महिला पर्यटनासाठी खास ‘आई’ योजना

राज्यातील पर्यटनाच्या माध्यमातून 1 लाख रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष धोरण अवलंबण्याचा निर्णय राज्य सरकारच्या पर्यटन विभागातर्फे घेण्यात आला असून त्याबरोबरच महिला पर्यटकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘आई’ (AAI) या उपक्रमाची सुरुवात राज्य सरकारच्यावतीने करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी एका वृत्तपत्राला दिली आहे. याबरोबरच राज्यातील डेक्कन ओडिसा ट्रेन (Orissa Train) आणि मुंबईतील रो रो बससेवा (Ro Ro Bus) पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

महिला पर्यटनाला चालना देण्याचे उद्दिष्ट 

Women Tourists – Freepik.com

महिला पर्यटनाला चालना देण्यासाठी आई ही संकल्पना एमटीडीसी आणि राज्याच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणली जात आहे.  याच्या अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या काही विशिष्ट दिवशी महिलांना सवलतदेखील दिली जाणार आहे. याशिवाय एमटीसीच्या मार्फत राज्यभरात काही हॉटेल्सशी करार करण्यात येणार असून त्यांना वुमन फ्रेंडलीचा (Women Friendly) दर्जा दिला जाणार असून आई या योजनेसाठी एमटीडीसीकडून (MTDC) विशेष वेबसाईटदेखील तयार केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत कोणत्याही सहलींचे आयोजन करताना महिलांसाठी विशेष बसची सुविधा देताना त्यात जीपीएस सुविधादेखील उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तर महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना ‘प्रथम ती’ अंतर्गत विशेष लक्ष दिले जाणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एका वृत्तपत्राला दिली आहे. 

महिलांसाठी महिलांकडून आणि महिलांनी तत्त्वावर

महिलांसाठी महिलांकडून आणि महिलांनी या तत्त्वावर ही योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी महिलांच्या दृष्टीकोनातून पर्यटन स्थळेदेखील निवडण्यात येणार आहेत. त्याशिवाय ज्या सहलींचे आयोजन करताना उपलब्ध होणाऱ्या रोजगारांसाठी महिलांची निवड केली जाणार आहे. या महिला पर्यटनाच्या योजनेला प्रोत्साहन मिळावे यासाठी वर्षांतून एकदा आई पर्यटन महोत्सवाचे आयोजन पर्यटन विभागाकडून करण्यात येणार आहे. यासाठी विविक्ष क्षेत्रातील मान्यवर महिलांना आमंत्रित केले जाणार असून मनोरंजन क्षेत्रातील महिला कलाकारांनासुद्धा यात सहभागी करुन घेण्यात येणार असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे. 

महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण करुन देण्याच्या दृष्टीकोनातून ही योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून हॉटेल, रिसोर्ट, रेस्टॉरंट, ट्रान्सपोर्ट, मार्केटिंग, टुरिस्ट गाईड यासारख्या अनेक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याशिवाय महिलांनी एकत्र येऊन नव्या टुरिझम युनिटची स्थापना केल्यास त्यांना सबसिडी देण्याचा विचार आहे. – मंगलप्रभाल लोढा, पर्यटन मंत्री

या सहलींच्या माध्यमातून देणार प्राधान्य 

Women Tourists – Freepik.com

मुंबई सहल – या योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी मुंबई दर्शन आयोजित केले जाणार आहे. 

धार्मिक सहल- मुंबईसह राज्यभरातून दरवर्षी अष्टविनायक दर्शनाला लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे आई या योजनेअंतर्गत महिलांसाठी विशेष अष्टविनायक दर्शन आयोजित केली जाणार आहे. 

हेरिटेज सहल – पुणे शनिवार वाडा, सिंहगड किल्ला, कसबा गणपती यासारख्या अनेक ठिकाणी ही महिलांसाठी विशेष सहल आयोजित करण्यात येणार आहे. 

Leave a Comment