विषाणूजन्य आजारांचे वाढते प्रमाण, सणासुदीच्या काळात चिंतेचे वातावरण

मुंबई आणि उपनगरामध्ये स्वाईन फ्लू (Swine Flu), मलेरिया (Malaria) इत्यादी विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वेगाने वाढायला सुरुवात झाली आहे. येत्या काळात गणपती, दसरा आणि दिवाळी हे सण सलग असतात. करोनाच्या साथीमुळे दोन वर्षांनंतर हे सण धामधुमीत साजरे केले जात आहेत. त्यामुळे बाजारांमध्ये होणारी गर्दी, नातेवाईक मित्रमंडळीकडे वाढती वर्दळ होणे स्वाभाविक आहे. या विषाणूजन्य आजारांच्या वाढत्या प्रमाणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. विषाणूजन्य आजार वाढत असले तरी योग्य काळजी घेतल्यास सणही आनंदाने साजरे करता येतील असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव

सौजन्य – Freepik

सध्या करोनासोबतच अन्य विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. रुग्णांना चार ते पाच दिवसांनी पुन्हा ताप येत असल्याचेही आढळत आहे.  करोना आणि स्वाईन फ्लू, मलेरिया अशा अन्य विषाणूजन्य आजार यांची बहुतांश लक्षणे सारखीच असल्यामुळे रुग्णांमध्ये संभ्रम मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. अशावेळी स्वत:हून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने आजाराचे योग्य निदान झाल्यास वेळेत उपचारही सुरू होतात आणि पुढील संभाव्य धोका टाळणे शक्य होते, असे मेडिकव्हर रुग्णालयाचे कन्सल्टंट फिजिशियन डॉ. मनिष पेंडसे यांनी सांगितले.

ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. स्वाईन फ्लूचे प्रमाणही वाढत असल्याने रुग्णांनी लक्षणे असल्यास घरच्या घरी उपचार घेणे शक्यतो टाळावे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. करोनाचा प्रसार फारसा नसला तरी अन्य विषाणूजन्य आजारांपासून संरक्षण करण्यासाठी मास्कचा वापर करणे अत्यंत फायदेशीर आहे. तसेच वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापरही करावा, असे डोंबिवली येथील एसआरव्ही ममता रूग्णालयातील क्रिटिकल केअर मेडिसिन डॉ. निर्मल दत्त ठाकूर यांनी सांगितले. विषाणूजन्य आजारांची लक्षणे सौम्य असल्यास घरच्या घरी रुग्ण बरा होतो. परंतु लक्षणे तीव्र झाल्यास मात्र रुग्णालयात दाखल होणे गरजेचे असते. त्यामुळे सणासुदीचा काळ आनंदात आणि सुखासमाधानाने घालविण्यासाठी योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

विषाणूजन्य आजारांची लक्षणे

सौजन्य – Freepik
  • सर्दी होणे, नाक गळणे (Cold and cough)
  • ताप येणे (Fever)
  • डोकेदुखी, अंगदुखी (Headache)
  • घसा दुखणे, घसा खवखवणे, घश्यामध्ये टोचल्यासारखे वाटणे किंवा बोलताना आवाज घोगरा होणे
  • सुका खोकला येणे किंवा चिकट कफ पडणे (Dry Cough)
  • उलटी किंवा जुलाब होणे (Vomiting)

घ्यावयाची काळजी 

  • घरामध्ये कुठल्याही व्यक्तीला ताप आल्यास व वरील लक्षणे  दिसल्यास गृहविलगीकरण केले पाहिजे
  • कुटुंबामध्ये 60 वर्षावरील व्यक्ती असल्यास त्यांची विशेष काळजी घ्यावी
  • गृहविलगीकरणात असले तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावेत
  • अँटिबायोटिक सारखी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावी
  • पुरेशी विश्रांती, झोप, सकस आहार घ्यावा
  • भरपूर पाणी प्यावे

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे आणि अति त्रास होत असल्यास वेळीच लक्ष द्यावे. स्वतःकडे दुर्लक्ष अजिबात करू नये. 

Leave a Comment