175 वर्षांचा इतिहास असलेल्या गिरणीत आर्ट महोत्सवाचे आयोजन

मुंबईतील 175 वर्षे जुन्या ऐतिहासिक कापड गिरणीच्या देखण्या आवारात वसलेली नाइन फिश आर्ट गॅलरी (Nine Fish Art Gallery) येत्या 14 ऑक्टोबरला भारतीय उपखंडातील 35 वर्षांहून कमी वयाच्या 35 तरुण कलावंतांना प्रोत्साहन देण्यास आणि त्यांचे यश साजरे करण्यास सज्ज आहे! या उत्सवाच्या  मुंबईतील भायखळा येथे होणाऱ्या 5व्या पर्वात नाइन फिश आर्ट गॅलरीने डॉट लाइन स्पेस आर्ट फाउंडेशनच्या सहयोगाने क्युरेट केलेली चित्रे, मांडणशिल्पे (इन्स्टॉलेशन्स), शिल्पकाम, चित्रपट, व्हिडिओ आणि सादरीकरणांचे दर्शन घडवले जाणार आहे.  कलाविश्वातील चिंतन, संवाद, चौकसता आणि सहयोग यांसाठी एक व्यासपीठ तयार करून देणाऱ्या या 4 दिवसांच्या भव्य कला महोत्सवाला भेट देण्यासाठी मुंबईकरांनी आवर्जून आले पाहिजेत असा मानस आहे. चित्रकला, सिरॅमिक कला, शिल्पकला, प्रिंटमेकिंग आदी विविध कलांमध्ये काम करणारे 35 तरुण कलावंत 200हून अधिक कलाकृतींचे प्रदर्शन मांडणार आहेत व त्यांची कला साजरी करणार आहेत. श्रीलंका ते हरयाणा आणि उत्तराखंड ते आसाम अशा संपूर्ण भारतीय उपखंडातील कलावंत यात सहभागी होणार आहेत. या महोत्सवात अनेक समृद्ध कार्यशाळा, चर्चा, स्क्रीनिंग्ज, स्टॅण्ड-अप कॉमेडी शो आणि असे बरेच काही आयोजित करण्यात आले आहे. डॉ. माधुरी काथे, सुलताना खान, मोहसिन हजूरी, धनश्री देशमुख, संदीप बोबडे, प्रियंका तायाल यांसारख्या ख्यातनान कलाकारांच्या तसेच थॉटपॉट- ए कोलॅबरेटिव डिझाइन इनिशिएटिवमधील कलावंतांच्या अनेक कलाकृती येथे प्रदर्शनासाठी मांडल्या जाणार आहेत.

महोत्सवाचे उद्दिष्ट कलाकृतींची निर्मिती

“या महोत्सवाचे उद्दिष्ट कलाकृतींची निर्मिती, त्या क्युरेट करणे, सहयोग करणे तसेच कलेचे विविध प्रकार साजरे करणे हे आहे. विवीध कला चळवळींना एकत्र आणण्यावर आमचा विश्वास आहे आणि आपल्या देशातील प्रादेशिक कला व हस्तकला सर्वांपुढे आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो. मुंबईतील या चार दिवसांच्या महोत्सवात वेगवेगळी कला प्रदर्शने, वैशिष्ट्यपूर्ण आर्ट रेसिडेन्सी कार्यक्रम, कला शिष्यवृत्ती आणि अन्य अनेक गोष्टींच्या माध्यमातून प्रत्येक कलावंतांचे खरे चैतन्य पूर्ण प्रामाणिकपणे बाहेर आणण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे. या उत्सवादरम्यान राबवला जाणारा आर्ट रेसिडेन्सी प्रोग्राम मुंबईबाहेरील संपूर्ण उपखंडातील कलावंतांना कल्पना, तत्त्वे व तंत्रांचे आदानप्रदान करण्याची मुभा देईल,” असे नाइन फिश आर्ट गॅलरीचे क्युरेटर गौरमणी दास म्हणाले.

या 4 दिवसांच्या भव्य महोत्सवात कला कार्यशाळा, चर्चा, संगीताचे कार्यक्रम, कॉमेडी शो, सादरीकरणे तसेच चित्रपटांची स्क्रीनिंग आयोजित करण्यात आली आहेत. या माध्यमातून येथे चर्चा घडतील, संवाद घडेल तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे वातावरण उत्सवी राहील.

