‘No Shave November’, काय आहे या ट्रेंडमागचं खरं कारण…

कॉलेजमधील तरूण मुलांमध्ये ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ (No Shave November) हा ट्रेंड भलताच फेसम असतो. नोव्हेंबर महिना आला की ही दाढी वाढवण्याची फॅशन सुरु होते आणि सोशल मीडियावर या ट्रेंडचा अक्षरश: ऊत येतो. मित्रांनो, तुमच्यापैकीही अनेकजण हा ट्रेंड फॉलो करत असत असतील पण हा ट्रेंड नक्की केव्हा आणि का सुरु झाला हे तुम्हाला माहितीये का? खरंतर ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ हा फक्त एक कूल ट्रे़ंड (Cool Trend) नाहीये तर सामाजिक बांधिलकी जपणारा एक मोठा उपक्रम आहे. काय म्हणता, ये कुछ नया है..? चला तर मग, या लेखातून जाणून घेऊया या ट्रेंडमागचं खरं कारण…

ट्रेंड मागची सामाजिक बांधिलकी

मित्रांनो, ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ हा ट्रेंड 2009 पासून फॉलो करायला सुरुवात झाली. मात्र हा नुसताच ट्रेंड नसून यामागे एक खोल संकल्पना दडली आहे. अमेरिकेतील मॅथ्यू हिल फाउंडेशन ही संकल्पना समाजात राबवली ती एका खास कारणाने. ‘मॅथ्यू हिल फाउंडेशन’ (Matthew Hill Foundation) ही संस्था गेली अनेक वर्ष कर्करोग, (Cancer) त्याची कारणं आणि त्यावरील इलाज याविषयी समाजात जागरुकता पसरवण्याचे काम करत आहे. त्यांच्या या कार्यांतर्गत ‘No Shave November’ या संकल्पनेची सुरुवात झाली. 

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, कॅन्सरच्या बहुतांशी प्रकारांमध्ये कॅन्सर पेशंट्सना  (Cancer patients) किमो थेरपी (Chemotherapy) घ्यावी लागते. या थेरपी दरम्यान त्यांचे केस मोठ्याप्रमाणावर गळतात. अशा पेंशटविषयी सहानभूती दाखवण्याच्या हेतूने ही नो शेव्ह नोव्हेंबर सुरु करण्यात आल्याचं संस्थेचे पदाधिकारी सांगतात. या मोहिमेअंतर्गत संपूर्ण नोव्हेंबर महिना अनेक पुरुष दाढी वाढवतात आणि महिना संपला की मगच दाढी शेव्ह करतात. अनेक ठिकाणी या उपक्रमाद्वारे हेअर डोनेशन देखील करण्याची पद्धत आहे.

हेअर अँड मनी डोनेशन

कॅन्सरग्रस्तांविषयी राबवल्या जाणाऱ्या या खास उपक्रमांतर्गत, अनेक ठिकाणी हेअर डोनेशन (Hair donation) आणि मनी डोनेशन (Money donation) केले जाते. बऱ्याच देशांमध्ये आणि विविध शहरांमध्ये ही पद्धत आहेत. नोव्हेंबरमध्ये दाढी आणि केस न कापता सलून (Salon) चे जे पैसे वाचवले जातात ते कॅन्सर ग्रस्तांच्या आर्थिक मदतीसाठी डोनेट केले जातात. याशिवाय काही ठिकाणी थेट हेअर डोनेट करण्याचीही पद्धत आहे. दाढी सोबतच पुरुष मंडळी नोव्हेंबरचा संपूर्ण महिना आपले केस देखील वाढवतात आणि महिना संपला की आपले कापलेले केस विविध संस्थांना डोनेट करतात. ज्याचे शुद्धीकरण करुन त्यापूस कॅन्सर पेशंट्ससाठी विग बनवले जातात. मॅथ्यू हिल सारख्या अनेक संस्था या जनजागृतीच्या आणि मदतीच्या कार्यात पुढाकार घेत असतात. 

नो शेव्ह ‘नोव्हेंबर’च का?

ऑस्ट्रेलिया मध्ये रहाणारे  ‘मॅथ्यू हिल’ हे एक खूप मोठे शास्त्रज्ञ होते. २००७ साली कॅन्सरमुळे त्यांची प्रकृती ढासळायला लागली. त्यांचा कॅन्सर लास्ट स्टेजमध्ये असल्याने अनेक उपचार करुनही त्यांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. कॅन्सरवर सुरु असलेल्या इलाजामध्ये मॅथ्यू यांचे केस पूर्णत: गळून गेले होते. त्यामुळे मॅथ्यू यांना अखेरचा निरोप द्यायला जमलेल्या तमाम लोकांना, त्यांच्या चाहत्यांना त्यांचे हे रुप पाहवत नव्हते. त्याचवेळी तिथे उपस्थित त्यांच्या काही मित्रांमच्या आणि नातेवाईकांच्या मनात समाजसेवेची ठिणगी पडली.

मॅथ्यू हिल यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी- नोव्हेंबर २००९ साली, त्यांचे काही आप्तस्वकीय एकत्र जमले होते. त्यावेळी त्यांनी असा निश्चय केला की दरवर्षी या महिन्यात आपण कुणीच दाढी करायची नाही आणि शेव्हिंगचे हे पैसे वाचवून कॅन्सर पेशंटना मदत करायची. यातूनच सुरुवात झाली मॅथ्यू हिल फाउंडेशनची. या संस्थेद्वारे सर्वसामान्य लोकांमध्ये कॅन्सरविषयी जनजागृती पसरवण्याचे, कॅन्सर पेशंट्ससाठी जमेल ती आणि जमेल तशी मदत गोळा करण्याचे काम सुरु झाले आणि सोबतच सुरु झाला ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ हा आगळावेगळा उपक्रम.

तर मग मित्रांनो, तुम्हीसुद्धा जर हा ट्रेंड पाळत असाल आणि ही माहिती तुमच्यासाठी नवीन असेल, तर तुम्ही-आम्ही आपण सगळेचजण यापुढे आपल्याला शक्य होईल त्याप्रकारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करुया. सोशल मीडियावर ट्रेंड फॉलो करताना आपण या समजाचंही काही देणं लागतो याचीही जाणीव ठेवूया.

हेही वाचा:

Leave a Comment