‘Thank God’ वर आली ‘Oh My God’ म्हणायची वेळ

एखादा कलाकार प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन बसला की, त्याच्या चित्रपट निवडीवर सगळ्यांची नजर असते. तो ज्या चित्रपटात काम करेल तो उत्तम असेल असा एक समज असतो. आता अजय देवगण (Ajay Devgn) चं घ्या ना. त्याने आताच्या काळात जे चित्रपट केले ते नुसते उत्तम नाही तर सुपरडुपर हिट असे चित्रपट होते. त्यामुळे तो ज्या चित्रपटात असेल तो चित्रपट पाहायचा की नाही हा विचार देखील करायला नको असे प्रेक्षकांना वाटते. पण यापुढे मात्र असे  होईल असे वाटत नाही. कारण काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या  Thank God हा चित्रपट पाहिल्यानंतर Oh My God म्हणायची वेळ प्रेक्षकांवर आली आहे. हा चित्रपट मनोरंजनाची खुमासदार फोडणी असेल असेे वाटला होता पण अनेकांच्या अपेक्षा या चित्रपटाबाबत फोल ठरल्या आहेत.

Thank God चे कथानक

चित्रपटाचे कथानक म्हणायला गेले तर तसे बरेच आहे. तुमच्या मृत्यूपश्चात्त तुमच्या पाप- पुण्याचा विचार करुन तुम्हाला स्वर्ग की नरक याची निवड केली जाते. असे आपण ही अनेक दंतकथांमधून वाचले आहे. यमराज आणि चित्रगुप्ताच्या कथाही ऐकल्या आहेत. या चित्रपटाच्या कथानकात अयान कपूर (Siddharth Malhotra) हा एक रिअल इस्टेट एजंट असून त्याच्यावर सध्या कठीण परिस्थिती ओढावली आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक चुकीचे मार्ग स्विकारतो. एक दिवसं त्याचा अपघात होतो आणि तो थेट चंद्रगुप्ताच्या दरबारात पोहोचतो. पृथ्वीतलावर त्याची मृत्यूशी झुंज सुरु असताना चंद्रगुप्त त्याच्या चुका दाखवून त्याला एक खेळ खेळायला लावतो. हा संपूर्ण खेळ चित्रपटाचे कथानक आहे.  चित्रपटात चंद्रगुप्ताच्या भूमिकेत अजय देवगण आहे. पण हे कथानक मांडताना ते फारच रटाळ पद्धतीने मांडण्यात आल्यामुळे हा चित्रपट पहिल्या काही मिनिटातच नकोसा होतो. 

अजय देवगणचा अभिनय चांगला

चित्रपटात एक मोठा कलाकार असून तो चित्रपट हिट होईल असे अजिबात नसते. ते Thank God चित्रपटावरुन दिसून आले आहे. अजय देवगणला एका वेगळ्या लुकमध्ये पाहून लोकांना नक्कीच आनंद झाला. पण चित्रपटाची सुरुवात जशी होते ती इतकी रटाळ होते की या चित्रपटात पुढे काय होईल याचा अंदाज येऊ लागते. या चित्रपटातील चांगली वाईट उदाहरण ही इतकी लहान मुलांसारखी आहेत की,काही वेळानंतर हसूही येणे बंद होते. या चित्रपटात अजय देवगणच्या तोंडी ‘शोभा को भी शोभा नही देता’ हा विनोद आहे. तो विनोद इतका वेळा केला आहे की, अगदी नकोसे होऊन जाते. म्हणून अजय देवगण चंद्रगुप्ताच्या रुपात कितीही चांगला दिसला तरी चित्रपटातील गोष्टी मनाचा अजिबात ठाव घेत नाही.

सिद्धार्थ नाही भावला

अजय देवगण या चित्रपटात असला तरी या चित्रपटाचा मुख्य अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) याच्या अन्य भूमिका पाहिल्या तर ही भुमिका अजिबात आकर्षक नाही. या चित्रपटात अनेक गोष्टी अर्धवट वाटतात. त्यामुळे चित्रपट अनेक ठिकाणी तुटक होतो. या चित्रपटातील मानिके मांगे हिते या गाण्यापलीकडे काहीच चांगले नाही असे वाटते. या गाण्यात सिद्धार्थ खूप चांगला दिसला आहे . या म्युझिक व्हिडिओपुरता तो चांगला दिसतो यात काहीही शंका नाही. पण संपूर्ण चित्रपटात त्याचा अभिनय हा थोडा अति झाला असे वाटते. तो चित्रपटात आव आणून अभिनय करतो असे वाटते. त्यामुळे सिद्धार्थ कितीही चांगला दिसला तरी देखील तो या भूमिकेत अजिबात भावलेला नाही. सिद्धार्थसोबत चित्रपटात रकुलप्रीत सिंह आणि त्याच्या बहिणीची भूमिका साकारणारी उर्मिला कोठारे या दोघींनी उत्तम भूमिका साकारली आहे.

दरम्यान, तुम्ही अद्याप हा चित्रपट पाहिला नसेल तर तो थिएटरमध्ये न पाहणेच चांगले असे आम्हाला वाटते. 

Leave a Comment