मुंबईतील रामलीला मंडळांना दिलासा, मैदान शुल्क अर्धे करण्याचा निर्णय – मंगलप्रभात लोढा

मुंबईत दरवर्षी नवरात्रोत्सव दरम्यान अनेक ठिकाणी रामलीला महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा मात्र या रामलीला महोत्सवासाठी मंडळांना परवानगी न दिल्याने आयोजनाबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. अखेर मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याप्रश्नी तोडगा काढला असून या मंडळांना लवकरच परवानगी देण्याचा मार्ग मोकळा आहे.

या मंडळांसाठी मैदान शुल्क कमी करण्याचा तर ना हरकत प्रमाणपत्रासाठी आवश्यक अग्निशमन दलाचे शुल्क पूर्णत: माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर या मंडळांना परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरु करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी नवरात्रोत्सव दरम्यान रामलीला महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा प्रशासनाने या मंडळांना परवानगी न दिल्याने मंडळांमध्ये नाराजी पसरली होती. याची गंभीर दखल मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी घेत मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलविली.

या बैठकीत त्यांनी वरील निर्णयाची घोषणा करीत मंडळांना दिलासा दिला आहे. या बैठकीत मुंबई भाजपाचे आचार्य पवन त्रिपाठी, महाराष्ट्र रामलीला मंडळाचे सुरेश मिश्रा, रंजीत सिंह, साहित्य कला मंच के विनय मिश्रा, सेवा केंद्र के विरेंद्र सिंह, आदर्श रामलीला रामदरक अग्रवाल, रामलीला उत्सव समिति के चंद्रशेखर शुक्ला, राकेश पांडे, राजेश मिश्रा आदि उपस्थित होते.

या बैठकीत रामलीला मंडळाच्यावतीने त्यांच्या प्रमुख मागण्यांचे एक निवेदनही देण्यात आले. या सर्व मागण्या यावेळी मान्य करण्यात आल्या आहेत. तर यावेळी आझाद मैदान येथील रामलीला महोत्सवाच्या आयोजनाबाबतच्या अडचणींबद्दल ही यावेळी लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी दिले.

Leave a Comment