FIFA वर्ल्ड कपमध्ये नोरा फतेही करणार परफॉर्मन्स, जेनिफर आणि शकीरानंतर नोराला मान

फुटबॉलच्या दुनियेतील सर्वात मोठे टुर्नामेंट म्हणजे फिफा (FIFA). पुढच्या महिन्यात फुटबॉलच्या या जागतिक स्पर्धेला सुरूवात होत आहे. FIFA (FIFA World Cup) वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा भारत आपले खास योगदान देत आहे. 2022 मधील या जागतिक स्पर्धेत पहिल्यांदाच मूळ मोरोक्को येथील पण भारतात आपले नाव कमावलेली अभिनेत्री आणि अप्रतिम नृत्यांगना नोरा फतेही (Nora Fatehi) परफॉर्मन्स करणार आहे. नोरा फतेही भारताकडून प्रतिनिधित्व करणार असल्याचे आता समोर आले आहे.  20 नोव्हेंबरपासून फिफाचा हा सर्वात मोठा कार्यक्रम होणार असून जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) आणि शकिरा (Shakira) नंतर हा मान नोरा फतेहीला मिळाला आहे. 

नोरा फतेही फिफाच्या संगीत व्हिडिओमध्येदेखील झळकली 

नोरा आपल्या नृत्यामुळे एक जागतिक आदर्श अर्थात ग्लोबल आयकॉन (Global Icon) झाली आहे. तिला नृत्याच्या क्षेत्रात एका वेगळ्या उंचीवर पाहिलं जातं. तिने पुन्हा एकदा भारताचे नाव देशात झळकवले असल्याच्या प्रतिक्रिया आता येत आहेत. नोरा विश्वकपामध्ये भारत आणि विशेषतः दक्षिण पूर्व आशियाचे प्रतिनिधित्व करणार असून ती पहिलीच अभिनेत्री ठरली आहे. याआधी केवळ जेनिफर लोपेझ आणि शकिरा यांनी फिफा वर्ल्ड कपमध्ये आपल्या नृत्याचे सादरीकरण केले होते. तर फिफाच्या संगीत व्हिडिओमध्येही नोरा फतेही दिसणार आहे. या गाण्याची निर्मिती रेडऑनने केली असून सर्वात प्रभावशाली रेकॉर्ड निर्मात्यापैकी हे एक आहेत. रेडऑनने यापूर्वीदेखील फिफाच्या गाण्यावर काम केले असल्याने त्यांना याचा अनुभव आहे. शकिराच्या वाका वाका आणि ला ला ला यामध्येही त्यांनी काम केले होते. त्यामुळे आता नोराचा नृत्याचा फिफा व्हिडिओ जगभरात प्रसिद्ध होईल यात शंका नाही आणि त्यामुळेच तिचे चाहते सध्या खूपच आनंदी आहेत. नोराला यासाठी सोशल मीडियावरही शुभेच्छा मिळत आहेत. 

नोरा सध्या ‘झलक दिखला जा’ मध्ये परीक्षक 

नोराने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलीवूडमध्ये जम बसवला आहे. मात्र त्याशिवाय तिच्या नृत्यामुळे ती जगभरात प्रसिद्ध आहे. सध्या नोरा निर्माता दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) आणि माधुरी दीक्षित नेने (Madhuri Dixit Nene) यांच्यासह ‘झलक दिखला जा’ या रियालिटी शो च्या 10 व्या सीझनची परीक्षक म्हणून काम पाहत आहे. केवळ नोरा परीक्षक आहे म्हणूनदेखील काही स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतल्याचेही समोर आले होते. त्यामुळे कलाकारही तिचे खूप मोठे चाहते आहेत, हे नेहमी दिसून येते. याशिवाय अजय देवगणच्या ‘थँक गॉड’ या चित्रपटातही नोरा दिसणार आहे. यामधील सिद्धार्थ मल्होत्रासह तिचे मणिके हे गाणं सध्या प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. त्यामुळे आता नोरा फिफामध्ये काय कमाल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर नोरामुळे भारताचेही नाव मोठे होत असल्याने तिच्या चाहत्यांचा आनंदही वेगळाच आहे. मूळची मोरक्कोची असूनही नोरा आता भारतात स्थिरावली आहे आणि एका वेगळ्या उंचीवर स्वतःलादेखील नोराने नेऊन ठेवले आहे. 

Leave a Comment