लठ्ठपणा आणि मानसिक आरोग्य रोग यांचा परस्पर संबंध आहे. असे दिसून येते की मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे लठ्ठपणा येऊ शकतो आणि काही वेळा लठ्ठपणामुळे मानसिक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. जे रुग्ण लठ्ठपणाने ग्रासलेले असतात त्यांना समाज नकारात्मक पद्धतीने पाहतो आणि त्यांना कमी इच्छाशक्ती आणि आत्मसंयम असलेल्या व्यक्ती म्हणून नेहमीच त्यांची टिंगल उडविली जाते. त्यांचे मूल्य त्यांच्या क्षमतांच्या आधारावर नव्हे तर बाह्य स्वरूपाच्या आधारे ठरवले जाते. ते सतत उपहासाचे विषय असतात आणि त्यांच्या वजन आणि शरीराच्या आकाराबद्दल त्यांना सतत अवास्तव सल्ला मिळतो. याचा शरीराच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होतो आणि अखेरीस अनेक व्यक्तींमध्ये कमी आत्मसन्मान आणि नैराश्य येऊ शकते. असे दिसून येते की पुरुषांपेक्षा स्त्रियांना लठ्ठपणाशी संबंधित नैराश्याचा धोका जास्त असतो. डॉ. अपर्णा गोविल भास्कर, बॅरियाट्रिक आणि लॅपरोस्कोपिक सर्जन, सैफी, अपोलो स्पेक्ट्रा, नमाहा आणि क्युरे हॉस्पिटल, मुंबई यांच्याकडून आम्ही अधिक जाणून घेतले.
जीवनात प्रचंड तणाव

कोविड 19 साथीच्या आजारादरम्यान, बहुतेक देशांमध्ये सामाजिक अंतराच्या नियमांमुळे लठ्ठपणाने ग्रस्त रुग्णांना घरातच राहण्यास भाग पाडले. यामुळे लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या जीवनात प्रचंड तणाव आणि अनिश्चितता निर्माण झाली. यामुळे त्यांना जास्त खाणे आणि बैठी जीवनशैलीचा धोका निर्माण झाला, त्यामुळे त्यांचे वजन आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली.सोशल मीडियावरही लठ्ठ व्यक्तींवर आधारित मीम्स आणि वजनासंबंधीत विनोदांनी भरलेला दिसून येत आहे. लठ्ठपणानेग्रस्त व्यक्ती सर्वसामान्यांपेक्षा आळशी, कमी सक्रिय आणि इच्छाशक्ती मंदावलेल्या दिसून येऊ शकतात.
अधिक नैराश्य आणि चिंता

मीडिया चित्रणांमध्येही वजनाच्या पक्षपाती वृत्तीचे आंतरिकीकरण मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम घडवून आणत असल्याचे दिसून आले आहे, ज्यामुळे अधिक नैराश्य आणि चिंता, कमी आत्म-सन्मान, शरीराच्या प्रतिमेच्या समस्या उद्भवतात. वजन आधारित आंतरिकीकरण देखील मोठ्या भावनिक त्रासाशी संबंधित आहे आणि नैराश्याशी जोडले गेले आहे. जे रुग्ण मानसिक आरोग्याच्या आजाराने ग्रासले आहे, त्यांना देखील लठ्ठपणा विकसित होण्याची शक्यता जास्त असते. इन्सुलिन प्रतिरोध आणि मेटाबॉलिक सिंड्रोम स्किझोफ्रेनियाशी संबंधित असल्याचे दिसून आले आहे. अनेक अँटीसायकोटिक औषधे देखील वजन वाढवतात आणि इन्सुलिनच्या संवेदनशीलतेवर परिणाम करतात. आरामदायी खाणे, आरोग्यदायी जेवण तयार करण्यात रस नसणे, आवेगपूर्ण खाणे आणि काहीवेळा अन्नाचे व्यसन यांच्याशीही अनेक मानसिक विकार संबंधित आहेत. परिणामी या रुग्णांमध्ये वजन वाढल्याने मानसिक समस्यांमध्ये आणखी वाढ होते आणि त्यामुळे एक दुष्टचक्र तयार होते. त्यामुळे तुम्ही लठ्ठ असाल तर तुम्ही वेळीच सावरून याकडे योग्यरित्या लक्ष द्यायला हवे.