Dhaka Terror Attack वर आधारित ‘फराझ’चा ट्रेलर आऊट

जगभरात झालेल्या आतंकवादी हल्ल्यांनी कायमच लोकांच्या मनात एक भीती निर्माण केली आहे. काही हल्ले हे आजही अनेकांच्या अंगावर काटा आणतात. आतापर्यंत आतंकवादी हल्ल्यानंतर त्याचे चित्रपटात, वेबसिरिजमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. आता त्यात आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. देशाला हादरवून टाकणारा Dhaka Terror Attack आता मोठ्या पड्यावर दिसणार आहे. 2016 रोजी झालेल्या या हल्ल्यात लक्षणीय कामगिरी केलेला फराझ हुसैन (Faraaz Hossain) आज आपल्यात नाही. पण त्याने मुस्लिम असून केलेली कामगिरी ही खरा मुस्लिम धर्म दर्शवते हे त्याने त्याच्या वागणुकीतून जगाला दाखवून दिले. १ जुलै २०१६ रोजी झालेल्या या हल्ल्यात नेमके काय काय घडले ते फराझच्या डोळ्याने पाहण्याची ही संधी ‘फराझ’ या चित्रपटातून मिळणार आहे. ज्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे

अंगावर काटा आणणार ट्रेलर

इतर कोणत्याही दिवसासारखा तो दिवस होता. ढाका येथील होली आर्टिसन बेकरीमध्ये हा हल्ला झाला होता. अल्ला हू अकबरचा नारा देत या कॅफेमध्ये आंतकवादी घुसले आणि त्यांनी बेछुट गोळीबार केला. त्यात अनेक परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. याच कॅफेमध्ये फराझ हुसैन अडकला होता. फराझला अडकवण्याचा आतंकवाद्यांचा कोणताही हेतू नव्हता कारण तो मुस्लिम होता. पण त्याच्यासोबत आलेल्या दोन मित्रांना वाचवण्यासाठी तो त्या कॅफेतून जाण्यास नकार देतो आणि त्यात मारला जातो. त्याच्यासोबत त्याचे दोन भारतीय मित्रही मारले जातात. मुस्लिम धर्माचा असून मुस्लिम धर्म हा हिंसा करण्यास सांगत नाही हे न घाबरता सांगणारा फराझ या ट्रेलरमध्ये दिसतो. अवघ्या 20 वर्षांचा हा मुलगा धर्म काय ते समजावून सांगतो. त्याचा हा ट्रेलर पाहिल्यानंतर अंगावर काटा येतोच. शिवाय त्या दिवशी नेमके काय झाले होते? हे जाणून घेण्याची उत्सुकता देखील वाढवतो. 

ट्रेलरमध्ये दिसून येतेय मेहनत

सत्य घटनेवर आधारीत चित्रपट बनवण्यात बरीच मेहनत असते. यात कोणत्याही गोष्टींचा अतिरेक करुन चालत नाही जे घडले तेच दाखवणे गरजेचे असते. हंसल मेहता( Hansal Mehta)  यांच्या चित्रपटात मांडण्यात आलेले कथानक हे सत्य घटनेला अधिक धरुन असलेले दिसते. 10 तास हे आतंकवादी त्यांच्यासोबत काय काय करत होते हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी या छोट्याशा ट्रेलरमधून केला आहे.  हा चित्रपट येत्या 3 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. 

फराझसाठी श्रद्धांजली

फराझ हुसैन

मुस्लिम असून मुस्लिम धर्माल गालबोट लावणाऱ्या या काही लोकांना खरा धर्म काय असतो हे जाणून घेणे गरजेचे आहे. इस्लाम धर्मात हिंसेला कुठेही थारा नाही. असे असतानाही अनेक तरुणांचे आजही ब्रेनवॉश केले जाते. ज्यामुळे अनेक जण या जाळ्यात अडकताना दिसतात. फराझने जे केले ते मैत्री आणि इस्लामचा खरा अनुयायी असल्यामुळे केले जे सगळ्यांनी शिकण्यासारखे आहे. अवघ्या 20 व्या वर्षी त्याला जगाचा निरोप घ्यावा लागला तरी आजही तो अनेकांच्या मनात घर करुन गेला आहे. 

फराझचा ट्रेलर पाहून तुम्हाला काय वाटले आम्हाला नक्की कळवा

Leave a Comment