रिक्षावाल्याचा मुलगा ते बिग बॉसमधील आक्रमक स्पर्धक, अक्षयचा तुफान प्रवास

‘बिग बॉस मराठी S4’ (Bigg Boss Marathi S4) सध्या प्रेक्षकांना खूपच गुंतवून ठेवत आहे. यामधील काही स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच पकड निर्माण केली आहे आणि त्यापैकी एक स्पर्धक म्हणजे अक्षय केळकर (Akshay Kelkar). आपल्या अभिनयाने अक्षयने आधीच प्रेक्षकांच्या मनात आपली ओळख निर्माण केली होती आणि आता आक्रमक स्वभावाचा असणारा अक्षय हा विशेषतः मुलींमध्ये खूपच लोकप्रिय असल्याचे दिसून येत आहे. अगदी घरातही असणाऱ्या सर्व मुलींमध्ये अक्षय सर्वांचा आवडता आहे. तर अशा या अक्षयचा प्रवास नेमका कसा आहे ते आपण जाणून घेऊया. 

मालिका – चित्रपटातून प्रेक्षकांसमोर 

मूळ कळव्याचा असणारा अक्षय केळकर हा खरं तर रिक्षाचालकाचा मुलगा. अक्षयचे वडील जयेंद्र केळकर हे रिक्षाचालक आहेत तर त्याच्या आईचे नाव कल्पना केळकर आहे. रिक्षावर अक्षयचे विशेष प्रेम आहे आणि अभिमानही आहे. रियालिटी शो मध्ये प्रवेश करतानाही आपल्या वडिलांमुळेच आपण आज या ठिकाणी आहोत असे अक्षयने अभिमानाने सांगितले होते. आजपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपल्या वडिलांनीच आपल्याला रिक्षाने नेऊन सोडले आहे आणि आजही आपले वडील रिक्षा चालवतात याचा आपल्याला अभिमान आहे असं अक्षय अभिमानाने सांगतो. 

अक्षयने 2013 मध्ये “बे दुने दाह” या मराठी मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेत अक्षयने कबीरची भूमिका केली होती. तर त्यानंतर त्याने कलर्स मराठीवरील “कमला” या मालिकेत उदय देशपांडे ही भूमिका साकारली. अक्षय केळकरने 2014 मध्ये ‘प्रेमसाथी’ या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी सहाय्यक भूमिका साकारली होती. त्यानंतर, त्याने अवधूत गुप्ते यांच्या “कान्हा” या मराठी चित्रपटातही काम केले होते, जो दहीहंडीच्या उत्सवावर आधारित आहे. तर ‘कॉलेज कॅफे’ या मराठी चित्रपटातही त्याने मुख्य भूमिका साकारली होती. हिंदी मालिका ‘भाखरवडी’मध्ये अभिषेकची भूमिका साकारली होती. तर सध्या मराठी बिग बॉसमध्ये अक्षय कमाल करत आहे. याशिवाय अनेक जाहिरातींमध्येही त्याने काम केले आहे. 

उत्तम कलाकार 

अक्षयला आर्ट्समध्ये स्वारस्य असून त्याने एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट्स, वांद्रे येथून कमर्शियल आर्ट्सचे शिक्षण घेतले आणि अगदी लहानपणीचा कला क्षेत्रात जाण्याचे ठरवले. याबाबत त्याने आपल्या सहकलाकारांशी बातचीतही बिग बॉसमध्ये केली होती. त्याचे पेंटिंग (Painting) उत्तम असून त्याने या क्षेत्रात येण्यासाठीही स्ट्रगल केल्याचे सांगितले होते. तर या शो नंतर आपल्याला अधिक ओळख मिळेल अशीही अक्षयला खात्री आहे. अगदी पहिल्या आठवड्यापासून अक्षयने आपला वेगळेपणा दाखवून दिला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अक्षयचे चाहते वाढत असल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान त्याची आणि अमृता देशमुख (Amruta Deshmukh) मधील वाढती जवळीकदेखील सध्या सर्वांना आवडत आहे. एकमेकांना चिडवणं असो अथवा प्रसाद जवादेसह असणारे त्याचे वादविवाद असोत, प्रेक्षकांना सध्या भावत आहेत. त्यामुळे आता तरी प्रेक्षकांना अक्षय केळकर हा शेवटच्या पाच स्पर्धकांमध्ये नक्कीच असेल असा विश्वास वाटत आहे.

Leave a Comment