अनोळखी आजोबा…

 कोकणाचा हिरवागार निसर्ग जसा प्रेमात पाडणारा आहे. तशा तेथील रंजक भूतांच्या कथाही अंगावर काटा आणणाऱ्या असतात. तुमची गाठ कोणत्याही कोकणी माणसाशी पडली तर तुम्हाला देवचार, वेताळ, मुंजा, चकवा असे गावाप्रमाणे त्याचे वेगवेगळे प्रकार ऐकायला मिळतात. काही भूतही (Kokan Ghost Stories)त्रासदायक तर काही भूत ही चांगली अशी संकल्पना कोकणात आहे. लहानपणी अशीच एक गोष्ट सातत्याने आम्हाला सांगितली जायची ती म्हणजे माझ्या मामाच्या मुलाची… आजही ती गोष्ट ऐकली की अंगावर काटा येतो खरा. पण भूत चांगलेही असतात याचं समाधान होतं. 

  गणपतीचे दिवस आणि कोकण म्हणजे नुसती मजा. कोकणात या दिवसात इतकी मजा असते की, विचारता सोय नाही. गावात जितकी घर आणि जितके गणपती त्यांच्या घरात जाऊन आरती करण्याची पद्धत होती. घरातील लहान असो वा ज्येष्ठ सगळी अगदी फळीच्या फळी एकमेकांच्या घरी आरतीला जायची. आपल्या घरात आरतीचा नंबर आता लागेल हे आरतीचा आवाज जवळ आला की कळायचं. तो पर्यंत गावात दूरुन का असेना आरतीचा आवाज यायचा. संध्याकाळच्या आरतीच्या वेळी हातात बॅटरी, कंदील घेऊन लोकं एकामागोमाग एक निघायचे. गणपतीतल्या अशाच एका संध्याकाळी आरती करण्यासाठी माझ्या मामाचा मुलगा ( साधारण 5 ते 7 वर्षांचा) या सगळ्या मुलांसोबत आरती करण्यासाठी निघून गेला. एक दोन घरं फिरल्यानंतर तो अचानक त्या सगळ्यांपासून वेगळा झाला. त्याने या सगळ्यांना आवाजाच्या दिशेने शोधण्याचा प्रयत्न केला असेल पण त्याला काही कोणी दिसेना. दूरवर असलेला अंधारामुळे त्याला कुठे जावे नेमके कळतं नव्हते. 

गावात अंधारुन लवकर येत असे. त्यामुळे आरती जास्तीत जास्त 9 वाजेपर्यंत चालायची. त्याहून अधिक वेळ कधीच घेतला नसेल. दूरवर आरतीचा आवाज येत नव्हता हे पाहून माझ्या आजोबांनी माझ्या मामीला काय गं बारका अजून आला नाही का? असा प्रश्न केला. मामीही काळजीने सतत येरझाऱ्या घालत होती. 9.30 उलटून गेले. पण अजूनही तो आला नव्हता. घड्याळ्याचे काटे पुढे जात होते तसे आजोबाही चलबिचल करु लागले. आधीच थोडं जंगल जवळ असल्यामुळे जंगली श्वापदांची खूप जास्त भीती होती. अशात त्यांच्या मनात अनेक वाईट विचार घोळू लागले. त्यांना काय करावे कळेना. शेवटी त्यांनी पायात चपला सरकवल्या आणि त्याला शोधायला ते बाहेर पडणार इतक्यात त्यांना दूरुन कोणतरी दुडकत दुडकत घराजवळ येताना दिसलं. त्यांनी चष्मा पुसून नीट पाहिलं. तर तो बारक्या होता. मस्त आनंदात दुडकत येत होता.  त्याला येताना पाहून अनेकांचा जीव भांड्यात पडला. आजोबांनी धावत जाऊन त्याला कडेवर घेतले आणि सुस्कारा सोडत त्याच्या गालावर एक मुका घेतला. 

 त्यासरशी तो लगेच म्हणाला, मी हरवलो होतो. पण बरं झालं मला एक आजोबा भेटले. त्यावर माझ्या आजोबांनी त्याला आजुबाजूच्या घरातील वेगवेगळ्या आजोबांची नावं घेऊन विचारले. त्यावर तो नाही, नाही असे उत्तर देत होता. 

त्याला घरात आणले तसे तो सांगू लागला, ‘आरती करायला आलेले सगळे माझ्यापुढे निघून गेले. मला ते कुठे गेले माहीत नव्हते. मी त्यांना खूप आवाज दिला. पण ते कोणीच आले नाही. शेवटी जंगलातून तुमच्यासारखे धोतर घातलेले एक उंच आजोबा आले. त्यांनी मला विचारलं तू कोणाचा? मी सांगितलं तुमचं नाव. त्याने मला कडेवर घेतलं आणि म्हणाले चल मी तुला घरी सोडतं. त्यांनी मला वाटेत गोष्ट सांगितली. त्यांना मी घरी या असंही सांगितलं. पण ते मला त्या कुंपणापाशी सोडून म्हणाले आता सरळ घरी जायचं मागे वळून अजिबात पाहायचं नाही.’

माझ्या आजोबांनी दुरूनच हात जोडून आभार मानले. त्यावेळी काही कळलं नाही. पण नंतर कधी या गोष्टीसंदर्भात बोलणे झाल्यावर त्यांनी मला सांगितले की हा आपला देवचार. त्यानेच बारक्याला घरी आणले.

अशी देवचाराची कथा आजही आमच्या लक्षात आहे. 

Leave a Comment