शोएब मलिक आणि सानिया मिर्झाचं नातं येणार संपुष्टात, काय आहे नक्की कारण

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) यांचे 2010 मध्ये लग्न झाले. पण आता हे पॉवर कपल वेगळे होत असल्याच्या वावड्या उठल्या आहेत. पाकिस्तानी मीडियाने (Pakistani Media) हे दोघे वेगळे होत असल्याचा दावा केला आहे. 2018 मध्ये सानियाने इजहानला जन्म दिला. अनेकदा सानिया आपल्या मुलासोबत व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र शोएबसह तिचे फारच कमी फोटो सध्या दिसून येत आहेत. या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. 

काय म्हणतेय पाकिस्तानी मीडिया 

सानिया मिर्झा आणि शोएब मलिकने काही दिवसांपूर्वीच आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा केला. मात्र शोएबने याचा फोटो शेअर केला आणि सानियाने केला नाही. त्यानंतरही या दोघांमध्ये काहीतरी बिनसले असल्याचे म्हटलं जात आहे. तर पाकिस्तानी मीडियाच्या म्हणण्यानुसार शोएबने एका शूटिंगदरम्यान असे काही केले आहे ज्यामुळे त्याने सानियाचा विश्वासघात केल्याचे सांगण्यात आले आहे. तसंच सानिया गेल्या काही दिवसांपासून अत्यंत दुःखी अशा पोस्ट करत आहे. काही दिवसांपूर्वी ‘टूटे हुए दिल कहाँ जाते है?’ अशा स्वरूपाची स्टोरी सानियाने पोस्ट केली होती. तर आपल्या मुलाचा फोटो पोस्ट करत सानियाने कॅप्शन दिले आहे की, ‘ते क्षण जे मला सर्वात कठीण दिवसातून बाहेर काढतात’. अजूनही सानिया आणि शोएबने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र सध्या हे दोघे वेगळे होणार असल्याच्या चर्चांना मात्र उधाण आले आहे. 

सानियाच्या अकॅडमीबाबतही शोएबला माहीत नाही

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी क्रिकेट शो ‘आस्क द पॅवेलियन’ (Ask The Pavilion) मध्ये शोएब मलिकला सानिया मिर्झाच्या टेनिस अकॅडमीबाबत आणि त्या कुठे आहेत असा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र यावर शोएबने ‘मला ठिकाणे नीट माहीत नाहीत, मी कधी तिच्या अकॅडमीमध्ये गेलो नाहीये’ असे उत्तर दिले होते. त्यावर सूत्रसंचालक वकार युनिस (Waqar Younis) देखील थक्क झाला होता. यावर ‘तू असा कसा नवरा आहेस?’ असे प्रत्युत्तरही वकारने दिले होते. त्यामुळे या दोघांमध्ये काहीच आलबेल नसल्याचं पाकिस्तानी मीडियाला वाटत आहे. याशिवाय सानियादेखील सध्या अशा पोस्ट करत असल्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. मात्र या दोघांनी वेगळे होऊ नये असेच त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे. कारण भारत – पाकिस्तान अशी ही जोडी तुटू नये असं सर्वांना वाटत आहे. तसंच लग्नाच्या वेळी या दोघांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते आणि आता मुलगा लहान असताना घटस्फोट घेण्याची वेळ येऊ नये असंही त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे. 

Leave a Comment