प्रख्यात आर्किटेक्ट तपन मित्तल-देशपांडे व निकेत देशपांडे यांनी डिझाइन केलेल्या तसेच संरचनेकडे बघण्याचा अतिप्रगत दृष्टिकोन समजल्या जाणाऱ्या मुंबईतील टर्मिनल II वरील ‘जय हे’ या नवीन म्युझियमवरील माहितीपर चर्चेचे आयोजन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी करण्यात आले आहे. तसेच बातुल मामूवाला हे स्टोनक्लेचा वापर करून अॅनिमल स्कल्प्चर पॉटरीवर 2 तासांचे संवादात्मक सत्र घेणार आहेत. डॉ. यामिनी दंड शहा अॅब्स्ट्रॅक्ट ओरलिझमसंदर्भात प्रेरणादायी चर्चा घेणार आहेत. ‘बबल्स’ या लघुपटाचे स्क्रीनिंग होणार असून, हेष सरमळकर नंतर त्यावर प्रश्नोत्तरांचे सत्र घेणार आहेत.

अनेक कार्यशाळांचे आयोजन

उत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही अनेक कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. अन्वी पॉटरीचे संदीप मंचेकर राकु फायरिंगवर कार्यशाळा घेणार आहेत, शार्दूल कदम पोरट्रेट्सवर प्रात्यक्षिक देणार आहेत. त्यानंतर तुर्या ग्रुप ऑफ आर्टिस्ट्सच्या वतीने आर्टिस्ट्स प्रेझेंटेशनवर चर्चा होणार आहे. संध्याकाळी प्रख्यात कवी व लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) ‘सन्माननीय आतिथी’ म्हणून या उत्सवाला भेट देणार आहेत. भव्य अशा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला कलाक्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी अनेक समृद्ध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. यात नेहा देशमुख यांची मिनिएचर होम पॉटरी कार्यशाळा डेकॉरच्या चाहत्यांसाठी विशेष आकर्षक ठरणार आहे. यामध्ये टेराकोटाच्या माध्यमातून मिनिएचर क्ले डेकॉर कलेचा आनंद घेता येणार आहे. त्यानंतर योगेश पाटील यांची ‘वूडकट प्रिण्टमेकिंग’ची कार्यशाळा, बातूल मामूवाला व विनिती मुळगी यांची स्ग्रॅफिटो कार्यशाळा होणार आहे. त्याशिवाय अंजना मेहरा, रवि मंडलिक यांच्यासारखे तज्ज्ञ कलारसिकांसाठी प्रेरणादायी भाषणे व कला सादरीकरणे घेणार आहेत. प्रशांत प्रभू व अनुज दागा ‘द ऑर्ट ऑफ स्पेशिअल रिप्रेझेंटेशन’ या विषयावर स्थापत्यशास्त्रीय भाषण देणार आहेत. 5 कलावंतांच्या स्टॅण्ड-अप कॉमेडी शो ने या दिवसाची सांगता होणार आहे.

महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आर्ट क्युरेटर, समकालीन कलासमीक्षक व इटलीतील गॅलरीस्ट जाँ ब्लाशेअर्ट यांचे प्रस्तुतीकरण व भाषण होणार आहे. थॉटपॉट या डिझाइन थिंकिंगवरील सहयोगात्मक प्लॅटफॉर्मद्वारे राबवल्या जाणाऱ्या  L.O.S.T (लॉट्स ऑफ स्मॉल थॉट्स) या उपक्रमाबद्दल यात चर्चा होणार आहे. विज्ञान , कला आणि या दोहोंना सांधणारा दुवा म्हणजेच सर्जनशीलता या विषयावर डॉ. पुनर्वसू जोशी यांचे व्याख्यान होणार आहे. संध्याकाळी विजी वेंकटेश यांचे ‘चाय फॉर कॅन्सर’ हे सत्र होणार आहे. मॅक्स फाउंडेशन या हेल्थ इक्विटीला वेग देण्यासाठी समर्पित जागतिक ना-नफा तत्त्वावरील संस्थेद्वारे राबवला जाणारा  हा एक निधीउभारणी उपक्रम असून, याद्वारे सातत्याने चाकोऱ्या मोडल्या जात आहेत. प्रख्यात चित्रकार प्रभाकर कोलते महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी उपस्थित राहणार आहेत. अखेरच्या दिवशी सात निवडक कलावंतांना शिष्यवृत्ती प्रदान केल्या जाणार आहेत. कलावंत अरुणांशू चौधरी, विलास शिंदे हे कलाकार सादरीकरण करणार आहेत.  

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग करणार सोसायट्यांना डिजिटल हेल्थ बोर्डचे वितरण

कोल्हापुरी चपलांची अशी घ्या काळजी

मखाणा (Makhana) खाण्याचे हे फायदे करतील आश्चर्यचकित

Leave a Comment