डोक्याला मुंग्या आणणारा ‘वाळवीचा’ ट्रेलर रिलीज

‘वाळवी’ हा शब्द आपल्या सगळ्यांना परिचयाचा आहे. एखाद्या गोष्टीला वाळवी लागली की ती खराब होऊ लागते हे आपण सगळेच जाणतो.  ‘वाळवी’ (Vaalvi movie trailer) नाव असलेला मराठी चित्रपट येणार हे सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्टद्वारे दिसून आले आहे. एका वेगळ्याच पद्धतीने याचे प्रमोशन सोशल मीडियावर सुरु होते. ते पाहता हा चित्रपट अनेक रहस्य उलगडणारा असणार आहे असे दिसत होते. त्यामुळेच या चित्रपटाचा ट्रेलर कधी येतो? याची प्रतिक्षा अनेक जण पाहात होते. पण आता ही प्रतिक्षा संपली असून या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर ‘कमाल’ हा शब्द तोंडी येणार नाही असे मुळीच होणार नाही. कारण याचा ट्रेलरच तितका जबरदस्त आहे

कोण मरणार? कोण अडकणार?

 वाळवीचा ट्रेलर सुरु होतो एका आत्महत्येपासून एक जोडपे आत्महत्या कऱण्याच्या तयारीत आहे. डोक्यावर बंदूक घेऊन उभे आहेत. पण या दोघांपैकी कोण मरणार? याचा शोध लावायचा आहे. पण ही दोघं आत्महत्या नेमके करणार तरी कशासाठी हा विचार येतोच? नाही का? त्यापुढे ट्रेलरमध्ये या आत्महत्येमागे नवरा अर्थात  स्वप्निल जोशी ( swapnil joshi) याचा हात असल्याचे स्पष्ट होते. अनिता दाते (Anita date) यात बायकोची भूमिका साकारत आहे. आत्महत्येसाठी रचलेला स्वप्निलचा प्लॅन त्याला मदत करणारी डॉक्टर आणि त्यानंतर होणारे सगळे प्लॅनिंग यामध्ये दिसत आहे. आता नेमका कोणाचा प्लॅन खरा ठरणार? आणि कोणाचा प्लॅन होणार खराब हे पाहण्यासाठी चित्रपट पाहावा लागणार आहे. 

 एक सस्पेन्स मर्डर मिस्ट्री

वाळवी चित्रपटाची टीम

आता यामध्ये कोणाचा खून होणार की नाही? हे  माहीत नाही पण सध्या तरी हीच एक मिस्ट्री असणार आहे. जी पाहण्यासाठी हा चित्रपट पाहावा लागणार आहे. अभिनेता स्वप्निल जोशीने या आधीही विविध छटा असलेले चित्रपट केले आहेत. पण त्याची ही भूमिका खूपच खास असणार आहे. यातील वेगवेगळे रंग पडद्यावर पाहताना खूपच जास्त मजा येणार आहे. चॉकलेट बॉयच्या भूमिकेतून बाहेर पडत त्याने एक चॅलेंजिग भूमिका स्विकारली आहे. शिवाय पहिल्यांदाच तो अनिता दातेसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. यात शिवानी सुर्वेने डॉक्टरची भूमिका साकारली आहे. या मर्डरमागे तिचाही काहीतरी प्लॅन आहे असे दाखवण्यात आले आहे. तर सगळ्यात शेवटी दिसलेला सुबोध भावे हा या सगळ्या गोष्टीला ट्विट्स्ट देणारा असणार आहे यात काहीही शंका नाही. 

   झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी ‘वाळवी’ची निर्मिती केली असून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. यापूर्वी झी स्टुडिओज आणि परेश मोकाशी यांनी मराठी सिनेसृष्टीला हरीशचंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि चि. व चि. सौ. का. असे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे आता ‘वाळवी’ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार हे नक्की !

 आता एकदा तरी वाळवीचा ट्रेलर पाहा.

Leave a Comment