घरगुती नवरात्र ते सार्वजनिक मंडळाचे स्वरूप गडावरील आई

मुंबई : काही मित्रांनी एकत्र येऊन गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सव मंडळाची स्थापना केल्याच्या अनेक घटना आजवर आपण पाहिल्या आहेत. मात्र भांडुपमध्ये ‘गडावरील आई’ म्हणून आज संपूर्ण मुंबईमध्ये ओळख असलेल्या देवीची प्रतिष्ठापना ४८ वर्षांपूर्वी चार भावांनी खाऊच्या पैशातून आपल्या घरात केली होती. मात्र नवसाला पावणाऱ्या या ‘गडावरील आई’चे स्वरुप आता सार्वजनिक मंडळाचे झाले असून, या देवीच्या दर्शनाला मुंबई-ठाण्यासह महाराष्ट्रातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात.

भांडुप कोकण नगर येथे राहणाऱ्या चार गाडेकर बंधूंनी ४८ वर्षांपूर्वी त्यांना वडिलांकडून मिळणाऱ्या खाऊच्या पैशातून घरातच देवीची प्रतिष्ठापना केली होती. यावेळी त्यांनी मिळालेल्या पैशातून देवीचे फोटो कापून त्याची फ्रेम बनवून उत्सवाला सुरूवात केली होती. मात्र या देवी करण्यात येत असलेल्या नवसाला ही पावल्याने तिची संपूर्ण परिसरात ख्याती झाली. हळूहळू ‘नवसाला पावणारी गडावरील आई’ अशी या देवीची ख्याती दाही दिशांमध्ये पसल्याने दूरहून भाविक या देवीच्या दर्शनला येऊ लागले. काेकण नगरमधील या कुटुंबामध्ये ११ लोक राहतात. या कुटुंबाने सुरू केलेल्या या देवीच्या दर्शनासाठी भाविक दूरहून येत असल्याने आता तिला सार्वजनिक मंडळाचे स्वरुप आले आहे. उत्सव काळामध्ये या कुटुंबाकडून गरबा, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. या धार्मिक उत्सवाबरोबरच या कुटुंबाकडून सामाजिक दायित्व ही जोपासले जाते. अनाथ आश्रमाला विविध वस्तू दान करणे, कोल्हापूर भागातील पूरग्रस्तांना मदत, अन्नदान असे विविध उपक्रम या कुटुंबाकडून राबविले जातात.

Leave a Comment