फडणवीसांच्या व्हायरल व्हिडीओवरुन टीका, उद्धव ठाकरे, काँग्रेसने ट्रोलिंग गँगचे काम स्वीकारले म्हणत भाजपचा खुलासा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर येथील एका व्हिडीओवरुन विरोधकांनी रविवारी आक्रमक पवित्रा धारण केला. या व्हिडीओवरुन विरोधकांनी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले असतानाच रविवारी महाराष्ट्र भाजपने यावरुन काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर प्रतिहल्ला चढविला आहे. हा प्रकार किळसवाणा आणि नालायकपणाचा कहर आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांनी विरोधी पक्षाचे रचनात्मक कार्य सोडून ‘ट्रोलिंग गँग’चे काम स्वीकारले असल्याची टीका भाजप महाराष्ट्राने रविवारी एक्सवरुन दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळपासून नागपुरातील पूरस्थितीचा पाहणी दौरा आयोजित केला होता. या दौऱ्या दरम्यान नागपुरातील एका व्यक्तीबरोबर अरेरावी केल्याचा व्हिडीओ रविवारी सोशल मीडियावरुन प्रचंड व्हायरल झाला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने या व्हिडीओ एक्सवरुन शेअर करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.

पावसाच्या पाण्याने झालेल्या नुकसानाची माहिती सांगणाऱ्या नागरिकांसोबत अहंकारी फडणवीसांची अरेरावी, अशी टीका करतानाच हीच काय आपल्या मतदारांनासोबत वागण्याची पद्धत ? याला सत्तेचा माज नाही तर अजून काय म्हणणार ? अशा शब्दात एक्सवरुन फडणवीस यांच्यावर टीका केली.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात आलेल्या या टीकेला महाराष्ट्र भाजपकडून रविवारी रात्री प्रत्युत्तर देण्यात आले आहे. या सर्व घटनेचा एक व्हिडीओ यावेळी भाजप महाराष्ट्रकडून एक्सवरुन शेअर करण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. त्यावेळी सदर व्यक्ती आणि इतर अनेकांची इच्छा होती की देवेंद्र फडणवीसांनी आपल्याही घरी यावे.

काय आहे व्हिडिओमध्ये करा क्लिक

नागपुरातील प्रत्येकाचेच प्रेम असल्याने आपला नेता घरी यावा, अशी त्यांची इच्छा असण्यात गैर नाही. पण, प्रत्येकाच्या घरी जाणे नेत्यालाही शक्य होतेच असे नाही. पोलिस त्याला थांबवित असल्याने, देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा हात धरुन गर्दीतून त्याला आपल्या जवळ घेतले आणि ‘चल बाबा तुझ्याही घरी येतो’, असे म्हटले आणि ते त्याचा हात धरुन त्याच्या घरी गेले सुद्धा!  असे यावेळी भाजप महाराष्ट्राने स्पष्ट केले आहे. तर अशा घटनेचे राजकारण कुणी करावे, तर जे कधीच जनतेत जात नाही त्यांनी. हा प्रकार किळसवाणा आणि नालायकपणाचा कहर आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांनी विरोधी पक्षाचे रचनात्मक कार्य सोडून ‘ट्रोलिंग गँग’चे काम स्वीकारले, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! राज्यातील जनतेने नाकारल्याने आता तसेही तुम्हाला त्याशिवाय दुसरा कामधंदाही उरला नाही, अशी टीका यावेळी भाजपाने केली आहे.

Leave a Comment