ताण-तणाव होईल दूर, घरीच करा अशाप्रकारे गार्डनिंग

 करिअर, घर अशा जबाबदाऱ्या सांभाळताना अनेकदा आपल्यावर आलेल्या ताणाकडे आपण दुर्लक्ष करतो. काही कारणास्तव आपल्या आयुष्यात कठीण प्रसंग सुरु असेल तर त्यामुळेही आपल्याला ताण येतो. शरीराचे दुखणे असेल तर आपण झोपून किंवा आराम करुन बरे होतो. पण मनाचे दुखणे वरच्यावर कोणत्याही मलम किंवा औषधाचा वापर करुन बरे करता येत नाही. अशावेळी योग्य मदत मिळणे गरजेचे असते. पण सगळ्यांनाच अशी मेडिकली मदत घेता येईलच असे नाही. अशावेळी आपलीच मदत कशी करायची याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्यावर आलेला तणाव घालवण्यासाठी गार्डनिंग( Gardening) हा एक उत्तम असा पर्याय आहे. खूप जणांना यामुळे मदत झाली आहे. यासाठीच जाणून घेऊया याविषयी अधिक 

माती करते रिलॅक्स

माती करते रिलॅक्स- freepik.com

तुम्ही खरंच खूप तणावाखाली असाल आणि तुम्हाला त्यातून बाहेर पडायचे असेल तर तुम्ही घरातल्या घरात गार्डनिंग करायला घ्या. गार्डनिंगसाठी खूप खर्च करावा लागतो असा समज असेल तर तो चुकीचा आहे. गार्डनिंगसाठी मुळीच जास्त खर्च करावा लागत नाही. तर त्यातून मिळणारे समाधान हे तुम्हाला कोणत्याही दु:खातून, ताणातून, रागातून बाहेर काढण्यासाठी समर्झ असते. गार्डनिंगसाठी लागणाऱ्या मातीचेच घ्या ना. मातीचे अनेक फायदे असतात. ज्यावेळी आपण मातीत हात घालतो. त्यावेळी मातीत असलेले अनेक घटक आपल्या त्वचेत मुरतात. मातीत एक वेगळाच थंडावा असतो. ज्यावेळी आपण ओल्या किंवा सुक्या मातीत हात घालतो. त्यावेळी त्यातून हात काढायची इच्छा होत नाही. मातीत खेळत राहावेसे वाटते. त्यामुळे या काळात मनात कोणतेही विचार येत नाही. माती आणि केवळ माती यामध्ये आपले मन गुंतून राहते. त्यामुळे तुम्ही एखाद्या समस्येने किंवा चिंतेने ग्रासलेले असाल तर घरी छान गार्डनिंगची माती आणा. ती मोकळी करा. त्यामुळे तुमचा बराच वेळ चांगला जाईल. 

झाडांची निवड 

झाडांची करा निवड

गार्डनिंगची तयारी ही झाडांची निवड पूर्ण करुन होते. तुम्ही आजुबाजूला असलेल्या नर्सरीमध्ये नक्की जा. तेथे गेल्यानंतर तुम्हाला बरीच झाडं दिसतील. नेमकी कोणती झाडं तुम्हाला हवी ती निवडता येतात. हल्ली फळभाज्या, पालेभाज्या अशी झाडंही लावता येतात. अशा झाडांना तुमच्या सतत देखरेखीची गरज असते. त्यामुळे बिया आणल्या तर त्या पेरणं, त्यांना पाणी घालणं, त्यांच्याकडे नियमित लक्ष देणे असे सतत होते. या शिवाय फुलझाडांनाही तुमच्या सततच्या देखरेखीची नक्कीच गरज असते. त्यामुळे तुमचा दिवसातील काही वेळ त्यांना देणे अगदी गरजेचे होऊन जाते. त्यामुळे तुम्ही अशीच झाडं निवडा ज्यांच्यासोबत तुम्हाला तुमच्या दिवसाचा काही काळ घालवता येईल. 

असे म्हणतात, झाडांशी बोलणे हे कधीही चांगले. झाडं ही तुमचे ऐकून घेतात. तुमच्या मनातील विचार जाणून घेत ते तुम्हाला रिलॅक्स करण्याचे काम करतात. तुम्ही त्यांच्याशी जितक्या गप्पा माराल तितकी त्यांची वाढही चांगली होते आणि तुमच्या मनातील विचारही बाहेर पडतात ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो. 

आता तुम्हालाही टेन्शन आल्यासारखे किंवा काहीतरी सलत असेल तर तुम्ही त्यात गुरफटून राहण्यापेक्षा छान गार्डनिंग करायला घ्या तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल. 

Leave a Comment