काही केल्या मोदक (Ukdicha Modak) जमत नाहीत… ट्राय करा या ट्रिक्स

 बाप्पाला मोदक जितके प्रिय आहेत तितकेच ते तुमच्यापैकी कित्येकांना असतील. अंगारकी, संकष्टी, गणेशोत्सवाच्या काळात किंवा कधीही चव आली म्हणून मोदक खाण्याची इच्छा तुम्हालाही होते असेल तर आजचा विषय तुमच्यासाठी फारच जास्त महत्वाचा आहे. कारण ‘उकडीचा मोदक’ (Ukdicha Modak) हा पदार्थ कितीही सोपा वाटला तरी तो तसा कौशल्यपूर्ण आहे. मोदकासाठी लागणारी उकड, त्याचे सारण आणि पाकळ्या या उत्तम झाल्या तर मोदक तितकाच सुंदर दिसतो आणि चवीलाही छानच लागतो. अनेकांचे मोदक आजही काहीना काही कारणाने बिनसतात. कधी सारणच कमी गोड होतं तर कधी उकड चांगली न आल्यामुळे मोदक फुटतात. अशावेळी जर तुम्हाला परफेक्ट असा मोदक शिकायचा असेल तर या ट्रिक्स नक्की कामी येतील. संकष्ट चतुर्थी का आहे महत्वाची घ्या जाणून 

 साहित्याची तयारी

उकडीच्या मोदकाची अशी करा तयारी

उकडीचा मोदक करायचा म्हटल्यावर आपल्याला काय साहित्य हवे ते माहीत असायला हवे.

 1. उकडीच्या मोदकासाठी सगळ्यात महत्वाचे आहे ते म्हणजे सुगंधी ‘बासमती पीठ’(Basmati Atta) बाजारात चांगल्या क्वालिटीचे आणि सुंगधाचे असे पीठ मिळते. पांढरे शुभ्र आणि सुंगध पाहूनच पीठ घ्या. वाण्याकडे मागतानाच मोदकाचे पीठ मागितले तर ते अधिक सोयीस्कर होईल. 
 2.  सारणासाठी नारळ हवा. नारळ जरा मोठा आणि पाणीदार घेतला तर त्याचे खोबरे हे ओलसर असते त्यामुळे नारळापासून बनवलेले सारण हे अधिक रसदार होण्यास मदत मिळते. 
 3. गूळ हा देखील या पदार्थात फार महत्वाची भूमिका बजावतो. गूळ निवडताना तो फार पांढरा निवडू नका. 
 4. सारणामध्ये जरा खसखस आणि ड्रायफ्रुट असेल तर त्याची चव अधिक वाढते. शिवाय तूप, दूध आणि वेलची पूड हे साहित्य अगदी हवेच.

असे करा सारण

ओल्या खोबराचे मोदक सारण

उकड काढण्याआधी जर तुम्ही सारण करुन घेतले तर ते अधिक सोयीचे होते (किंवा एकाचवेळी मल्टीटास्क करणे शक्य असेल तर दोन्ही गोष्टी एकत्रही करु शकते.) 

 1.  एक मध्यम आकाराचा नारळ खवला असेल तर मोठे चमचे तूप गरम करुन त्यामध्ये साधारण एक मोठा चमचा खसखस घालून परतून घ्या. त्यात साधारण दोन वाट्या खवलेलं ओलं खोबरं घालून त्यात लगेचच एक वाटी चिरलेला गूळ घाला ( गोड कमी आवडत असेल तर ते कमी- जास्त चवीनुसार केले तरी चालेल)
 2. आता हे सगळं साहित्य नीट परतून घ्या. यात महत्वाची टीप अशी की, ओल्या खोबऱ्यातील गोडवा घालवायचा नसेल तर ते सतत परतत राहू नका. आच मंद करुन गूळ त्यात विरघळू द्या. गूळ एकजीव झाला की, त्यात ड्रायफ्रुट्स आणि वेलची पूड घाला.  

उकड काढताना

आता यातील सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे उकड काढणे. त्यासाठी थोडी काळजी घ्यावी लागते. 

 1. उकड काढण्यासाठी साधारण दोन ते तीन वाटी पिठासाठी एक ते दीड वाटी पाणी उकळत ठेवा. पाणी उकळले की, त्यात थोडे तूप आणि दूध घाला. दूध हा घटक या पिठाला मऊसूत बनवण्याचे काम करतो. त्यामुळे साधारण एक डाव दूध हमखास घाला. 
 2. चिमूटभर मीठ घालून त्यात तांदळाची पिठी ( मोदकाचे पीठ) घाला. पीठ भागवून घ्या. एका परातीत तूपाचा घात लावून पीठ चांगले एकजीव होईपर्यंत मळून घ्या. 

मोदक करताना

वळलेला उकडीचा सुंदर मोदक

अनेकदा मोदकाचा आकार आपल्याला जमत नाही. पारी नीट जमत नाही किंवा मोदक फाटतो. यासाठी सोप्या टिप्स 

 1. मोदकासाठी पारी किंवा वाटी बनवताना अडचणी येत असतील. पिठाचा एक गोळा घेऊन तो हातावर चांगला मळून घ्या. त्यावर कोणतीही भेग दिसता कामा नये. आता तो गोळा चपटा करुन तांदळाच्या पीठात बुडवून लाटून गोलाकार करावा किंवा हातानेच तो पसरावा. 
 2. त्यात मोदकाचे सारण भरावे. 
 3. आता पाकळ्या करताना तूपाचा हात न घेता चक्क थोडे थोडे पीठ घेऊन कळ्या पाडून घ्याव्या त्यामुळे पीठ चिकटत नाही आणि पाकळ्या पटापट होण्यास मदत मिळते. 

तयार मोदक, मोदक पात्रात ठेवून ते साधारण 15 ते 20 मिनिटं त्यांचा रंग बदलेपर्यंत ठेवावेत. आता जेव्हा इच्छा होईल त्यावेळी अशापद्धतीने मोदक करा. चांगलेच होतील. 

अधिक वाचा

नवरात्रीचे रंग ठरतात तरी कसे, अशी करा तयारी

नवरात्र(Navratri)घेऊन येणार आनंद, जाणून घ्या माहिती आणि कथा

Leave a Comment