गणपती आणि दसऱ्यानंतर जर कोणत्या सणाची आतुरतेने आपण वाट पाहतो तो सण म्हणजे दिवाळी (Diwali). दिवाळीचा हा सण जगभरात साजरा होतो. तर दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला आपण लक्ष्मीची पूजा करून तिची आपल्यावर कायम कृपा राहावी हीच प्रार्थना करतो. पण जे ठिकाण स्वच्छ असतं तिथेच लक्ष्मीचा वास अधिक असतो असा समज आहे. म्हणूनच दिवाळीपूर्वी घराची डागडुजी आणि साफसफाई करण्यात येते. आपल्या घरात कळत नकळत अशा काही वस्तू राहतात ज्या अशुभ ठरतात. त्यामुळे घरातील लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्यासाठी अशा कोणत्या वस्तू आहेत अथवा सामान आहे जे तुम्ही काढून टाकायला हवे याबाबत माहिती. तुम्हीदेखील दिवाळीच्या साफसफाईला सुरूवात केली असेल तर हे नक्की वाचा.

तुटलेले सामान

घरात बऱ्याचदा तुटलेली खेळणी, तुटलेले फर्निचर अथवा कामचलाऊ असे तुटलेले सामान आपण हव्यासापोटी ठेऊन देतो. पण असे तुटलेले सामान घरात ठेवणे शुभ नाही. फर्निचरपासून ते अगदी तुटलेली चप्पल वा सायकल असे कोणतेही सामान असेल तर तुम्ही असे सामान वेळीच घराबाहेर काढून टाका. त्यामुळे तुमच्या घरातील अडगळ पण कमी होईल आणि लक्ष्मीचा वास घरात राहील.
खराब भांडी
खराब आणि पोचा आलेली भांडीदेखील बऱ्याच घरात सांभाळून ठेवली जातात. कोणत्यातरी गोष्टीसाठी उपयोगी पडतील तेव्हा वापरू अशा विचाराने ही भांडी अनेक दिवस धूळ खात पडलेली असतात. त्यामुळे स्वयंपाकघरात असलेली खराब भांडी, जळलेली भांडी, पोचा आलेली भांडी तुम्ही सांभाळून ठेवली असतील तर तुम्ही अशी भांडी त्वरीत काढून टाका. स्वयंपाकघरात अशी भांडी ठेवणे अजिबात चांगले मानले जात नाही.
भेगा पडलेल्या मूर्ती
मंदिराची स्वच्छता करताना अथवा पूजा करताना तुमच्याकडून एखाद्या मूर्तीला तडा गेला असेल अथवा जुन्या मूर्तीला भेग पडली असेल तर दिवाळीच्या साफसफाईदरम्यान ही मूर्ती काढून त्याचे व्यवस्थित विसर्जन करा. देवघरात अशा मूर्ती ठेवणं योग्य नाही. ही अशुभ समजण्यात येते. त्यामुळे घरातील लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देवघरातील अशा पद्धतीच्या मूर्ती तुम्ही वेळीच विसर्जित करायला हव्यात हे लक्षात ठेवा.
खराब चपला

घराच्या बाहेर अथवा घरात चप्पलांचे ढीग लावून ठेवणे अजिबात योग्य नाही. तसंच तुटलेल्या चप्पल वा खराब झालेल्या चप्पल तुम्ही तुमच्या शू रॅकमध्ये अजिबात ठेऊ नका. दिवाळीची स्वच्छता करत असाल तर अशा चप्पल सर्वात आधी फेकून द्या. तसंच तुम्ही काही चप्पल वरचेवर वापरत नसाल तर ते व्यवस्थित स्वच्छ करून सांभाळून ठेवा.
कचरा काढून टाका
घरात येणाऱ्या लक्ष्मीला स्वच्छता दिसावी आणि आनंदी आणि प्रसन्न वातावरण राहावे म्हणून प्रत्येक घरात दिवाळीच्या पूर्वी साफसफाई करण्यात येते. काही जणांच्या घरात आठवडाभराचा कचरा एकत्र करून फेकण्यात येतो. पण असं करणं योग्य नाही. रोज तुम्ही जो कचरा साठवता तो रोजच्या रोज खाली कचरा पेटीत टाका. तसंच घरात साचलेली धूळ वेळोवेळी स्वच्छ करा. जेणेकरून लक्ष्मी घरात राहील.
या गोष्टी लक्षात ठेवल्यास, तुम्ही लक्ष्मीची कृपा नक्कीच मिळवू शकता. घरात जितकी स्वच्छता ठेवता येईल तितकी ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करायला हवा.
बेडरुममध्ये अशी आणा पॉझिटिव्हिटी