गोष्ट ‘छट पूजेची’, कधी व कशी सुरु झाली ही प्रथा

यंदाच्या वर्षी शुक्रवारी म्हणजेच 28 ऑक्टोबरला ‘छट पूजेला’ (Chhath Puja 2022) सुरुवात झाली आणि 31 ऑक्टोबरला त्याची समाप्ती होणार आहे. दरवर्षी साधारण दिवाळी नंतरच बिहारी लोक मोठ्या उत्साहाने त्यांची ही पारंपारिक पूजा करतात. ४ दिवस चालणाऱ्या या छट पूजेचं नक्की काय महत्व आहे, ही प्रथा केव्हा व का सुरु झाली? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

Chhath Puja 2022: प्राथमिक माहिती

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सहाव्या तिथीला छठ पूजा केली जाते. यंदाच्या वर्षी हा उत्सव 28 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत साजरा होत आहे. छठ पूजेच्या दिवशी सूर्यदेव आणि षष्ठी नदीची पूजा केली जाते. यासोबतच या दिवशी भगवान शंकराची देखील पूजा केली जाते. हा उत्सव बिहार (Bihar), झारखंड (Jharkhand), पूर्व उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि पश्चिम बंगालमध्ये (West bengal) सर्वाधिक साजरा केला जातो. यासोबतच नेपाळमध्येही (Nepal) काही ठराविक ठिकाणी छट पूजा केली जाते. या पूजेला सूर्य षष्ठी व्रत (Surya Shashti Vrat 2022) असंही म्हटलं जातं. छठ पूजा ही मुख्यत्वे लहान मुलांच्या उदंड व निरोगी आयुष्यासाठी, भरभराटीसाठी ठेवली जाते. यावेळी घरातील स्त्रिया व विशेषत: माता 36 तासांचा निर्जळी उपवास करतात.

एकूण 4 दिवस चालणाऱ्या या पूजेतील प्रत्येक दिवसांचं एक खास महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक दिवसाचं एक खास व्रत देखील आहे. चला, प्रत्येक दिवशीच्या या व्रताविषयी आणि परंपरेविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया.

छट पूजेचे ‘4 दिवस’ 

पहिला दिवस- न्हाई खाई (Nahai khai 2022)

छठपूजेच्या पहिल्या दिवशी विधीवत स्नान आणि स्व-शुद्धी केली जाते. त्यानंतर संपूर्ण घराची देखील शुद्धी केली जाते. स्वच्छता आणि शुद्धी स्नानानंतर अन्न शिजवले जाते आणि ते कुटुंबासह ग्रहण केले जाते. एकदा का हे अन्न ग्रहण केले की त्यानंतर छट पूजेच्या उपवासाला सुरुवात होते. पहिल्या दिवशीच्या जेवणात मुख्यत: लाल भोपळ्याची भाजी, हरभरा डाळ आणि तांदूळ यांचा समावेश असते. असं म्हणतात की उपवास ठेवणारी व्यक्ती सर्वप्रथम जेवते आणि त्यानंतरच घरातील इतर सदस्य अन्न ग्रहण करतात.

दुसरा दिवस- खरना (Kharna Puja 2022)

छट पूजेचा दुसरा दिवस म्हणजे ‘खरना’. खरनाच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत उपवास ठेवला जातो. दिवसभर देवाचे नामस्मरण केले जाते. भजन गायले जाते. रात्री उपवास सोडतेवेळी गोडधोड पदार्थ बनवले जातात. यामध्ये उसाच्या रस घालून बनवलेली तांदळाची खीर, तांदळाच्या पिठाच्या पुऱ्या किंवा आणि तूप-चुपडी रोटी असे पारंपारिक पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य दाखवतात. या पदार्थांमध्ये मीठ आणि साखर कटाक्षाने घातली जात नाही. नैवैद्य दाखवल्यानंतर कुटुंबासोबत एकत्र बसून हा प्रसाद ग्रहण करण्याची पद्धत आहे.

तिसरा दिवस- अर्घ्य अर्पण

छठ पूजेचा तिसरा दिवस हा सर्वात महत्वाचा मानला जातो. या दिवशी संध्याकाळी सूर्यदेवाला अर्घ्य (Arghya) अर्पण करण्याची प्रथा आहे. नदी किनारी किंवा समुद्र किनारी जाऊन हे अर्घ्य अर्पण केले जाते. याची खास पारंपारिक पद्धत आहे. यावेळी बांबूच्या टोपल्यांमध्ये फळं, थेकुआ, तांदळाचे लाडू इ. पदार्थ ठेवून त्यासोबत फुलांच्या सहाय्याने हे अर्घ्य सजवले जाते. सुवासी धूप किंवा अगरबत्ती लावली जाते. त्यानंतर ज्या स्त्रीने उपवास धरला आहे ती आपल्या संपूर्ण परिवारासह सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करते आणि त्यानंतर मावळत्या सूर्याची मनोभावे पूजा केली जाते. 

चौथा दिवस- उषा अर्घ्य

हा छटपूजेचा शेवटचा दिवस असून या दिवशी उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण केले जाते. शक्य असल्यास समुद्रकिनारी जाऊन किंवा घराच्या वऱ्हांड्यातून अथवा गच्चीवर जाऊन मनोभावे सूर्यदेवाची प्रार्थना केली जाते आणि अर्घ्य अर्पण केले जाते. यावेळी घरातील स्त्री आपल्या पतीच्या, आणि मुला-बाळांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते.

नाकापर्यंत सिंदूर का लावला जातो?

छठपूजेच्या दिवशी बहुतांशी बायका भांगेपासून ते अगदी नाकापर्यंत सिंदूर (Sindoor) लावतात. सिंदूर हे पतीच्या दीर्घायुष्याचे प्रतिक आहे असे म्हणतात. अशी मान्यता आहे की, भांगेमध्ये जितका लांबलचक सिंदूर भरला जाईल तितकेच त्या स्त्रीच्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होईल. त्यामुळे विवाहित महिलांनी सर्वांना दिसेल अशा ठसठशीत पद्धतीने सिंदूर भरण्याची प्रथा आहे.

Leave a Comment