधिक उपयोग होतो. मुलांची बोटे गरम ठेवण्यास आणि मुलांना आरामदायी अनुभव घेता येतो. 

Leave a Comment