‘हवाहवाई’तून पहिल्यांदाच उलगडणार फूड स्टॉल चालवणाऱ्या महिलांची संघर्षकथा

आपण शहरात महिला पोळीभाजी, वडापाव, डोसा अशा विविध पदार्थांचे स्टॉल चालवत असल्याचं पाहतो, अनेकदा त्या फूडस्टॉलवर जाऊन पदार्थ खातो. पण आजवर कधीही या महिलांची फूड स्टॉल चालवण्याच्या संघर्षाची कथा चित्रपटाच्या पडद्यावर आली नाही. पण प्रसिद्ध दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी ‘हवाहवाई’ या बहुचर्चित चित्रपटातून पहिल्यांदाच हा आगळावेगळा विषय हाताळला असून, 7 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्रातील फूड स्टॉल चालविणाऱ्या महिलांची महेश टिळेकरांनी भेट घेतली. 

निमिषा सजयन “हवाहवाई”द्वारे मराठीत पदार्पण

मराठी तारका प्रॉडक्शन्सचे महेश टिळेकर आणि नाईनटिन नाईन प्रॉडक्शन्सचे विजय शिंदे यांनी “हवाहवाई” चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर महेश टिळेकर यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन केलं आहे. मल्याळम चित्रपटांतील लोकप्रिय अभिनेत्री निमिषा सजयन “हवाहवाई”द्वारे मराठीत पदार्पण करत आहे. तिच्यासह वर्षा उसगावकर, संजीवनी जाधव, किशोरी गोडबोले, समीर चौघुले, अतुल तोडणकर, सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, मोहन जोशी, स्मिता जयकर, गार्गी फुले, प्राजक्ता हनमघर, पूजा नायक, सीमा घोगळे, बिपिन सुर्वे, अंकित मोहन असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहेत. तर पंकज पडघन यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. 

फूडस्टॉल चालवणाऱ्या गृहिणीची गोष्ट

“हवाहवाई” चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी अनेक फूड स्टॉलवर जाऊन त्या महिलांशी संवादही साधला आहे. त्यांच्या या संवादाचे व्हिडिओजही व्हायरल झाले आहेत. हवाहवाई चित्रपटाविषयी महेश टिळेकर म्हणाले, मी खवय्या असल्याने ठिकठिकाणी फिरताना फूडस्टॉलवर खाणं होतं. वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद मी घेतो. मला अनेकदा ही गोष्ट लक्षात आली, की फूड स्टॉल महिला चालवत असतात. घरच्या परिस्थितीमुळे घर चालवावं लागणं, स्वतः काहीतरी करणं अशी वेगवेगळी कारणं त्यामागे असतात. पण काहीही असलं तरी या काम करणाऱ्या प्रत्येक महिलेची आपली अशी गोष्ट असते, संघर्ष असतो. पण ते आपल्याला माहीत नसतं. त्यामुळेच फूडस्टॉल चालवणाऱ्या महिलेच्या संघर्षाची गोष्ट चित्रपटातून मांडण्याची कल्पना सुचली आणि हवाहवाईची प्रक्रिया सुरू झाली. या निमित्ताने फूडस्टॉल चालवणाऱ्या गृहिणीची गोष्ट, तिचा संघर्ष पहिल्यांदाच मांडला जात आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेला आपली वाटेल असा हा चित्रपट झाला आहे.’

चित्रपट तयार झाल्यावर आम्ही फूडस्टॉल चालवणाऱ्या महिलांसाठी विशेष शो केला. चित्रपट पाहून त्या भारावून गेल्या, स्वतःचा संघर्ष पडद्यावर पाहून त्यांचे डोळे ओलावले. आमची गोष्ट तुम्ही दाखवलीत असं सांगत आभारही मानले. पण त्या पेक्षा त्यांची स्वतःच्या पायावर उभं राहण्याची, कुटुंब सावरण्याची धडपड, त्यासाठी त्या घेत असलेली मेहनत मला जास्त प्रेरणादायी वाटते. त्यांच्या त्या मेहनतीचा सन्मान व्हावा म्हणून ‘हवाहवाई’ सिनेमाची निर्मिती करण्यात आल्याचे दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी सांगितलं. तर सध्या या चित्रपटाच्या ट्रेलरलादेखील भरभरून प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळत आहे. 

Leave a Comment