Narak Chaturdashi 2022: या ठिकाणी साजरा होतो वेगळाच ‘भूत उत्सव’

Narak Chaturdashi 2022: नरक चतुर्दशी ही नेहमी कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी साजरी करण्यात येते. यावर्षी 24 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येत आहे. तर नरक चतुर्दशीचा दिवस हा नरक चौदस वा काली चौदस म्हणूनही ओळखला जातो. असं म्हटलं जातं की, नरक चतुर्दशीच्या दिवशी काली माँ अर्थात महाकालीची पूजा केल्यामुळे व्यक्तीला केवळ भीतीपासून मुक्तता मिळत नाही तर या दिवशी दीपोत्सव साजरा केल्याने अकाली मृत्यूही टळतो आणि यम यादिवशी कोणाचाही जीव नेत नाही असा समज आहे. इतकंच नाही तर नरक चतुर्दशीच्या दिवशी देशातील काही राज्यांमध्ये अघोरी कर्म करणारे साधू अथवा व्यक्ती या महाकालीची सिद्धी प्राप्त व्हावी यासाठी आशिर्वादही मागतात असा समज आहे. तर काही ठिकाणी भूत उत्सव (Bhoot Utsav) साजरा करण्यात येतो. अर्थात या ठिकाणी भूतांचा मेळा लागतो असं म्हटलं जातं. जाणून घेऊया या अजीब आणि विचित्र गोष्टीविषयी अधिक माहिती. 

अयोध्या (Ayodhya)

सौजन्य – Instagram

दिवाळी साजरी करण्याची सुरूवातच मुळात अयोध्येपासून झाली असा इतिहास आहे. रावणाच्या वधानंतर राम पुन्हा अयोध्येत आले तेव्हा समस्त नागरिकांनी दीप प्रज्वलन करून राम आणि सीतेचे स्वागत केले होते. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली असे सांगण्यात येते. दिवाळीच्या आदल्या दिवशी अयोध्येच्या सरयू तटावर नरक चतुर्दशीच्या दिवशी दिव्यांची माळ प्रज्वलित करण्यात येते. याशिवाय नरक चतुर्दशीच्या संध्याकाळी अनेक अघोरी आणि तांत्रिक बाबांचा गोतावळा इथे जमतो. असं म्हणतात आपल्या तंत्रमंत्र विद्येने या दिवशी तांत्रिक मांत्रिक भूतांना बोलावतात आणि याठिकाणी भूत उत्सव साजरा केला जातो. 

गुजरात (Gujrat)

सौजन्य – Instagram

गुजरातमध्ये दिवाळीचा पाडवा म्हणजे नववर्ष म्हणून साजरे केले जाते. तर नरक चतुर्दशीच्या रात्री लावलेला दिवा हा एखाद्या भांड्याने झाकला जातो आणि त्यां भांड्यावर चढलेले काजळ हे दिवाळीच्या दिवशी महिला आणि पुरूष वापरतात असा रितीरिवाज आहे. हे काजळ घरातील सदस्यांची रक्षा करते असा समजा आहे. तर गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यांवर स्थित द्वारका नगरीमध्ये मांत्रिकांद्वारे अशाच प्रकारे काजळ निर्मिती करून तांत्रिक क्रिया करण्यात येते. या काजळाचा वापर करून भूतपिशाच आपल्या वशमध्ये करून घेण्यासाठी अघोरी याचा उपयोग करतात असे सांगण्यात येते. कथित गोष्टींनुसार, समुद्रकिनारी नरक चतुर्दशीच्या दिवशी हे सर्व पाहायला मिळते. तर तेथे राहणाऱ्या व्यक्तींना या गोष्टीला दुजोरा दिला असून भूताखेतांचा अनुभव आल्याचेही सांगितले आहे. 

पश्चिम बंगाल (West Bengal)

बंगालमध्ये नरक चतुर्दशी हा सर्वात मोठा सण मानला जातो. कारण या दिवशी महाकालीची पूजा करण्यात येते. पश्चिम बंगालमध्ये महाकालीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बंगालमध्ये हा दिवस काली चौदस नावाने ओळखण्यात येतो. बंगालमधील स्थित दक्षिणेश्वर आणि कालीघाट मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात या दिवशी भक्त जमा होतात. अनेक ठिकाणांहून भक्त महाकालीची पूजा करण्यासाठी या ठिकाणी भेट देतात.  तर एका ठिकाणी सात्विक पूजा होत असताना रात्री मात्र अघोरी सिद्धी प्राप्तीसाठी मंदिराच्या आसपासच्या भागात अनेक अघोरी बुवा अनुष्ठान करताना दिसून येतात. नरक चतुर्दशीच्या दिवशी इथे भूत उत्सव साजरा करण्यात आल्याचे पाहायला मिळते. 

आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. याठिकाणी वास्तवात असा भूत उत्सव साजरा करण्यात येतो आणि याची माहिती अनेकांना माहिती नाही. याबाबत केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने हा लेख लिहिण्यात आला आहे. 

Leave a Comment