पडळकरांच्या विनंतीला मान देऊन दहिवडी येथील उपोषण सुटले

गणेशोत्सव संपला की पहिल्या आठवड्यात चारही उपोषणकर्त्यांना घेऊन बैठक लावली जाईल. जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्यासाठी विशेष बाब करावी लागली, तरी पालकमंत्री म्हणून ती मी करेन. दोन महिन्यांचा कालावधी सरकारला द्यावा, पालकमंत्री म्हणून मी जबाबदारी घेतो, असे आश्वासन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्यानंतर आणि गोपीचंद पडळकरांच्या विनंतीला मान देऊन उपोषणकर्त्यांनी काल सहाव्या दिवशी रात्री उशिरा उपोषण सोडले.

दहिवडी येथे उपोषणस्थळी दिवसभर विविध घडामोडी घडल्या. सर्व चर्चा निष्फळ ठरल्या. पालकमंत्री आल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याच्या निर्णयावर उपोषणकर्ते ठाम राहिले, तर सोमवारपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सकल धनगर समाजाने दिला. त्यानंतर हालचाली गतिमान झाल्या व रात्री सव्वा नऊ वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख हे उपोषणस्थळी दाखल झाले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या.

मागण्या ऐकल्यावर पालकमंत्री म्हणाले, सातारा जिल्हास्तरावरील विषय हे गणेशोत्सवानंतर स्वतंत्र बैठक घेऊन मार्गी लावण्यात येतील. राज्यभर मेंढपाळांवर जाणीवपूर्वक हल्ले होत असतील, तर संबंधित हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. चार राज्यात कसे अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात आले, त्याचा अभ्यास करणाऱ्या समितीत धनगर समाजाच्या दोन प्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल.

संबंधित समितीच्या कामाचा पाठपुरावा करून त्याची माहिती वेळोवेळी देण्याची जबाबदारी माझी असेल. मी यासंबंधी सरकारचा प्रतिनिधी म्हणून लेखी देतो. तसेच गायरान जमिनी मेंढपाळांना मेंढ्या चारण्यासाठी देण्यासंबंधी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून केंद्राशी चर्चा करण्यात येईल. या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी मान्यवरांच्या हस्ते फळांचा रस पिऊन आंदोलन सोडले.

Leave a Comment