गणेशोत्सव दरम्यान मुंबईत मेगाब्लॉक नाही – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

आगामी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबापुरी सज्ज झाली असून गणेशोत्सवा दरम्यान गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी शनिवारी गोड बातमी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत गणेशोत्सवा दरम्यान कोणत्याही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक करण्यात येणार नसल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शनिवारी एक्सवरुन प्रतिक्रिया देताना दिली. या निर्णयाचा मुंबईतील गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईत दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येता. या काळात मोठ्या संख्येने मुंबईत भक्तगण येत असतात. प्रामुख्याने दक्षिण मुंबईतील लालबाग, परळ, खेतवाडी, गिरगाव यासारख्या विभागात दर्शनासाठी लाखो गणेशभक्त येत असतात. यासाठी प्रामुख्याने हजारो गणेशभक्तांकडून रेल्वे मार्गाचा वापर केला जातो. मात्र रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच शनिवार आणि रविवारी काही मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केल्याने गणेशभक्तांना त्याचा मोठा फटका बसणार होता. परिणामी अनेक गणेशभक्तांनी हा मेगाब्लॉक रद्द करण्याची मागणी केली होती.

गणेशभक्तांच्या या मागणीनंतर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मध्य रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक नरेश ललवानी यांच्यासह पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन गणेशोत्सवा काळात मुंबईत मेगाब्लॉक रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने ही विनंती मान्य केली असून गणेशोत्सवाच्या काळात तिन्ही रेल्वे मार्गावर कोणत्याही प्रकारचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात येणार नाही असे कळविले आहे, अशी माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शनिवारी एक्सवरुन दिली.

Leave a Comment