”मुख्यमंत्र्यांनीच जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलं अन् गृहमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातल्या अंतरवाली गावामध्ये मनोज जरांगे यांनी सतरा दिवस उपोषण केलं. मात्र जरांगेंना उपोषणाला मुख्यमंत्र्यांनी बसवलं होतं, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणामध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

शनिवारी छत्रपती संभाजी नगर येथे मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सरकारने तब्बल ४५ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांची घोषणा मराठवाड्यासाठी केली आहे. मंत्रिमंडळ बैठीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मंत्रिमंडळ बैठकीवरुन सरकारवर ताशेरे ओढले तर जालन्यात झालेल्या मराठा आरक्षण उपोषणावर प्रश्न उपस्थित केले. मनोज जरांगे पाटलांना मुख्यमंत्र्यांनीच उपोषणाला बसवलं, असा थेट आरोप पटोलेंनी केला आहे.

नाना पटोले म्हणाले की, जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होतं. ३१ तारखेच्या मध्यरात्रीच आंदोलक संतप्त झाले. मात्र १ तारखेला तीन वाजता सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले. याच दिवशी मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु होती. या बैठकीवरुन लक्ष वळवण्यासाठीच लाठीचार्जची घटना घडवली गेली, असा आरोप पटोलेंनी केला.नाना पटोले बोलले की, मुख्यमंत्र्यांनीच जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलेलं होतं हे आता सिद्ध झालेलं आहे. कारण सौम्य लाठीचार्ज झाला आणि फडणवीसांनी माफीही मागितली. दोन समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

जरांगे पाटलांवरुन केलेल्या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण थेट उपोषणकर्त्यांवर नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आरक्षणावरुन बोलताना पटोले म्हणाले की, काँग्रेसची आरक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट आहे. जे मागास आहेत त्यांना न्याय मिळाले पाहिजे. कोणाच्या तोंडचा घास हिरावून नव्हे तर जातीनिहाय जनगणना करुन मिळालं पाहिजे. ओबीसींना २७ टक्के तसेच मराठा, धनगर यांना पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडून पुढे आरक्षण दिलं पाहिजे.

Leave a Comment