शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार अक्षय कुमार, अनेकांनी मुरडली नाकं

 ‘महाराजांची किर्ति बेफाम… भल्या भल्यांना सुटला घाम’… महाराजांचे गोडवे आज कित्येक वर्षांनतर पुन्हा पुन्हा ऐकले तरी अंगावर काटा आल्यावाचून राहात नाही. त्यामुळे महाराजांशी निगडीत आलेले सगळेच चित्रपट चांगलेच चालतात हे आपण सगळेच जाणतो. अनेक कलाकारांनी आतापर्यंत शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्या सगळ्या कलाकारांना प्रेक्षकांचे प्रेमही मिळाले आहे. आता शिवाजी महाराजांची(Chatrapati Shivaji Maharaj)  भूमिका बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar)  साकारणार आहे. अक्षय कुमारच्या गेल्या काही चित्रपटांचा ग्राफ पाहता त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्याला साकारण्यास मिळणे हे ऐकूनच अनेक प्रेक्षकांची नाकं मुरडली आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या विषयी अधिक

 ‘वेडात मराठे वीर दौडले सात’

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत अशा अनेक घटना घडल्या आहेत. ज्याचा अभ्यास करु तितका कमी आहे. त्यांची मुत्सद्देगिरी, त्यांचे चातुर्य आणि शौर्य याचे दर्शन त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून आपणास कळते. त्याच्या कारकिर्दीतील अशीच एक गोष्ट घेऊन महेश मांजरेकर येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ असे असून बुधवारी मुंबईत मोठ्या दिमाखात याचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला. चित्रपटाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कऱण्यात आली.या वेळी सलमान खानही हजर होता. अक्षय कुमारसोबत चित्रपटातील अन्य स्टार कास्टही यावेळी उपस्थित होती. अक्षय कुमार या चित्रपटातून मराठी चित्रपटात डेब्यू करणार आहे. शिवाय त्याच्यासोबत या चित्रपटात जे अन्य सात मावळे दिसणार आहेत. त्यामध्ये प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, जय दुधाणे, विराट मडके, सत्या मांजरेकर आणि उत्कर्ष शिंदे हे देखील आहेत. 

शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अक्षय नको

अक्षय कुमार ( Akshay Kumar) हा कितीही हरहुन्नरी कलाकार असला तरी गेल्या एक ते दोन वर्षांपासून त्याचे फारच कमी चित्रपट चालले आहेत. त्यामुळे प्रेक्षक त्याच्या चित्रपटांवर आणि अभिनयावर नाराज आहेत. अक्षय कुमारने ऐतिहासिक भूमिका साकारल्या नाहीत असे नाही. ‘केसरी’ (Kesari) चित्रपटातील त्याची भूमिका अनेकांना भावली होती. पण त्यानंतर आलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Prithviraj) हा चित्रपट फारसा काही चालला नाही. या चित्रपटांव्यतिरिक्त Bachchan pandey, Sooryavanshi, Rakshabandhan हे चित्रपटही तसे फ्लॉप झाले. त्याच्या अभिनयाच्या एकच पॅटर्नचा आता लोकांना कंटाळा येऊ लागला आहे. त्यात महाराजांसारख्या महान व्यक्तिचा अभिनय अक्षय कुमारला जमेल असा विश्वास प्रेक्षकांना अजिबात नाही. शिवाय मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी मराठी कलाकार नाहीत का? असा प्रश्नही अनेकांनी केला आहे. त्यामुळे एकूणच अक्षय कुमारला शिवाजी महाराजांच्या रुपात पाहणे अनेकांना फारसे आवडलेले दिसत नाही. 

बिग बॉस स्पर्धकांना मिळाली संधी

Vedat marathe veer doudale saat या चित्रपटात मराठी बिग बॉसच्या अनेक स्पर्धकांना संधी मिळाली आहे. यामध्ये तिसऱ्या सीझनचा विजेता विशाल निकम आहे. तर याच सीझनमधील जय दुधाणे (Jay dudhane), उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) हे देखील आहेत. बिग बॉसच्या प्रत्येक स्पर्धकावर महेश मांजरेकर यांची नजर असते. बिग बॉसची ट्रॉफी मिळो अथवा नको पण करिअरच्या दृष्टिकोनातून याचा नक्की फायदा होतो हे दिसून येते. 

आता राहिला प्रश्न अक्षय कुमार महत्वाची भूमिका साकारण्याचा तर त्यासाठी अजूनही अनेकांचा नकारच दिसून येत आहे. पण अक्षय कुमार सारखा कलाकार मराठी चित्रपटात डेब्यू करताना आणि महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना नेमकी कशी मेहनत घेतोय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Leave a Comment