सासूशी सतत वाद होतात, तर एकदा वाचाच

 लग्न झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलतात. जसे वातावरण माहेरी असते तसे सासरी असेलच याची शक्यता फारच कमी असते. फारच कमी मुलींना त्यांच्या माहेरासारखेच सासर मिळत असेल. अशा मुलींना लकी म्हणायला हवे. पण सगळ्यांना अशीच परिस्थिती मिळेल अशी नाही. पण काही हरकत नाही. आयुष्यात बदल हा व्हायलाच हवा. तरंच तुम्ही एक वेगळे जीवन जगत आहात याचा आनंद तुम्हाला मिळेल. आता लग्नानंतर खूप जणांच्या तक्रारीमध्ये एक गोष्ट अगदी स्वाभाविकपणे दिसून आली आहे ती म्हणजे सासूशी पटत नाही. सासू समजून घेत नाही किंवा सासू त्रास देते अशा अनेक तक्रारी मुलं करतात. तुमचेही सासूशी पटत नसेल तर नेमके काय करायला हवे त्यासाठी ही माहिती पूर्ण वाचा

समजून घ्या

सासू नावाची व्यक्ती ही काही वेगळ्या ग्रहावरील व्यक्ती नाही. ती तुमच्याप्रमाणेच सुनेचा प्रवास करुन मग सासू झालेली आहे. तुमच्याप्रमाणे सासूचाही स्वभाव असतो. तो स्वभाव कसा आहे ते जाणून घ्या. कोणत्या गोष्टी त्यांना आवडतात. कोणत्या गोष्टी आवडत नाहीत हे जाणून घ्या. तुम्हाला एकदा आवड-निवड कळली की, तुमच्या चुका कमी होतील. त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही सासूशी संवाद साधा. जरी तिला संवाद साधायला आवडत नसेल तरी तुम्ही त्यांच्याकडून हळुहळू सगळ्या गोष्टी शिकून त्यांना जाणून घ्या. त्यामुळे वाद कमी होतील. नात्यातील दुरावा कमी होईल

लगेच तक्रार करु नका

आईच्या घरी असताना आपल्याला एखाद्या गोष्टीचा राग आला तर आपण तो पटकन व्यक्त करुन मोकळे होतो. पण सासरी असताना असा राग व्यक्त करणे थोडे कठीण होऊन जाते. शिवाय अशा चिडचिड करण्यामुळे तुमचा स्वभाव चिडका आहे असे अशी एक धारणा होऊन जाते. त्यामुळे चिडचिड करु नका. थोडं निगुतीने घ्या. सासूकडून काही गैरसमज झालेले असतील तर ते तिथल्या तिथे दूर करा. पण त्या संदर्भातील तक्रार दुसरीकडे करायला जाऊ नका. कारण तसे करण्यामुळे तुमच्या माहेरच्यांचा कारण नसताना रोष तुमच्या सासूवर राहू शकतो. त्यामुळे शक्यतो तुमच्या मनाविरोधात काही झाले असेल तर निगुतीने वागा.

मैत्री करण्याचा प्रयत्न करा

नाते कोणतेही असो त्यामध्ये मैत्री ही गरजेची असते. सासू हे नाते कितीही कडक असले तरी देखील ती ही आईप्रमाणेच असते. फक्त आपण तिला सासू म्हणून एक अंतर राखण्याचा प्रयत्न करतो. पण अशी काहीच गरज नसते. सासरी तुम्हाला तुमचे उरलेले सगळे आयुष्य काढायचे असते. अशावेळी घरात एक मैत्रीण आणि तुमच्या आईची जागा घेणारी व्यक्ती सासू असते. सासूला जाणून घेऊन तिच्याशी मैत्री करायचा प्रयत्न करा. ही मैत्री करायला वेळ जाईल. पण हा प्रयत्न सोडू नका. त्यामुळे वाद आपोआप कमी होतील.

भांडणात पुरुषांना घेऊ नका

नवीन लग्न झाल्यानंतर एखादी गोष्ट खटकली तर आपण त्या गोष्टी फक्त आपल्या नवऱ्याला सांगू शकतो. पण सगळ्या गोष्टी ज्यावेळी पुरुषांच्या कानांवरुन जातात. त्यावेळी ते वाद अधिक चिघळण्याची शक्यता असते. पुरुषांची द्विधा मन:स्थिती होऊन जाते. बायकोचे म्हणणे पटले तरी देखील आईला कसे बोलू, आईला कसे दुखवू असे होऊन जाते. त्यामुळे साहजिकच तुमचीही प्रतिमा मलीन होते. अशावेळी बायकांच्या भांडणात पुरुषांना न घेता थोडा प्रयत्न करुन तुम्हीच खटकलेल्या गोष्टी सासूला सांगा.त्यामुळे वाद होणार नाहीत. 

आता तुम्हालाही असा वाद होईल अशी भीति वाटत असेल तर या गोष्टी नक्की फॉलो करा.

Leave a Comment