घर भरलेले असूनही का वाटतो एकटेपणा, तुम्ही डिप्रेशनमध्ये तर नाही ना

महिलांचे आयुष्य हे सतत बदलणारे असते. त्यांच्या आयुष्यात येणारे प्रत्येक सुखद टप्पे हे काही ना काही जबाबदाऱ्या घेऊन येत असतात. पौंगडावस्थेत मासिक पाळी आल्यानंतर अल्लडपणा कमी करुन जबाबदारीने वागणे, लग्न झाल्यावर सगळ्या परिस्थितीशी जुळवून घेणे, मुलं-बाळ झाल्यानंतर त्यांच्या संगोपनाची जबाबदारी सांभाळणे अशा कित्येक जबाबदाऱ्या महिला या पार पाडत असतात. महिलांकडे हे सगळं करण्याची कला अवगत असली तरी देखील कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की सगळे काही असूनही अनेकदा एकटेपणा जाणवू लागतो. हा एकटेपणा चारचौघांना जाणवत नसला तरी त्या महिलेच्या मनात त्या एकटेपणाने इतके घर केलेले असते की त्या कधी डिप्रेशन (Depression) मध्ये जातात हे कोणालाच कळत नाही. आतापर्यंत प्रथमदर्शनी कोणालाच महिलेवर असलेला मानसिक ताण हा पटकन ओळखता आलेला नाही. तुमच्याही आयुष्यात असे काही बदल झालेले तुम्हाला जाणवत असतील तर आमच्या या टिप्स तुमच्या नक्कीच कामी येतील.

कमीपणा शोधणं थांबवा

कमीपणा शोधण टाळा

एखाद्या मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करणारी मुलगी सासरी आल्यानंतर अनेकदा हिंसेचा शिकार होते. हे आपण अनेकदा ऐकले असेल. अरे इतकी शिकलेली मुलगी आपल्याला काय हवे ? काय नको? इतके सांगू शकत नाही असे आपल्याला कायम वाटते. पण बरेचदा असे निदर्शनास आले आहे की, लग्नानंतर मुलींच्या आयुष्यात आलेले बदल काहींना पटकन स्विकारता येत नाही.  काही परिस्थितीमुळे निर्माण झालेली घरातील तणावग्रस्त परिस्थिती तुमचे घरातील इतरांशी नाते कसे असेल हे दर्शवत असते. अनेकदा नव्या घरात नवे नियम, नवी लोकं आणि त्यांचे वागणे हे पटत नसूनही आहे त्या परिस्थितीत राहून दिवस ढकलते. पण याचे पर्यवसान हे अनेकदा आपल्यातील कमीपणा शोधण्यात होतो. खूप जणी या कोषात निघून जातात. त्यांना घरातील व्यक्ती ही आपल्याविरोधात आहे असे वाटू लागते ( कदाचित ही परिस्थिती खरी असेल.) पण यामुळे तुमचे नुकसान होते हे समजून घ्या. तुम्ही आधी कसे होता? याचा विचार करा. बिनधास्त राहा. तुमच्या कामांकडे अधिक लक्ष द्या. नोकरी करत नसाल तर एखादी हौस नव्याने जपायला घ्या. आपण श्रेष्ठ आहोत याचा विचार केला तर कमीपणा शोधण्याची तितकीशी गरज भासत नाही. 

नव्या वाटा चोखंदळा 

जगात बरेच काही नवे करण्यासारखे असते. सगळ्याचवेळी तुमच्या वयाचा विचार करण्याची गरज नसते. तुमचा एकटेपणा काढून टाकण्यासाठी तुम्हाला नव्या वाटा चोखंदळणे आवश्यक असते. तुमच्या आयुष्यातील एखादे दु:ख कुरवाळत राहण्यापेक्षा काही नवे करता येते का बघा?  घरी राहून केवळ चुल-मूल करायची इच्छा नसेल पण जबाबदाऱ्या ही टाळायच्या नसतील तर काहीतरी शिका. घरात राहून तुम्हाला पुस्तक वाचन, ऑनलाईन नोकरी असे करुन पैसे कमावता येतात. विचाराने स्वतंत्र होताना तुम्ही तुमचा खर्च हा किती स्वतंत्र करता ते देखील पाहा. जर तुम्ही कोणावरही अवलंबून न राहता जर स्वकमाईने काही गोष्टी करायला सुरुवात कराल त्यावेळी तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही. जर नोकरी करणाऱ्या नसाल तर Independant कसे होऊ याचा विचार करा. नोकरी करत असूनही काहीतरी खटकतय असे वाटत असेल तर काही तरी नवे शिका. फिरा. नवी नवी ठिकाणं एक्स्प्लोअर करा. 

माझ्यासोबत असे का ?

खूप वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की, आपल्याला वाटते आपण कधीच कोणाचे वाईट चिंतत नाही किंवा वाईट करत नाही. पण आपल्या बाबतीत असे का झाले आहे. यामध्ये एक गोष्ट अनुभवाने सांगावीशी वाटते ती अशी की, काही गोष्टी या आयुष्यात होणाऱ्याच असतात. त्या त्या वेळी होत राहतात. पण त्या का झाल्या या विचाराने तुम्ही स्वत:ला त्रास करुन घेत असाल तर अशावेळी तुम्ही तुमच्या प्रगतीच्या आड येत असता हे लक्षात घ्या. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कधीच मिळत नाही. पण त्यासाठी तुम्ही तुमचा अमूल्य वेळ वाया घालवत असता. त्यामुळे याचा शोध थांबवा. त्याऐवजी माझ्यासोबत असे झाले ठिक आहे. आता त्याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही त्यांची तोंड बंद करण्यासारखे काम करा. त्यामुळे या परिस्थितीतून बाहेर पडण्यास तुम्हाला मदत मिळेल. 

 आयुष्यात ही गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी की, ‘जो तो वंदन करी उगवत्या जो तो पाठ फिरवि मावळत्या’ त्यामुळे माणूस म्हणून मिळणारे हे अमूल्य आयुष्य आपल्या नियमांनी जगा.

Leave a Comment