असे करा महालक्ष्मीचे व्रत, मार्गशीर्ष गुरुवार माहिती

 महालक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी यासाठी महालक्ष्मीचे व्रत अनेक जण करतात. येत्या गुरुवारपासून मार्गशीर्ष महिना सुरु होणार आहे. तुम्हीही यंदा महालक्ष्मीचे व्रत करण्याचा निश्चय केला असेल तर आजचा विषय तुमच्यासाठी फारच महत्वाचा असा असणार आहे. कारण आज आपण महालक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. महालक्ष्मी व्रत कोणी? कसे व का करावे ही माहिती जाणून घेतल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्यातून फायदा होईल. चला जाणून घेऊया या विषयीची अधिक माहिती 

लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी

महालक्ष्मीचे हे व्रत लक्ष्मीची कृपा आपल्यावर कायम राहण्यासाठी केले जाते. लक्ष्मी अर्थातच धनधान्य संपदा आणि त्यासोबत आयुष्यात आनंद देणारी अशी देवता आहे. तुमच्याकडे खूप पैसा असून चालत नाही तर त्यासोबत समाधान आणि असलेल्या धनधान्याचा आनंद घेणे हे फार गरजेचे असते. लक्ष्मीची कृपा असेल तर ते समाधान तुम्हाला मिळते. या संदर्भातील कथा तर आपण सगळेच वाचतो. पण लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहण्यासाठी महालक्ष्मीचे व्रत नित्यनेमाने मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी केले जाते. हा काळ महालक्ष्मी मातेचा पृथ्वीतलावर येण्याचा असतो. त्यामुळे तिच्या स्वागतासाठी आणि तिला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत करतात.

कोणी करावे हे व्रत?

महालक्ष्मीचा महिमा पुरवितो भक्तांची कामना

महालक्ष्मीचे हे व्रत अगदी कोणीही करु शकते. हे व्रत विवाहित स्त्रीनेच करावे असे कुठेही लिहिलेले नाही. कुमारिका देखील हे व्रत करु शकतात. इतकेच काय तर पुरुषांनीही हे व्रत घरातील महिलेसोबत केले तरी चालू शकते या व्रतासाठी कोणतेही खास आणि वेगळे नियम सांगितले जात नाहीत. शिवाय मार्गशीर्ष महिना सुरु झाला आणि त्यानंतर तुम्ही हे व्रत करायला घेतले तरी देखील चालू शकते. एखादा गुरुवार राहिला तरी काही हरकत नाही. पण प्रेमाने हे व्रत करणे फार गरजेचे असते.

असा करा पूजाविधी

महालक्ष्मीचे व्रत करण्याचे निश्चित केल्यानंतर तुम्हाला फार काही मोठी सामग्री लागत नाही. यासाठी तुम्हाला एक पाट, कलश, नारळ, पाच विड्याची पाने  किंवा कोणतीही पाच पाने, सुपारी, पाच फळं, तांदूळ, हळद-कुंकू, वेणी, कापसाचे वस्त्र,अगरबत्ती आणि महालक्ष्मी व्रताचे पुस्तक लागते. 

  • सगळ्यात आधी तुम्ही घर स्वच्छ करुन घ्या. पुजेची सगळी भांडी स्वच्छ करुन घ्या. ज्या ठिकाणी पूजा करणार आहात ती जागा आवरुन घ्या. 
  • पाट घेऊन पाटाभोवती रांगोळी काढा. पाटावर मूठभर तांदूळ गोलाकार पसरवा.
  • कलश घेऊन त्यावर हळदी कुंकवाची बोट ओढून घ्या. कलशात अर्धे पाणी भरुन त्यात सव्वा रुपया टाका. आता तांदूळावर कलश ठेवून त्यात पाच पाने ठेवून नारळ ठेवा.
  • देवीला कापसाचे वस्त्र किंवा दागिने घालून वर वेणी घाला. समोर विड्याची पाच पाने ठेवून त्यावर सुपारी आणि पाच फळे ठेवा. दिवा, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न आणि सुगंधीत करा.
    त्यानंतर देवीची मनोभावे पूजा करा. महालक्ष्मी महात्म्य वाचा आणि देवीला जो प्रसाद तुम्हाला द्यायचा असेल तो तुम्ही द्या. 
  • हल्ली या पूजेलाही फॅन्सी असे लुक देण्यात आले आहे. तुम्हाला देवीचा मुखवटा, दागिने, नथ, डोळे असे बरेच काही मिळते. पण ते काही नसेल तरी देखील तुम्हाला पूजा करता येते. 

महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर अशीच राहो….

Leave a Comment