म्हणून आहे पाया पडायची पद्धत, घ्या जाणून

आपल्याकडे भारतीय पद्धतीत मोठ्यांना पाया पडून त्यांचा आशिर्वाद घेण्याची पद्धत आहे. कोणताही कार्यक्रम असो अथवा घरातून निघताना अथवा कोणीही मोठे भेटले तर पदस्पर्श करून पाया पडण्याची (Importance of Feet Touching) भारतीय संस्कारांमध्ये पद्धत आहे. पण ही पद्धत नक्की कशी सुरू झाली अथवा नमस्काराचे नक्की काय महत्त्व (Importance Of Namaskar) आहे? असा प्रश्न तुमच्या डोक्यात कधी डोकावला आहे का? असा विचार करताना सर्वांनाच याबाबत माहिती असायला हवी असे आम्हाला वाटले आणि म्हणूनच खास तुमच्यासाठी हा लेख आम्ही लिहित आहोत. नमस्काराचे नक्की महत्त्व काय आणि याची सुरूवात कशी झाली याची मनोरंजक कहाणी खास तुमच्यासाठी. 

नमस्काराची मनोरंजक कहाणी 

Why we touch feet of elders

पाया पडायची अर्थात नमस्कार करण्याची पद्धत नेमकी कशी सुरू झाली याची कहाणी अशी की, ‘महाभारताचे युद्ध सुरु होते. दररोज कौरवसेनेचे  मोठमोठे योद्धे मारले जात होते. पितामह भिष्मांसारखे ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने असूनदेखील त्यांच्या सेनेची सतत हानी होत होती. एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहांवर आरोप करतो. त्यामुळे व्यथित होऊन भीष्म पितामह घोषणा करतात की, “मी उद्या सर्व पांडवांचा वध करेन” त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या शिबिरात पोहोचताच पांडवांची अस्वस्थता वाढली कारण भीष्मांच्या क्षमतेबाबत सर्वांनाच कल्पना होती. तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल झाले. पांडवांची अस्वस्थता त्यांच्या लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले, “माझ्या सोबत चल”, त्यानंतर द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण पितामहांच्या कक्षात पोहोचले. ती वेळ रात्रीची होती. स्वतः बाहेर उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की, आत जाऊन पितामहांना प्रणाम कर, सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आत जाऊन पितामहांना प्रणाम करताच, “अखंड सौभाग्यवती भव” असा आशीर्वाद त्यांनी तिला दिला. त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की, “वत्स, एवढ्या रात्री तू एकटी कशी काय आलीस..??” त्यावर द्रौपदीने उत्तर दिले की, “माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी इथे आले आहे आणि ते बाहेर थांबले आहेत” असे द्रौपदीने सांगताच श्रीकृष्णाला भेटायला पितामह बाहेर आले आणि त्या दोघांनी एकमेकांना प्रणाम केला. भीष्म पितामह म्हणाले की, “माझ्या एका वचनाला दुसऱ्या वचनाने मात देण्याचे काम फक्त श्रीकृष्णच करु शकतात.”

शिबिरात परतताना श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाले की, “बघ, तुझ्या फक्त एक वेळ जाऊन पितामहांना नमस्कार करण्यामुळे तुझ्या पतींना जीवनदान मिळाले, हे तुझ्या लक्षात आले का..?? जर तू दररोज नित्यनेमाने पितामह भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य या मान्यवरांना नमस्कार केला असतास आणि दुर्योधन, दु:शासन यांच्या पत्नींनी जर नित्यनेमाने ज्येष्ठ बंधू पांडवांना नमस्कार केला असता तर ही युद्धाची वेळच आली नसती.’ त्यामुळे पूर्वपरंपरागत नमस्काराची आणि आशिर्वादाची हीच शक्ती असती जी आजही तितकीच महत्त्वाची मानली जाते. 

नमस्काराचे तात्पर्य

● वर्तमानकाळात आपल्या घरी ज्या समस्या आहेत, त्यांचे मूळ कारण हेच आहे की, कळत नकळत आपल्या हातून वडिलधाऱ्या मंडळीची उपेक्षा केली जाते

● जर प्रत्येक घरात वडिलधाऱ्या मंडळीना दररोज नमस्कार करुन त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील, तर त्या घराघरात वितंडवाद सहज टाळता येऊ शकतात आणि असे घर स्वर्ग बनू शकते

● मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे  कवच आहे की, ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही. कारण, नमस्कारात प्रेम, विनय, अनुशासन, आदर आहे. नमस्कारामुळे मनात सुविचार येतात आणि एखाद्याला नमस्कार केल्यामुळे क्रोधगी नष्ट होतो. तसंच नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो. त्यामुळेच नमस्काराला आपली संस्कृती मानण्यात आले आहे. 

Leave a Comment