काय आहे बोकाव्हायरस संसर्ग? लहान मुलांसाठी ठरतोय धोकादायक

बोकाव्हायरसचा (Bocavirus) पहिला रुग्ण 2005 मध्ये आढळला होता. गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईत बोकाव्हायरस संसर्गाचे काही रुग्ण दिसून येत आहेत. हा एक दुर्मिळ विषाणूजन्य संसर्ग असला तरी, वेळेत निदान न केल्यास तर प्रकृती गंभीर होऊन  मृत्यूचाही धोका असतो. बोकाव्हायरसमध्ये टाइप 1, टाइप 2 आणि टाइप 4 सारखे अनेक प्रकार आहेत. टाइप 1 विषाणू प्रामुख्याने श्वसनमार्गाच्या संसर्गाशी संबंधित आहे. टाइप 2 आणि 4 अतिसार , ओटीपोटात दुखणे इत्यादी लक्षणांसह गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी म्हणजेच पोटाच्या विकाराशी संबंधित संसर्ग आहे. हा विषाणू प्रामुख्याने तीन वर्षांखालील मुलांना संक्रमित करतो. या विषाणूची लक्षणे इतर इन्फ्लूएंझा विषाणूंसारखीच आहेत (खोकला, सर्दी आणि श्वसनमार्गाचे संक्रमण). त्यामुळे हा व्हायरस लवकर ओळखणे आव्हानात्मक ठरते अशी माहिती बोकाव्हायरस संदर्भात डॉ. नरजॉन मेश्राम, नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटल्सच्या बालरोग अतिदक्षता विभागाचे प्रमुख यांनी दिली.  तर नुकतेच एका दोन वर्षाच्या मुलावर उपचार करत त्याचे प्राणही वाचवले आहेत. 

बाळाला मिळाले नवे आयुष्य 

बोकाव्हायरस संसर्गामुळे श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या दोन वर्षाच्या बाळावर नवी मुंबई येथील मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे सल्लागार आणि बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. संदीप सावंत आणि त्यांच्या टीमने यशस्वी उपचार केले.

अयान अग्रवाल (नाव बदलले आहे)*, याला आपत्कालीन स्थितीत मेडिकव्हर हॉस्पिटलमधील बालरोग अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्याला श्वास घेण्यास गंभीर त्रास होत होता (88% ऑक्सिजन सॅच्युरेशन). त्याला आठवडाभरापासून सर्दी आणि खोकला देखील होता. डॉक्टरांनी वेळीच प्रसंगावधान राखून उपचार केल्याने या बाळाला नवे आयुष्य मिळाले.

मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे सल्लागार आणि बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. संदीप सावंत यांनी सांगितले की, या बाळाला श्वसनाचा तीव्र त्रास होत होता. त्याचे ऑक्सिजन सॅच्युरेशन ८५% पर्यंत खाली घसरले. आम्ही ताबडतोब हाय-फ्लो ऑक्सिजन, स्टिरॉइड्स, नेब्युलायझेशन आणि लक्षणात्मक उपचार सुरू केले. बाळाचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, जे बोकाव्हायरस संसर्गासाठी पॉझिटिव्ह आढळले.

कशी होते चाचणी 

मेडिकव्हर हॉस्पिटल्समधील नवजात बालकांच्या आजारावरील तज्ज्ञ डॉ. स्वप्नील पाटील म्हणाले की, “बोकाव्हायरसचे निदान नाकातील (नासॉफॅरिंजियल), शौचाचे आणि रक्ताच्या नमुन्यांच्या पीसीआर चाचणीद्वारे केले जाऊ शकते. ही चाचणी खूप महाग असल्याने, आम्ही चाचणी नियमितपणे करत नाही. तीव्र स्वरुपाच्या श्वसनाच्या त्रास असलेल्या मुलांमध्येच शक्यतो ही चाचणी केली जाते. आपण या विषाणूजन्य संसर्गाबद्दल जागरूक असले पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक तपासणी केली पाहिजे, जेणेकरून त्यानुसार वेळीच उपचार सुरू करता येतील. या विषाणूचा प्रादुर्भावाचे प्रमाण 1.5 टकक्यापासून ते 19.3 टक्क्यांपर्यत आहे. हा विषाणू वर्षभर आढळतो. परंतु प्रामुख्याने हिवाळ्यात आणि हिवाळा आणि उन्हाळ्याच्या मधल्या काही दिवसांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. 

डॉ. मेश्राम यांनी पुढे सांगितले की, या बोकाव्हायरस संसर्गावर कोणतेही विशिष्ट औषध किंवा उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णाला लक्षणात्मक आणि सहायक उपचार दिले जातात.

Leave a Comment